२५ एप्रिल जागतिक हिवताप दिन – जनतेच्या सक्रिय सहभागासाठी शासनाचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जि.मा.का): जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागरुती निमार्ण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य घेणे, हा दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश आहे.

उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाकून न ठेवलेल्या पाणीसाठ्यात डास निर्मिती सुरु होते. पावसामुळे जागोजागी पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. पावसाळ्यात हिवताप (मलेरिया), डेंग्यू चिकनगुनिया या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारामध्ये वाढ झालेली आढळून येते. डासांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरावरुन सर्वांकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज आहे.

हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या आजाराच्या प्रमाणात सन -२०२० च्या तलनेत २०२१ मध्ये किंचत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही वाढ वेळीच रोकण्यासाठी समाजातील सर्व स्तरावर किटकजन्य आजार, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, डासअळी घनता कमी करणे याबाबतची माहिती देण्यासाठी सूक्ष्मकृती कार्यक्रम निश्चित करुन देण्यात आला आहे. तसेच समस्याग्रस्त गावामध्ये पाच दिवसासाठी पंचसूत्रीचा वापर करावयाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये खालील समावेश करण्यात आलेला आहे.

पहिला दिवस- गावातील शाळेतील मुलांना डासअळी प्रात्यक्षिक करुन दाखविणे, डासअळी सर्वेक्षण करण्यासाठी प्रोत्सहान देणे

दुसरा दिवास- गाववार / वाडीमध्ये ग्रामसभा घेऊन लोकांना किटकजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करणे, जनजागृती करणे.

तिसरा दिवस– गावातील, वाडीतील सिमेंट कन्टेनर, टायर्स यांची तपासणी करुन आळीनाशक टाकण्याची कार्यवाही करावी.

चौथा दिवस- गावामध्ये/वाडीमध्ये कोरडा दिवस पाळण्यात यावा. कोरडा दिवस संकल्पना सभेमध्ये व्यवस्थित समजून सांगावी. पाणी साठवण्याची भांडी व्यवस्थित स्वच्छ कोरडी करुन उन्हामध्ये वाळवावीत त्यानंतर त्याचा वापर करण्यात यावा.

पाचवा दिवस- ग्रामस्वच्छता अभियान राबविणे, गप्पी मासे पाण्यात सोडणे, पाणी वाहत ठेवणे, व्हेंटपाईपला जाळी बसविणे.

वरीलप्रमाणे समस्याग्रस्त भागात गावतील लोकांच्या सहभागाने पंचसूत्रीचा वापर करण्यात येणार आहे. अशाप्रकारे जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने एप्रिलपासून किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी डासांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील सूचनांची समाजाकडून काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे आहे.

१) घराच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे पाणी (घाण/स्वच्छ) आठ दिवसापेक्षा जास्त साठून राहणार नाही याची दक्षता घेणे गरजेची आहे.

२) पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ करुन पुन्हा वापरात घ्यावी. सर्व पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावे.

३) साठलेले पाणी रकामी करता येत नाहीत त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. हे मासे डासांच्या आळ्या खातात. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात हे मासे मोफत मिळतात.

४) डास प्रतिबंधात्मक मलम, कॉईल, मच्छरदानी याचा वापर करावा

५) व्हेंटपाईपला जाळ्या बसविण्यात याव्यात. याबाबतची दक्षता प्रत्येकाने घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारचा ताप हा हिवताप (मलेरिया), डेंग्यू, चिकनगुनिया असू शकतो. म्हणून ताप आल्यास लगेच शासकीय वैद्यकिय संस्थेत रक्त तपासून घेणे गरजेचे आहे. या आजारावरील औषधोपचार शासकीय दवाखान्यात मोफत दिला जातो. हिवताप साथ उद्रेक झाल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता आवश्यक औषधसाठा व किटकनाशके जिल्हास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

यासाठी ग्रामीण स्तरापासून मोठ्या शहरापर्यंत सर्वस्तरावर किटकजन्य आजार व करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती, साठविलेल्या पाण्यामुळे होणारी डांस निर्मिती, कोरडा दिवस पाळण्याचे महत्व, जैविक उपाययोजनांची गरज, गप्पी मासे पैदास व वापर, अळीनाशकाचा वापर वैयक्तिक सुरक्षा, डासोत्पत्ती स्थानांची ओळख व ती नष्ट करण्याबाबत आवश्यक प्रशिक्षण देणे ही काळाजी गरज आहे. यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच इतर सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, खासगी वैद्य, व्यवसायिक यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. समेश कर्तस्कर यांनी केले आहे.