सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल! –प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास

प्रधानमंत्री यांच्या हस्ते देशातील तीन सेमी कंडक्टरच्या सुविधांचा पायाभरणी समारंभ

मुंबई:- माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिप खूप महत्त्वाचे ठरत आहे. भारताचे १९६० पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून भारताला सेमी कंडक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून ग्लोबल हब बनविण्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य सवांद प्रणालीद्वारे गुजरातमधील दोन आणि आसामधील एका सेमी कंडक्टर सुविधेचा रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी श्री. मोदी बोलत होते. यावेळी गुजरातमधून केंद्रीय रेल्वे तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्वनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, टाटा ग्रुपचे नटराजन चंद्रशेखरन, सीजी पॉवरचे वेलायन सुबिह तर मुंबईतून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेकी, आजचा दिवस ऐतिहासिक असून येणाऱ्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. प्रत्येक सेक्टरला सेमी कंडक्टरची आवश्यकता आहे. देशातील युवकांच्या स्वप्नांचा हा कार्यक्रम असून लाखो युवकांना सेमी कंडक्टरमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाचे पूर्ण सेक्टर खुले केल्याने प्रगतीच्या वाटा निर्माण होतील. पहिल्या ते तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्यावेळी भारत विविध कारणाने मागे होता. चौथ्या औद्योगिक क्रांतीने भारत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. दोन वर्षात सेमी कंडक्टरचे स्वप्न होत आहे. भारत सेमी कंडक्टरचे व्यावसायिक उत्पादन करणारा वैश्विक शक्ती (ग्लोबल पॉवर) बनेल. देशात गुंतवणूकदार येण्यासाठी परकीय थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमात बदल केले. इज ऑफ डुईंग बिझनेस वाढविला. इलेक्ट्रॉनिक इको सिस्टीमला प्रोत्साहन दिले. भारत स्टार्ट अप इको सिस्टीममध्ये जगातील तिसरा देश बनल्याचा अभिमान आहे.

देशातील गरिबी कमी करण्यासोबत आधुनिक पायाभूत सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येत असून संशोधनासाठी लाखो रूपये खर्च केले जात आहेत. युवा पिढीने एआयच्या माध्यमातून भाषांतरकार तयार केल्याने माझे भाषण आपल्याला हव्या असलेल्या भाषेत ऐकू शकता. युवकांच्या सामर्थ्याला संधीमध्ये रूपांतर करण्याची ताकद निर्माण करीत आहे, विकसित भारताच्या निर्माणामध्ये सेमी कंडक्टरचे योगदान लाभणार असल्याचा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री श्री. पटेल, आसामचे मुख्यमंत्री श्री. सरमा, टाटाचे श्री. चंद्रशेखरन, सीजी पॉवरचे श्री. सुबिह यांनी विचार व्यक्त केले. गुजरामध्ये ढोलेरिया, सानंद तर आसाममध्ये मोरीगाव येथे सेमी कंडक्टर उत्पादन होणार आहे. भारतातून ६० हजार महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सामील झाले होते तर महाराष्ट्रातून ४८९२ महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे ६ लाख ८६ हजार ९७२ विद्यार्थी सामील झाले होते.

You cannot copy content of this page