चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई:- भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण राहिला. कृष्ण-धवल काळ ते रंगीत आणि अलिकडच्या तांत्रिकदृष्ट्या आधुनिक प्रवाहात ते कार्यशील राहिले. ते चित्रपट सृष्टीतील बदलाचे, भरभराटीपासून ते आतापर्यंतच्या काळाचे महत्वाचे साक्षीदार राहिले. नायक म्हणून तरूण वयात सालस, स्वप्नाळू नायक ते विविध चित्रपटात वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी अभिनयाने आयकॉनिक ठरवल्या. शोले चित्रपटातील पडद्यावरील वीरू प्रमाणेच ते प्रत्यक्षातही मैत्र जपणारे होते. सहृदय आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारे, अनेकांसाठी आधार, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या क्षेत्रातील ज्येष्ठत्व ते तितक्याच उमद्यापणाने मिरवत असत. मध्यंतरी त्यांनी लोकसभेत खासदार म्हणून बिकानेरचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यांनी चित्रपटसृष्टी आणि अभिनय, या क्षेत्रातील प्रयोगशीलता यांनाच अधिक प्राधान्य दिले. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. एकाच वर्षांत ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपट सृष्टीत सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने आपल्या चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांसह, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून त्यांना ईश्वराने आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड! -उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई:- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले, ‘चुपके चुपके, ‘अनुपमा, ‘सत्यकाम, ‘दिल्लगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’ मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबिय, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री पवार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.











