म्हाडाची जागा बळकावणाऱ्या आणि दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी!
मुंबई (विशेष प्रतिनिधी):- म्हाडाची जागा बळकावणाऱ्या आणि स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत जोरदार मागणी पुढे येत असून पोलीस आणि म्हाडा प्रशासनाने त्याची त्वरित दाखल घ्यावी; अशी मागणी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली.
जोगेश्वरी पश्चिम पाटलीपुत्र नगर येथील म्हाडाने बांधलेल्या आठ इमारतींच्या कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या आवारात पुरातन साईमंदीर आहे. त्या मंदिराच्या मागील बाजूस एका व्यक्तीने म्हाडाची जागा हडप करण्याच्या उद्देशाने झोपडी वजा शेड बांधली असून त्या व्यक्तीकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना धमकावणे, त्यांच्यावर खोटे आरोप करून पोलीस तक्रार दाखल करणे, दहशत माजविणे, अनधिकृतपणे गाड्यांची पार्किंग करणे, मंदिरात पूजा करणाऱ्या गरीब दाम्पत्याला खोटी केस दाखल करून हाकलून देणे, म्हाडाने बांधलेली भिंत तोडून शासनाच्या संपत्तीची नासधूस करणे, साईमंदिराची ट्रस्ट बळकाविण्यासाठी खोट्या सह्या करून धर्मादाय आयुक्तांकडे बनावट कागदपत्रे तयार करणे, कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनमधील मुलांना खेळण्यास प्रतिबंध करणे, धार्मिक द्वेष पसरविणारी विधाने करणे; असे गैरप्रकार गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु आहेत.
कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनच्यावतीने ह्या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत. सदर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर पोलीस कारवाई करावी आणि म्हाडाने त्यांनी अनधिकृतपणे बांधलेली शेड तोडून टाकावी व गुन्हे दाखल करावेत; अशी मागणी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील साई मंदिराचे कामकाज नोंदणीकृत ओम साईधाम देवालय समिती करते. मंदिरात पूजा आणि देखभाल करण्यासाठी श्री. बाबू निमरे यांच्या कुटुंबियांची नेमणुक ओम साईधाम देवालय समितीने केली होती; परंतु श्री. बाबू निमरे यांच्यावर विनयभंगाचे खोटे आरोप करून चव्हाण कुटुंबियांनी मंदिरातून हाकलले आणि साईमंदिरावर तथाकथित मालकी प्रस्थापित केली.
तर ह्याच चव्हाण कुटुंबियांनी २०१५ साली म्हाडाने बांधलेली भिंत तोडली, कारण म्हाडाच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनने ह्याची त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली व ती भिंत परवानगी घेऊन बांधली. त्याचप्रमाणे कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनचे सेक्रेटरी श्री. मोहन सावंत यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली व २९ नोव्हेंबर २०२० रोजी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या आवारात श्री साईमंदिराजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबाबत महिला आयोगाकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. नोंदणीकृत असलेल्या ओम साईधाम देवालय समितीने सुद्धा दहशत निर्माण करणाऱ्या ह्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.