`ती’ फाउंडेशनच्या सॅनिटरी पॅड बँकचा पाचवा वर्धापन दिन आणि कार्य हिमालयाएवढे…
आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला कौतुकास्पद उपक्रम!
आदर्श लोकप्रतिनिधी आपल्या संकल्पनेतून समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी सहजपणे पुरवू शकतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या जुनाट विचारांवर – रुढींवर नव्या आधुनिक विचारांनी मात करून सामाजिक क्रांती यशस्वी करू शकतो. त्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि प्रामाणिकपणा असावा लागतो आणि अशाप्रकारचे कौतुकास्पद कार्य `ती’ फाऊंडेशनच्या माध्यमातून आमदार भारतीताई लव्हेकर करीत आहेत. आज `ती’ फाऊंडेशन मार्फत सुरु असलेल्या सॅनिटरी पॅड बँकचा पाचवा वर्धापन दिन आणि ह्या पाच वर्षात झालेले कार्य मात्र हिमालयाएवढे आहे. खरोखरच आमदार भारतीताई लव्हेकर यांच्या महिलांसाठी असलेल्या आणि त्यातून समाजाला नवी दिशा देणाऱ्या कार्यास शुभेच्छा देण्यासाठी हा छोटासा लेखन प्रपंच!
`ती’ फाउंडेशनच्या माध्यमातून विशेषतः १) बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि २) मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या समस्येचा सामना करण्यासाठी लागणारे सर्व सहाय्य महिलांना पुरविणे आणि त्याबाबत जनजागृती करणे; ह्या दोन विषयांवर कार्य करण्यात येते. `बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान!’ अंतर्गत `ती’ फाऊंडेशनने केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
भारतीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ मध्ये भारतातील बाल लिंग गुणोत्तर (०-६ वर्षे) १००० मुलांमागे ९२७ मुली असे होते; जे २०११ मध्ये प्रत्येक १००० मुलांमागे ९१८ मुलींवर घसरले. २०११ च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील लिंग-गुणोत्तर प्रमाण १००० मुलांमागे ८०१ मुली, शिरूर-कासार तालुक्यात ७३३ मुली आणि शिरूरमध्ये ६६९ मुली असा उतरता क्रम धक्कादायक आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा होता. म्हणून शिरूर-कासार तालुक्याची निवड करून तो तालुकाच तीन वर्षासाठी दत्तक घेण्यात आला आणि `ती’ फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. लिंग निदान करणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करून पाठपुरावा करण्यात आला. गरोदर महिलांची नोंदणी करून त्यांना पोषक मोफत आहार, आवश्यक जीवनसत्वे, औषधोपचार, वैद्यकीय उपचार देण्यात आले. हे कार्य करताना अनेक समस्या उभ्या राहिल्या पण त्यावर यशस्वी मात करून आजमितीस मुलींची संख्या शिरूर-कासारसाठी ७३३ वरून ९०६ वर पोहचली आहे. `ती’ फाऊंडेशनने इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने केलेले कार्य खूपच मोलाचे असल्याचे आकडेवारीनुसार सिद्ध होते. आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर आपल्या मतदार संघात ज्या घरात मुलगी जन्म घेते तिथे जाऊन त्या कुटुंबाचे अभिनंदन आणि सत्कार करतात. नवजात मुलीच्या आईवडिलांचे महिला आमदारांकडून झालेले कौतुक चिरंतर स्मरणात राहणारे असते.
भारतात महिलांसाठी मासिक पाळी त्यांच्या विकासासाठी समस्या तयार करतात. कारण त्यासंदर्भातील आकडेवारी खरोखरच दुर्दैवी आहे. अनेक संस्थांच्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार; भारतातील केवळ १५ टक्के मासिक पाळी असलेल्या महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. ६६ टक्के मुलींना त्यांच्या पहिल्या मासिक पाळीपूर्वी मासिक पाळीची माहिती नसते. ७० टक्के महिलांना मासिक पाळीचे रक्त गलिच्छ वाटते. ६६ टक्के मुली आणि स्त्रिया शौचालयाशिवाय मासिक पाळीचे व्यवस्थापन करतात. मासिक पाळीच्या ८५ टक्के पेक्षा जास्त स्त्रिया असुरक्षित साहित्य वापरतात, अस्वच्छ कापड, राख आणि भुस, वाळू आणि पाने यासारख्या धक्कादायक पर्यायांचा अवलंब करतात. २३ टक्क्यांपेक्षा जास्त मुली वयात आल्यावर पूर्णपणे शाळा सोडतात. भारतातील सुमारे ७० टक्के स्त्रिया आपल्या कुटुंबियांचे आर्थिक उत्पन्न नसल्याने सॅनिटरी नॅपकिन विकत घेऊ शकत नाहीत. जगातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी २७ टक्के मृत्यू भारतात होतात. ह्या सगळ्या समस्या सोडविण्यासाठी भारतात प्रथमच `ती’ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न झाले. मोठ्या प्रमाणावर आर्थिक क्षमता नसलेल्या महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात येते. ठिकठिकाणी सॅनिटरी पॅड एटीएम, स्वयंचलित सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन लावण्यात आल्या. मुली व महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्यात जागृती निर्माण करणे, त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठी वैद्यकीय शिबीर आयोजित करणे, विद्यार्थिनींना मोफत मासिक पाळी आरोग्य किटचे वाटप करणे, मासिक पाळीतील स्वच्छतेबद्दल मुलींसाठी समुपदेशन करणे; असे उपक्रम नियमितपणे `ती’ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असतात.
आज आहे, आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस (international menstrual hygiene day)! आणि `ती’ फाऊंडेशन मार्फत सुरु असलेल्या सॅनिटरी पॅड बँकचा पाचवा वर्धापन दिन. संपूर्ण भारतातील हा पहिलाच उपक्रम! ह्या उपक्रमाच्या लाभ आजपर्यंत लाखो मुलींनी-स्त्रियांनी घेतला आहे. हे हिमालयाएवढे कार्य आहे. ह्या उपक्रमाचा आदर्श घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येक गावात, शहरात, आदिवासी भागात, ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड बँक सुरु केली पाहिजे. त्याचा फायदा महिलांना होऊ शकतो.
आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या कार्याला आमच्या शुभेच्छा आणि मानाचा सलाम!
– सौ. सिद्धी नरेंद्र हडकर
-सौ. मुग्धा मोहन सावंत