शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज रौप्य वर्धापन दिन! देशातील प्रमुख नेत्यांमधील महत्वाचे राजकीय नेते म्हणून शरद पवारांची राजकारणातील-समाजकारणातील वाटचाल हिमालयाएवढी उतुंग आहे. आदर्शवादी आहे. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आजच्या दिवशी शुभेच्छा देताना काही मुद्दे मांडणे आवश्यक आहे.

खरंतर लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षांना संपवण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले. त्यामुळे महाराष्ट्रात प्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी जन्मास घातलेल्या शिवसेनेला फटका बसला. जो गट इडी, आयटी, सीबीआयला घाबरून सत्ताधाऱ्यांच्या कंपूत सामील झाला; त्या गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी इडी, आयटी, सीबीआयची भीती दाखवून राष्ट्रवादी पक्षाचा एक गट फोडला व तो सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट असे दोन गट निर्माण झाले व सत्ताधाऱ्यांनी सगळं काही मॅनेज करून अजित पवारांकडे मूळ पक्ष कसा जाईल; ह्याची दक्षता घेतली.

आमदार- खासदारांची फौज पळाली तरी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उभी राहिली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा राजकीय पक्ष शरद पवार या जाणत्या, कार्यक्षम, कुशल, दूरदृष्टीच्या ध्येयवादी नेत्याने पुन्हा शून्यातून सत्ताधाऱ्यांच्या काळजाचे ठोके वाढविणारे आपले समर्थ अस्तित्व निर्माण केले. ही समर्थता जाणून घेण्यासाठी शरद पवार यांचे सहा दशकातील राजकारण, समाजकारण समजून घेतले पाहिजे. ते समजून न घेता जेव्हा शरद पवारांना सत्ताधारी आणि त्यांचे अंधभक्त महाराष्ट्राचा व्हिलन ठरवितात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. कारण शरदचंद्र पवार यांनी नेहमीच जनतेच्या हिताचे राजकारण केले. सत्ताधारी जेव्हा सत्तेच्या अहंकाराने माजतो तेव्हा तेव्हा तो माज शरद पवार यांनी उतरविला. हे कोणालाही नाकारता येणार नाही.

“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”

शरद पवार यांच्या तुतारीमधील सामर्थ्याने दिल्लीच्या तख्तालाही संविधानावर डोकं ठेवण्यास भाग पाडले. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत राजकारण आणि समाजकारण केले; हे मर्म जाणून घेतले पाहिजे. शरद पवारासारखा प्रचंड अनुभव असलेला नेता जेव्हा ह्या महाराष्ट्रात उभा आहे तोपर्यंत `राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हा पक्ष राज्याच्या- देशाच्या राजकारणात उभारी घेईलच शिवाय राज्यातील जनतेला हितकारक असलेल्या योजना अंमलात येतील; हा विश्वास राज्यातील करोडो जनतेला आहे. शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या साथीने अन्य नेत्यांनीही आपला पक्ष वाढविण्यासाठी केलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे.

-मोहन सावंत

(लेखकाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक तसेच शासनाच्या विविध मंत्री महोदयांच्या आस्थापनेत अनेक वर्षे काम केलेले आहे.)