डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना शरदचंद्र पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार!
मुंबई:- ‘हवामान बदलाचे परिणाम आणि उपाय’ या विषयावर १२ मार्च २०२४ रोजी चर्चासत्र यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे संपन्न झाले. त्यावेळी नामवंत शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ, एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) च्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे उपपंतप्रधान-संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंती दिनानिमित्त देण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक डॉ अनिल काकोडकर, डॉ रघुनाथ माशेलकर, डॉ नरेंद्र जाधव, हेमंत टकले, अरुणभाई गुजराथी, विवेक सावंत, अदिती नलावडे, मुंबईच्या माजी महापौर विधिज्ञ निर्मलाताई सामंत प्रभावळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ स्वामीनाथन यांच्या कार्याचा गौरव केला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, डॉ स्वामीनाथन आणि माझ्यात एका गोष्टीचे साम्य आहे ते म्हणजे आम्हा दोघांचेही पालक आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. डाॅ स्वामीनाथन आणि डाॅ साैम्या स्वामीनाथन यांनी आपल्या क्षेत्रात भरीव असे काम केले. आम्ही संसदेत चर्चा किंवा भाषण करत असताना स्वामीनाथन यांच्या विचारांचा आधार घेत असतो. ते आपल्या देशातील एक महान संशोधक होते. ‘फुड इकाॅनाॅमी’त त्यांचे योगदान फार मोठे आहे. कोरोना काळात डाॅ. साैम्या स्वामीनाथन यांनी फार मोठे काम केलेले आहे. त्यांना आपल्या घराण्याचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. वडील स्वामीनाथन यांनी शेतीत तर डाॅ साैम्या यांनी आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे जेव्हा देशाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या दोघांच्या कार्याचा आदराने उल्लेख केला जाईल. तो आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण असेल!
स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता. त्यांची आज जयंती असताना सकाळी एका आंदोलनाला उपस्थित राहिले होते. कर आकारणीविरोधात ते आंदोलन करण्यात आले होते. चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी आंदोलन करावे लागेल हे आपले अपयश आहे. आजही आपण आपल्या हक्कासाठी आंदोलन करु शकतो, म्हणजे लोकशाही जीवंत आहे हे आपले यशही आहे. आपण आज चव्हाण साहेबांची एक नवीन वेबसाईट https://yashwantraochavan.in लाँच करत आहोत त्यामुळे कोणाला चव्हाण साहेबांची संपूर्ण माहिती हवी असेल तेव्हा कोणीही व्यक्ती या वेबसाईटच्या आधारे करु शकतो. चव्हाण साहेबांचे साहित्य, काम, भाषणे, दुर्मिळ कागदपत्रे त्यांची सगळी माहिती ही वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. ती माहीती आज मराठी भाषेत आहे. पण आगामी काळात ती हिंदी आणि इंग्रजीमध्ये देखील उपलब्ध करुन दिली जाईल. हा जमाना तंत्रज्ञानाचा आहे. आपण कितीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरस्कार केला, तरीही माणूस हा माणूसच आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राबद्दल जी भुमिका मांडली त्या भुमिकेनुसार पुढे जाण्याचे काम चव्हाण सेंटर मार्फत करण्यात येत आहे. सेंटर शिक्षण क्षेत्रावर देखील काम करत आहे. पण आगामी काळात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल शिक्षकांना केंद्रबिंदू ठेऊन करावेत असा आमचा आग्रह असतो. विशेष मुलांसाठी त्याचबरोबर ऑटिझम या विषयावर सेंटरतर्फे पहिल्यांदा कार्यशाळा घेण्यात आली होती. इतिहास हा खरा असतो, तो सोयीचा नसतो. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर यांच्याबद्दलचा इतिहास आम्ही तज्ञांच्या मदतीने संकलित करत आहोत. महिला सबलीकरणासाठी सेंटरचे काम नेहमी सुरूच असते. सुगरण उपक्रमामुळे महिला बचत गटांना रिलायन्ससारखे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. महिला बचत गटांची उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मुद्रा योजनेतून महिलांची अनेक खाती उघडण्यात आली; पण त्याचे पुढे काय झाले? याची माहिती नाही. सरकारचा अनेक धोरणामध्ये असमन्वय दिसून येतो. चव्हाण सेंटरमुळे किती जणांच्या जीवनात बदल झाला आहे; याचे आम्ही त्रयस्थ संस्थेद्वारे सर्व्हे करत आहोत. नोव्हेंबरमध्ये चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथी दिवशी त्याचे प्रेझेंटेंशन केले जाणार आहे. आम्ही कोणाबरोबर तुलना करत नाही, कारण आमची स्पर्धा आमच्याबरोबरच असते. नवीन पिढी संस्थेसोबत जोडली जात आहे. चव्हाण सेंटर लवकरच मेंटरिंगचा कार्यक्रम राबवणार आहे. चव्हाण साहेबांचे काम आणि उद्याचा महाराष्ट्र कसा असेल? यावर तो असणार आहे. यासाठी पाच मुलांची निवड करुन त्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. आणि या मुलांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावे; अशी आमची अपेक्षा आहे. त्या उपक्रमाची माहिती आपणास लवकरच दिली जाईल.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी सेंटरसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. चव्हाण सेंटरच्या नावाने असणाऱ्या संस्थेत सातत्य ठेऊन महाराष्ट्रात आणि देशात काही तरी चांगले करण्याचा प्रयत्न होत असतो असे स्पष्ट केले.