७४ टक्के साक्षरतेचा दर; तरीही ३५ कोटी जनता अशिक्षित!

इंदिरादेवी जाधव यांचे व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायी! -चंद्रकांत पाटील

इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर:- स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या इंदिरादेवी जाधव यांचे व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या नावे सुरु असणाऱ्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा बहुजन समाजाला विकासाच्या प्रवाहात सातत्याने अग्रभागी राखण्याचे काम करेल, असे गौरवोद्गार महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ कसबा नूल संचलित इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. इमारतीचे उद्घाटन शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, आमदार संध्यादेवी कुपेकर, दैनिक पुढारीचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश जाधव, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, ॲड. श्रीपतराव शिंदे, भगवानगिरी महाराज, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, नानाप्पा माळगी, डॉ. अभयकुमार साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.पाटील यांनी नूलच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून इंदिरादेवी जाधव यांच्या नावे असणाऱ्या या कॉलेजला समृध्द करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी त्यांनी नूल गावाला सुसज्ज असे तीन मजली सांस्कृतिक सभागृह उभारण्यात येईल, गावच्या गरजा लक्षात घेवून विकासाचा आराखडा तयार करा त्यासाठी सर्वतोपरी मदत करु असेही सांगितले.

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल- विनोद तावडे

श्री.तावडे म्हणाले, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या शिक्षण पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र शिक्षण मंडळ बनविण्यात आले असून शिक्षण क्षेत्रात विविधांगी बदल करुन क्रांती करणारे सोनम वांगचूक हे या बोर्डाचे संचालक असतील. या माध्यमातून बिगर इंग्रजी माध्यमातील शाळांमधील मुलांच्या जीवनात बदल होणार आहेत. घोकमपट्टी करुन मुलांना पास करण्यापेक्षा त्यांना विषय समजून घेण्यासाठी मदत करणारी शिक्षण पध्दती आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. अलिकडच्या काळात शिक्षण पद्धतीमध्ये करण्यात येत असलेल्या बदलांमुळे भविष्यकाळात थ्री इडियट्स या चित्रपटातील घोकमपट्टी करणाऱ्या चतुरलिंगमपेक्षा हरहुन्नरी व कृतिशील रांचो निर्माण होतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांच्या शिक्षकांनी विविधांगी उपक्रम राबविल्याने इंग्रजी माध्यमातील हजारो विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुन्हा प्रवेशित झाले आहेत. नापास मुलांच्या त्वरीत घेतल्या जाणाऱ्या फेरपरीक्षांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे. फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या मुलांना व्यक्तीगत काऊन्स‍िलींगद्वारे त्यांना कौशल्याधारित शिक्षण देवून सक्षम करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचे समायोजन करुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होत असताना त्याला होत असलेला विरोध दुर्दैवी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही स्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करुन प्रत्येक विद्यार्थ्यांचा विमा शासनाद्वारे उतरविण्यात येईल व याद्वारे कुटुंबप्रमुख अथवा घरातील मिळवत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी त्याला पदवीपर्यंतचे शिक्षण देण्याची तजवीज करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, आजच्या मातृदिनी इंदिरादेवी जाधव यांच्यानावे असलेल्या आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणे हा क्षण अत्यंत आनंददायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्राला अग्रक्रम दिल्यामुळे कालबाह्य शिक्षणक्रम बदलण्यासाठी अनेक चांगले प्रयत्न होत आहेत. खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाची गंगा पोहचावी यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी साक्षरतेचा दर १२ टक्के होता आज तोच दर ७४ टक्के आहे. तरीही ३५ कोटी जनता अशिक्षित आहे. त्यामुळे अद्यापही शिक्षणावर विशेष भर देण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात आमदार संध्यादेवी कुपेकर, ॲड श्रीपतराव शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते इंदिरादेवी जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. याप्रसंगी नूल ग्रामस्थांच्यावतीने पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचे सत्कार डॉ. योगेश जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ईश्वराप्पाण्णा नडगदल्ली यांचे जीवनचरित्र विद्यादानिश्वर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनोद नाईकवडी यांनी केले. आभार पी. बि. नांदवडेकर यांनी मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी संगिता चौगुले, सरपंच बाजीराव चव्हाण, शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, नंदिनी बाभूळकर, रामराजे कुपेकर, किसन कुराडे आदी उपस्थित होते. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *