देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री विराजमान!

मुंबई:- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आझाद मैदानावर घेतली. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यापुढे कार्य करणार असून मुख्यमंत्री होण्याची त्यांची तिसरी वेळ आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री, त्याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चंट, शाखरुख खान, सलमान खान, रनवीन सिंह, विक्की कौशल, माधुरी दिक्षित त्यासह सचिन तेंडुलकर हा देखील या शपथविधीला उपस्थित होता.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच जिजामाता शहाजीराजे भोसले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन

अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांना अभिवादन केले.

दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रालयात आगमन झाल्यावर लाडक्या बहीणींनी औक्षण करून अभिनंदन केले. श्रीमती वैष्णवी जितेंद्र खामकर, श्रीमती मनाली महेश नारकर, श्रीमती शारदा शरद कदम, श्रीमती प्राची प्रफुल्ल पवार, श्रीमती रेखा शेमशोन आढाव या लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले तर श्रीमती लिलाबाई चव्हाण व श्रीमती रेणुका राठोड यांनी पुष्पगुच्छ देवून प्रातिनिधीक स्वरूपात राज्यातील लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन केले.