मोहन सावंत यांची भाजप सहकार आघाडीच्या मुंबई कार्यकारिणीवर नियुक्ती!
मुंबई ( प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीच्या मुंबई कार्यकारिणी मंडळावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते मोहन सावंत यांची नियुक्ती मुंबईचे अध्यक्ष सुनिल बांबुळकर यांनी केली आहे. आज दादर, मुंबई येथे झालेल्या भाजपा सहकार आघाडीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाची सहकार आघाडी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबईतही सहकार आघाडीचे कार्य अधिक व्यापक आणि सक्षम करण्यासाठी मुंबईचे अध्यक्ष सुनिल बांबुळकर नेहमीच अग्रस्थानी असतात. आज दादर येथे भारतीय जनता पक्षाची सहकार आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई कार्यकारिणी मंडळावर मोहन सावंत यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्ष सहकार आघाडी मुंबईचे महामंत्री सुधाकर कदम यांनी मोहन सावंत यांचा परिचय करून दिला. मोहन सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबईचे अध्यक्ष सुनिल बांबुळकर व मुंबईचे महामंत्री सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी सहकार क्षेत्रात कार्यक्षमतेने कार्य करणार आहे. मला सहकार क्षेत्रात कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल मी वरिष्ठांचा आभारी आहे. त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास कार्यातून सार्थकी लावीन!”
श्री. मोहन सावंत हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांना आरोग्य विभाग, राज्य निवडणूक आयोग, मंत्रालय, राज्य महिला आयोग, म्हाडा येथे विविध शासकीय पदांवर काम केल्याचा दीर्घ अनुभव आहे. तसेच अनेक सहकारी संस्था व सेवाभावी सामाजिक संस्थांवर ते कार्य करीत आहेत. ते पाक्षिक `स्टार वृत्त’ ह्या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणूनही काम पाहतात. मोहन सावंत उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आणि आणि ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आहेत. त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दांडगा संपर्क आहे.
मोहन सावंत यांची भाजपच्या सहकार आघाडीत मुंबई कार्यकारिणीवर निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.