भारताच्या जीडीपीमध्ये ९७ टक्के वाटा असलेल्या असंघटित क्षेत्राचा व महिलांचा विकास आवश्यक!

मुंबई:- महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आली पाहिजे; त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे. ९७ टक्के असंघटित क्षेत्राच्या कल्याणासाठी आणि विशेषतः महिलांच्या विकासासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले तर देशाचा आर्थिक विकास सर्वोच्च स्तरावर जाईल! असे प्रतिपादन मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज ह्या सेवाभावी संस्थेच्या विश्वस्त आणि जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी केले.

जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर पुढे म्हणाल्या की, भारतात ९७ टक्के लोक असंघटित क्षेत्रात काम करतात; ज्यामध्ये ६० टक्क्याहून अधिक महिला आहेत. उदा. महिला शेतकरी, महिला कष्टकरी, रोजंदारी करणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला, महिला कामगार, बांधकाम मजूर महिला. त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात महिला स्वेच्छेने घर सांभाळतात, घरातली सगळी कामे त्या करतात. त्याचे आर्थिक मूल्यमापन केले जात नाही. त्या समर्पित भावनेने अतिशय प्रेमाने आपल्या मुलाबाळांसाठी काम करतात. ते प्रेम मोजायचे कुठलेच मापदंड किंवा निकष सरकार व तज्ञ मंडळी लावू शकणार नाहीत. संघटित क्षेत्रात फक्त ३ टक्के लोक आहेत. ह्यावरून आपल्याला लक्षात येइल की, महिलांचा आपल्या देशाच्या आर्थिक उन्नतीत खूप मोठा वाटा असून तो दुर्लक्षित आहे. तो जर मोजला तर सध्याची जी काही ३ ते ४ ट्रिलियम डॉलरची अर्थव्यवस्था आहे, त्यात वाढ दिसेल!

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दीनानाथ नाट्यगृहात काल झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा आदर सत्कार करणारा-स्त्री सन्मानाचा संगीतमय स्वरसोहळा आदिशक्ती अक्षरशक्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी सुप्रसिध्द विचारवंत व अर्थतज्ञ डॉ. रूपा रेगे नित्सुरे प्रमुख पाहुण्या होत्या. नामवंत कवयित्री, लेखिका व चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील, सुप्रसिध्द नेत्र शल्यविशारद डॉ. चारुता नितू मांडके, दिल के करीब फेम अभिनेत्री सौ. सुलेखा तळवलकर, विलेपार्ले पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. रेणुका बुवा आणि समाजसेविका सौ. रेखाताई डोंबाळे ह्या कर्तृत्ववान महिलांचा ह्यावेळी सत्कार करण्यात आला. जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर ह्यांच्या हस्ते अभिनेत्री सौ. सुलेखा तळवलकर यांचा सत्कार करण्यात झाला.

ह्या कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश कुलकर्णी यांनी जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांचे स्वागत केल्यानंतर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

You cannot copy content of this page