आरोग्य विभागाअंतर्गत बदल्या, पदोन्नतीसाठी ‘SHSRC’ चे मूल्यांकन प्रमाण मानावे

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना

मुंबई:- सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (SHSRC) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. या संदर्भात परिषद सभागृह, मंत्रालय येथे नवीन तांत्रिक कोर्सेस, नवीन प्रशिक्षणांचे नियोजन, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि तांत्रिक कर्मचारी यांचे परराज्यात, परदेशातील शैक्षणिक दौऱ्यांचे नियोजन, नवीन प्रशिक्षण नियोजन, सेवानिवृत्त संचालक, आरोग्य सेवा यांनी केलेल्या दौऱ्यातील निरीक्षण त्या अनुसार करावयाची कार्यवाही, ‘SHSRC’ च्या जागेचे नूतनीकरण, पदभरती सद्यस्थिती, SHSRC निधी उपलब्धता आदी विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या सूचना करण्यात आल्या.

केंद्र सरकारची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (NHSRC) नवी दिल्ली’ ही संस्था देश पातळीवर आरोग्य विभागास तांत्रिक सहकार्य करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, पुणे’ ही संस्था कार्यरत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढ, आरोग्यविषयक संशोधन व तांत्रिक सहकार्य या संस्थेच्या वतीने देण्यात येते. आरोग्य विभागामार्फत ‘SHRC’ संस्था राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करते. तसेच त्यांच्या कामगिरीवर आधारित गुणवतेनुसार दरमहा (रँकिंग) गुणानुक्रम देत असते. या रँकिंग प्रणालीमध्ये प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय बाबींचा समावेश असतो. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली, बढती करताना, कामगिरीवर आधारित मूल्यांकन (रँकिंग) प्रणालीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य सेवेचे कामकाज अधिक पारदर्शक होईल.

राज्यातील आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध होत असतो. या निधीबरोबरच नागरिकांना आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबीलिटी (CSR) च्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने CSR देणाऱ्या संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM) व जिल्हा लेखा व्यवस्थापक (DAM), NHM सल्लागार व NHM कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात. भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. असे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले,

यावेळी पदभरती, मानव संसाधन सुसूत्रीकरण, अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या संस्थाच्या बाबतचे सादरीकरण करण्यात आले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, सह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत, सह संचलिका डॉ. सरिता हजारे, माजी महासंचालक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. मोहन जाधव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!