आदिवासींशी एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हावे
एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
मुंबई:- आदिवासी समाज आजही कठीण परिस्थितीत राहत आहे. त्यामुळे आदिवासींच्या केवळ सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्यासह एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक उन्नतीसाठी कार्य करीत असलेल्या एकल श्रीहरी समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त शनिवारी (दि. १३) गरवारे क्लब, मुंबई येथे आयोजित ‘दीपावली संमेलन’ कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.
आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केवळ धन देणे पुरेसे नाही, असे नमूद करून त्यासाठी त्यांच्याशी तादात्म्य होऊन काम करणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. अनेक निःस्वार्थ कार्यकर्त्यांनी आपले जीवन उत्तर पूर्व भारतात आदिवासी विकासासाठी व्यतीत केल्यामुळे तसेच तेथील संस्कृतीशी एकरूप झाल्यामुळे आज तो भाग बव्हंशी शांत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
मुंबईपासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मोबाईल संपर्क होत नाही असे नमूद करून शहरी सधन समाजाने आदिवासी बांधवांकडून बांबू राखी, फर्निचर, आकाश दिवे आदी वस्तू खरेदी करून त्यांना विकासात सहभागी करून घेतले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
आदिवासींना कौशल्य शिक्षण देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगताना राज्यपालांनी एकल श्रीहरी समितीच्या कार्याचे कौतुक केले.
एकल श्रीहरी समितीतर्फे देशभर ७०,००० संस्कार केंद्र चालविले जात असून अनेक श्रीहरी रथ तसेच गौग्राम योजना आदी राबविल्या जात असल्याचे एकल श्रीहरी मुंबईचे अध्यक्ष विजय केडिया यांनी सांगितले.
कार्यक्रमाला एकल श्रीहरीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण काबरा, आमदार मंगल प्रभात लोढा, रौप्य महोत्सव समितीच्या अध्यक्षा मीना अग्रवाल व एकल श्रीहरीचे महासचिव माधवेंद्र सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते १५ गणमान्य व्यक्तींना एकल श्रीहरी सन्मान प्रदान करण्यात आले. वरूण व ज्योती काबरा, गोपाळ कंडोई, रमाकांत टिबरेवाल, श्रीनारायण व मीना अगरवाल, विजय केडिया, सुरेश खंडेलिया, महावीर प्रसाद गुप्ता, रामविलास अग्रवाल, रामावतार मोदी, रामप्रकाश बुबना, चंद्रप्रकाश सिंघानिया, रमा पहेलजानी, महेश मित्तल, मंगलप्रभात व मंजू लोढा व प्रदीप गोयल यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.