विविध देशांचा ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’ मध्ये सहभाग!

राज्यपालांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन

मुंबई (अ‍ॅड.सुमित शिंगाणे):- भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्व अधोरेखित झाले आहे. विविध देश आज व्यापार विस्तारासाठी चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत. युवा लोकसंख्येच्या रुपाने भारताला आणखी एक लाभांश मिळाला आहे. या महत्वाच्या वेळी आयोजित करण्यात आलेले जागतिक व्यापार प्रदर्शन विविध देशांमध्ये व्यापार सहकार्य व विकास वाढविण्याच्या दृष्टीने मैत्रीपूर्ण पुलाचे कार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र येथे मंगळवारी (दि. ३) दोन दिवसांच्या चौथ्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज तर्फे जागतिक व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘व्यापार, तंत्रज्ञान व पर्यटन’ या विषयावर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पर्यटन हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक झाला आहे. गेल्या वर्षी एकट्या भारतातून १.८० कोटी पर्यटक विविध देशांत गेले व ६१ लाख विदेशी पर्यटक भारतात आले. देशांतर्गत १७.३१ कोटी पर्यटकांनी देखील पर्यटनाला चालना दिली.

महाराष्ट्र उद्योग व गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वांत आकर्षक राज्य असून राज्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत. वर्ल्ड ट्रेड एक्स्पोच्या माध्यमातून विविध देशांना आपल्या देशातील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाच्या संधी दाखविण्याची तसेच राज्यातील व्यापाराच्या शक्यता जाणून घेण्याची संधी मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

व्यापार प्रदर्शनात सहभागी सर्व देशांनी महाराष्ट्राशी सहकार्य वाढवावे व इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवनवी क्षितिजे शोधावीत अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

जागतिक व्यापार प्रदर्शनात ३० देशांचा सहभाग असून देशातील पाच राज्ये देखील यात सहभागी होत असल्याची माहिती, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे व मुंबईच्या जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यांनी यावेळी दिली. ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’मध्ये व्यापार – व्यापार सहकार्य व व्यापार – शासन सहकार्य या विषयावर बैठक -सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. जागतिक व्यापार केंद्राच्या वतीने कौशल्य प्रशिक्षण केंद्र देखील चालविण्यात येत असून अनेक महिलांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी जागतिक व्यापार प्रदर्शनात लावलेल्या व्हिएतनाम, अर्जेंटिना, इथिओपिया, काँगो, केनिया यांसह विविध देशांच्या स्टॉल्सना भेट दिली व व्यापार प्रतिनिधींची चौकशी केली.

कार्यक्रमाला प्रयागराजच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी, ब्रिटनचे मुंबईतील उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, जागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा, केंद्राच्या कार्यकारी संचालक रुपा नाईक, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत तसेच उद्योग व व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते.
————

Maharashtra Governor Inaugurates 4th World Trade Expo in Mumbai

Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the 4th World Trade Expo 2023 at World Trade Centre in Mumbai on Tue (3 Oct).

The Governor visited various country – stalls at the World Trade Expo which is focussing on Trade, Technology and Tourism.

The 2 – day Expo has been organised by the All India Association of Industries ( AIAI) in association with World Trade Centre, Mumbai.

Member of Parliament Rita Bahuguna Joshi, British Deputy High Commissioner of Britain for Western India Harjinder Kang, President of AIAI and President of World Trade Centre Mumbai Dr Vijay Kalantri, Vice President Capt. Somesh Batra, Executive. Director of WTC Rupa Naik, Counsuls General of various countries, captains of industries and trade representatives were present.