असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
खेळामुळे जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो! -संदेश पारकर
असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; क्रीडा रसिकांची मोठी गर्दी!
कणकवली- “क्रिकेटसारख्या खेळामधून खेळाडूंना उर्जा मिळते; कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जयाचे पराजयात तर पराजयाचे जयामध्ये रूपांतर होते. त्यामुळे क्रिकेटसारख्या खेळामध्ये सांघिकपणा, सद्भावना, खिलाडू वृत्ती जोपासली जाते. तरूणांच्या जीवनात क्रिकेटमुळे जिद्द, आत्मविश्वास निर्माण होतो!” असे प्रतिपादन कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
असलदे-उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव क्रिडा मंडळच्याववतीने नाईट अंडर आर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, ब्राम्हण देव सवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जेठे, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश लोके, पत्रकार भगवान लोके, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप हरमलकर, हनुमंत वाळके, उत्तम ओटवकर, लक्ष्मण हडकर, गणपत आचरेकर, रघुनाथ लोके, संतोष घाडी, उत्तम सावंत, सचिन हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, असलदे ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे काम सातत्यपुर्वक सुरू आहे. या मंडळाने समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे. तरूणांच्या हाताला विविध उपक्रमांमधून चांगले काम देण्याचा प्रयत्न हे मंडळ करत आहे. कोकणला क्रिडापट्टूचा वारसा लाभला आहे. ते क्रिडापट्टू घडविण्याच्या दृष्टीने हे मंडळ परिश्रम करत आहे. उद्या या स्पर्धांमधून चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कणकवली पोलीस निरीक्षक शशिकांत खोत म्हणाले, जीवनात खेळ हा फार महत्वाचा आहे. मी देखील २५ वर्षे सातत्यपुर्वक हॉलिबॉलसारखा खेळ खेळलो़ अनेक बक्षिसे मला जिंकता आली होती़. त्यामुळे तरूणांनी एकत्र येऊन ही स्पर्धा चांगल्या प्रकारे आयोजित केली आहे. ब्राम्हणदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून तरूण पिढीला व्यासपिठ देण्याचे काम करण्यात आले आहे. चांगलया नियोजनातून तरूणांना क्रिकेटबद्दलचे प्रेम देण्याचे काम ही मंडळी करत आहेत़ ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद, असल्याचे त्यांनी म्हटले.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जेठे, महेश लोके यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. असलदे दशक्रोशीत नाईट सर्कल क्रीकेट स्पर्धा पहिल्यांदाच भरविण्यात आल्याने शेकडो क्रीडा रसिकांनी उपस्थिती दर्शविली होती़. ३५ पेक्षा जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला़ पहाटे उशिरापर्यंत या स्पर्धेचा रणसंग्राम रंगला होता़.