विजयादशमीच्या हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा! श्री रामाचा आदर्श जपायला पाहिजे!

॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ 
नाथसंविध्

आज विजयादशमी! विजयादशमीचे आध्यात्मिक महत्व आम्हास माहित असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिमातेची प्रतिष्ठापना करून पुढील नऊ दिवस नवरात्री साजरी केली जाते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.

श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला आणि रावणाच्या लंकेतही रामराज्याची स्थापना केली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा सण! भारतीय हिंदू धर्मांनी अनेक सणांमधून आपणास सुसंस्कारित करण्याचे माध्यम दिले. आम्हाला धर्माच्या संकल्पना म्हणजेच मानवी जीवन जगण्याचे तंत्र दिले. त्या वाटेवरून गेल्यास स्वतःच्या जीवनात आणि समाजात सुद्धा खऱ्या अर्थाने सुख, समाधान, शांती, तृप्ती, आरोग्य संपन्नता येऊ शकते. अध्यात्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आजच्या कलियुगात `कलि’ आपला प्रभाव दाखवत आहे. त्यामुळे दररोज आपण ज्या घडामोडी पाहतो, वाचतो त्याने मनाला खूप वेदना होतात. अक्षरशः जीव गुदमरल्यासारखो वाटतो. तेव्हा मात्र आम्हाला विजयादशमीसारखा सण मार्ग दाखवितो

`रामराज्य’ जीवनात येण्यासाठी अनेक सणांपैकी विजयादशमी हा सण खूप महत्वाचा आहे. कारण ज्या लंकेमध्ये अधर्म, अन्याय माजला होता आणि त्याचे परिणाम सामान्य श्रध्दावानांवर होऊ लागले होते; त्या लंकेचा क्रूरकर्मा राजा रावण आजच्याच दिवशी वधिला गेला. म्हणजेच असत्यावर सत्याचा, अपवित्रेवर पवित्रेचा, अंधारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा, राक्षसावर परमात्म्याचा विजय झाला. परमात्मा सदैव विजयी असतो कारण परमात्मा आदिमातेच्या इच्छेनुसार कार्य करतो. मातेची इच्छा आपल्या मुलांचं सदैव भलंच व्हावं अशी असते. आपल्या मुलांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या व त्रास देणाऱ्यांचाही ती बंदोबस्त करते. म्हणूनच चैत्र प्रतिपदेला शुभंकर नवरात्र सुरु होते आणि नवव्या दिवशी श्री रामाचा जन्म होतो. तर आश्वीनी प्रतिपदेला अशुभनाशिनी नवरात्र सुरु होते आणि दहाव्या दिवशी श्री राम अशुभाचा नाश करतो.

आमच्याकडील व समाजातील अशुभाचा नाश परमात्मा रामच करतो. त्यासाठी श्री रामाची भक्ती करायला हवी, श्री रामाचा आदर्श जपला पाहिजे; हाच एकमेव मार्ग आमच्यासमोर उरतो आणि तो आम्ही स्वीकारायला हवा.

पाक्षिक `स्टार वृत्त’चे सर्व वाचक, हितचिंतक, मित्रमंडळी यांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या जीवनात साक्षात श्री रामाची कृपा प्रवाहित होवो! हीच आदिमातेकडे व तिच्या पुत्राकडे म्हणजेच परमात्मा श्री रामाकडे प्रार्थना!

नाथसंविध्

You cannot copy content of this page