स्वावलंबनद्वारे सहा महिन्यात ऑटिझम रुग्णांना अपंग प्रमाणपत्र
नागपूर:- अपंगांना प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी केंद्र सरकारची स्वावलंबन प्रणाली राज्यात सहा महिन्यात सुरु करुन ऑटिझम रुग्णांनाही अपंग प्रमाणपत्र देण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली.
सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्याला उत्तर देताना ते बोलत होते. डॉ.सावंत म्हणाले, राज्याच्या आरोग्य संचालनालयाने सॉफ्टवेअर फॉर असेसमेंट डिसॲबिलिटी (SADM) प्रणाली बंद करुन केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरुन २१ प्रकारचे अपंग प्रमाणपत्र वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून येत्या तीन महिन्यात हे सॉफ्टवेअर घेऊन पुढील सहा महिन्यात राज्यात ही प्रणाली सुरु करण्यात येईल. या प्रणालीद्वारे २१ प्रकारच्या अपंगत्व प्रकारासह ऑटिझम (स्वमग्नता) रुग्णांनाही आजाराचे अपंग प्रमाणपत्र देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.