संपादकीय- व्रतस्थ पत्रकारितेची फलश्रुती!
आजच्या विजयादशमी दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’चे २४ व्या वर्षात पदार्पण!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ
आज विजयादशमी!
अपावित्र्याचा नाश, असत्याचा शेवट, अशुभाचा पराभव होत असताना पवित्रता, सत्य आणि शुभ `विजयी’ होण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी! अशा शुभ, पवित्र दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना, श्रद्धावानांना मनःपूर्वक शुभेच्छा!
पाक्षिक `स्टार वृत्त’ आजच्या दिवशी २४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेली तीन वर्षे ई-पेपरच्या आणि वेबसाईटच्या माध्यमातून पाक्षिक `स्टार वृत्त’ वाचकांसमोर येत आहे. गेल्या २३ वर्षाची वाटचाल करीत असताना सद्गुरूंची कृपा आणि त्या कृपेतून पाक्षिक `स्टार वृत्त’ला हितचिंतकांची, मित्रमंडळींची मिळालेली नि:स्वार्थी साथ आमच्यासाठी अनमोल आहेच; शिवाय चिरंतर हृदयस्थ स्थिर झालेली आहे. म्हणूनच व्यक्त होण्याचे पाक्षिक `स्टार वृत्त’चे व्यासपीठ अबाधित राहिलेले आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासमोर व्यक्त होऊ शकतो; हीच त्या परमात्म्याची ताकद, हेच ते आदीमातेचं सामर्थ्य, हाच तो सद्गुरु कृपेचा आशीर्वाद!
सहा वर्षे मुक्त पत्रकारिता करता करता २००० सालापासून पाक्षिक `स्टार वृत्त’ सुरू झाला. पाक्षिक `स्टार वृत्त’चा प्रथम अंक हा भगवद्गीतेवरील विशेषांक होता. दुसऱ्या अंकापासून परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनाचे-पितृवचनाचे शब्दांकन तसेच परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ट्रस्टींचे मानवता जपणारे समाजकार्याचा वृत्तांत आम्ही परवानगीने प्रसिद्ध केला. आम्ही निमित्त ठरलो. सर्व काही त्या सद्गुरु तत्त्वाने करून घेतले. जे काही चांगलं झालं- जे काही उचित प्रसिद्ध झालं; ते सर्व काही माझ्या सद्गुरूंचे होते आणि जे काही चुकीचे प्रसिद्ध झाले असेल; ते माझे होते. हे सर्वसामान्य माणूस म्हणून मान्य करायला हवे. कारण परमपूज्य अनिरुद्धांचे प्रवचन-पितृवचन शब्दांकित करणे माझ्यासारख्या आध्यात्मिक प्रगतीत अडाणी असणाऱ्याकडून शक्य नव्हते; असे मी मानतो. म्हणूनच परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या चरणी सदैव नतमस्तक राहण्याची प्रेरणा चित्तात दृढ होवो; ही त्याच सद्गुरुकडे आजच्या शुभ दिवशी प्रार्थना!
वर्तमानपत्र सुरु ठेवणे आर्थिक दृष्टिकोनातून खूपच कठीण काम असते. मात्र आम्ही पूर्ण प्रामाणिक राहून प्रसंगी कर्जबाजारी होऊन पाक्षिक `स्टार वृत्त’ छपाई करून सर्वांना पोचविला आणि गेली तीन वर्षे वेबसाईटच्या माध्यमातून – ई पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध करीत आहोत.
जो जन्माला येतो तो मृत्यू पावतो. मृत्यू कोणाला चुकलेला नाही, पण जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळात कसे वागावे? नेमकं काय करावे? याचं शास्त्रशुद्ध आध्यात्मिक पण साधंसोपं प्रशिक्षण सद्गुरूंनी सर्वांना दिले. व्यावहारिक जगात व स्वार्थाच्या दलदलीत समर्थपणे जगण्याची कला सद्गुरूंनी दिली. ते सर्व शब्दांकित करण्याचे परमभाग्य आम्हाला लाभले भाग्य आहे; असे आम्ही मानतो.
गेल्या २३ वर्षांची वाटचाल करताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं; मात्र दोन वर्षाच्या काळात जवळची माणसं सोडून गेली. त्यांच्या जाण्याचं दुःख आजही आहे. त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी आवश्यक ते सामर्थ्य सद्गुरु माऊली आम्हाला देणारच आहे. पण त्यांच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतच आहे, हृदयाची धडधड होतेच आहे. तरी काही गोष्टी मान्य करून पुढे जावेच लागते. कर्तव्याची जाणीव वैयक्तिक जीवनाच्या सुखदुःखापेक्षा निश्चितच मोठी असते आणि त्या जाणीवेतून पाक्षिक `स्टार वृत्त’ च्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतो.
पत्रकारिता हा धंदा नाही- व्यवसाय नाही. ते पवित्र व्रत आहे. व्रतस्थ होऊन ते जपावे लागते आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ने ते आजपर्यंत जपले- अनुभवले. आज सर्वच क्षेत्रामध्ये भ्रष्टता वाढलेली दिसते. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात; मात्र खऱ्या अर्थाने लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि लोकशाहीची नैतिक मूल्य प्रस्थापित करण्यासाठी पत्रकारिता अतिशय महत्त्वाचे माध्यम असतं. हे माध्यम जोपर्यंत पवित्र राहतं; तोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, राज्यकर्ते-प्रशासन नैतिक चाकोरीबाहेर जाणार नाहीत. परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षात आर्थिक व्यवहाराच्या दुष्ट चक्रात बहुतांशी माध्यमं अडकत आहेत; हे मान्य करावे लागेल. माध्यमांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, देशातील सर्वसामान्य जनतेसाठी, दुर्लक्षित घटकांसाठी व्यक्त व्हायला पाहिजे; असे आम्ही मानतो. पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टी जपल्या; हे अभिमानाने सांगायला आनंद होतो. त्याच व्रतस्थ जबाबदारीने पाक्षिक `स्टार वृत्त’ ई पेपरच्या माध्यमातून- वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या समोर येत राहील. तुमच्या सूचनांचे-सल्ल्याचे निश्चित स्वागत करू! पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’