सिंधुदुर्गात प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन – पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन
संविधानामुळे भारताची जागतिक ओळख; लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे आवाहन!
सिंधुदुर्गनगरी दिनांक २६ (जिमाका):- “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे भारताची ओळख जगात सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून निर्माण झाली आहे. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरवले जाते. भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया दीर्घ, सखोल आणि लोकशाही मूल्यांवर आधारित होती. सुमारे २ वर्षे ११ महिने १८ दिवस चाललेल्या या प्रक्रियेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतासाठी योग्य अशा तरतुदी संविधानात समाविष्ट करण्यात आल्या. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान मंजूर झाले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले. या संविधानामुळे नागरिकांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये मिळाली. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून देशाचा आत्मा असून सर्व नागरिक समान असल्याचा संदेश या संविधानामधून देण्यात आला!” असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
पोलिस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या संदेशात प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचे स्मरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांना कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह निमित्त आणि बालविवाह मुक्त करण्याच्या अनुषंगाने शपथ दिली.
श्री राणे म्हणाले की, प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. कायद्याचे पालन करणे, जात-धर्म विसरून माणुसकी जपणे, स्त्री-पुरुष समानता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि देशाची एकता टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार २५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला. जिल्ह्यात ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून गावांचा विकास घडतो. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने निर्भयपणे व उत्साहाने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गौरव आणि सत्कार-
सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 च्या निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आले.
सण २००२ मध्ये उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेले डॉ. मोहन दहिकर यांनी दीर्घ, निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेद्वारे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून राष्ट्रपती पदक (Medal for Meritorious Service) जाहीर झाल्याने पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
मुख्याध्यापक कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी ता. सावंतवाडी या प्रशालेचा विद्यार्थी सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर, आंबोली पब्लिक स्कूल आंबोली, आंबोली विद्यानिकेतन आंबोली ता. सावंतवाडी या प्रशालेचा विद्यार्थी सार्जंट. संस्कार सुशांत धुरी व मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आणि ज्यू, कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स व्होकेशनल अॅण्ड सायन्स फोंडाघाट ता. कणकवली या प्रशालेची विद्यार्थीनी कु. मनस्या निलेश फाले यांनी सन २०२५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय थल सैनिक शिबीरामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर रायफल शुटींगमध्ये सुवर्णपदक मिळवून तसेच नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढवून मुख्यमंत्री शिष्यवृत्ती मिळवल्याबद्दल पालकमंत्री महोदयांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना पुरस्काराचे स्वरूप (प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह)
१) सार्जंट, अनंत अभिजीत चिंचकर
२) सार्जंट. संस्कार सुशांत धुरी
३) कु. मनस्या निलेश फाले
प्रशिक्षकांना पुरस्कार-
१) श्री. गोपाळ गवस, NCC अधिकारी प्रशिक्षक 1st ऑफिसर
२) श्रीम. आर्या भोगले NCC अधिकारी प्रशिक्षक 2nd ऑफिसर
३) श्री. निखिल तेली, NCC अधिकारी प्रशिक्षक
न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, सिंधुदुर्गनगरी या शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतांवर सामुहिक कवायतीचे सादरीकरण यावेळी झाले. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने दहशतवादी हल्लाविषयी प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले.











