संपादकीय… गोगुंडातील तिरंगा- बंदुकीवर संविधानाचा विजय!

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गोगुंडा हे गाव आजवर नक्षलवादी हिंसाचार, भीती आणि रक्तरंजित संघर्षांचं प्रतीक होतं; परंतु प्रजासत्ताक दिनी ह्याच गोगुंडामध्ये अभिमानानं फडकलेला तिरंगा हा केवळ एका गावातील घटना नाही; तो भारतीय लोकशाहीच्या सहनशक्तीचा, संविधानाच्या ताकदीचा आणि आशेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण आहे!

अनेक दशकांपर्यंत गोगुंडातील लोकशाही पुस्तकांपुरती मर्यादित होती. सूर्यास्तानंतर गावात पसरलेली शांतता भीतीने ग्रासलेली असायची. नक्षलवाद्यांच्या जनअदालत, खंडणी, धमक्या आणि हिंसाचाराने सामान्य माणसाचं आयुष्य बंदी बनवलं होतं. शाळा बंद, रस्ते अपूर्ण आणि विकास योजना कागदांवरच अडकलेल्या; अशा परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्याचा विचारही गुन्हा मानला जात होता. या जंगलांनी राष्ट्रगीत कधी ऐकलंच नव्हतं! इथल्या आदिवासींसाठी संविधान हे पुस्तकातलं स्वप्न होतं. शाळा बंद, रस्ते अपूर्ण, आरोग्य सेवा नामशेष आणि प्रशासन केवळ फाईलपुरतं मर्यादित होतं! त्यामुळे नक्षलवादाने आपली मुळं रोवली. बंदूक आली. राज्यव्यवस्थेने अनेक वर्षं आदिवासींना केवळ “समस्या” म्हणून पाहिलं, नागरिक म्हणून नाही. विकासाच्या नावाखाली जंगल, जमीन आणि पाणी हिरावलं गेलं; पण बदल्यात शिक्षण, रोजगार आणि सन्मान दिला गेला नाही. अशा वेळी नक्षलवाद हा पर्याय नव्हता; तो परिणाम होता. बंदूक ही मुळात पोटातून जन्माला आलेली भाषा होती! ती संविधान स्थापित लोकशाही देशाला परवडणारी व साजेशी नाही.

मात्र गोगुंडामध्ये कायमस्वरूपी सुरक्षा छावणी स्थापन झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली. सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी नक्षलवादी हिंसाचारावर नियंत्रण मिळालं. पण या यशाचं खऱ्या अर्थानं महत्त्व हे केवळ बंदुकीच्या जोरावर नाही, तर विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहे. सुरक्षा दलांनी वैद्यकीय शिबिरे, शालेय उपक्रम आणि संवादाच्या माध्यमातून लोकांशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. `शांतता ही भीतीतून नव्हे, तर विश्वासातून जन्माला येते!’ हा संदेश गोगुंडात प्रत्यक्षात उतरलेला दिसतो! गोगुंडातील तिरंगा टिकवायचा असेल, तर केवळ कॅम्प आणि कॉम्बिंग पुरेसे नाहीत. शाळा कायमस्वरूपी सुरू राहिल्या पाहिजेत, आरोग्य केंद्रे माणसांनी भरली पाहिजेत, वनहक्क कायदा कागदावर नव्हे तर जमिनीवर उतरला पाहिजे आणि आदिवासींच्या निर्णयांमध्ये त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. अन्यथा तिरंगा उंच फडकेल, पण माणूस झुकलेलाच राहील! प्रजासत्ताक दिनी फडकलेला तिरंगा हा केवळ ध्वज नव्हता. तो अनेक वृद्धांच्या डोळ्यातील अश्रू, महिलांच्या चेहऱ्यावरील अभिमान आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यातील विश्वासाचं प्रतीक होता. आयुष्यभर भीतीत जगलेल्या नागरिकांनी प्रथमच सार्वजनिकरित्या `जन गण मन…’ ऐकणं, हीच लोकशाहीची खरी अनुभूती आहे. हा अभिमानाचा क्षण आहेच; पण तो आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्नही विचारतो… ह्याला इतकी दशकं का जावी लागली?

तरीही हा क्षण अंतिम विजय मानण्याची चूक होता कामा नये. नक्षलवाद ही केवळ सुरक्षा समस्या नाही; ती सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक अपयशातून जन्मलेली समस्या आहे. गोगुंडातील तिरंगा टिकवायचा असेल, तर रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि स्थानिक स्वराज्य या सर्व आघाड्यांवर सातत्यपूर्ण काम आवश्यक आहे. अन्यथा, इतिहास पुन्हा आपली पुनरावृत्ती करायला वेळ लावणार नाही! आज गोगुंडा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो; लोकशाहीची मुळे कितीही खोल दडपली गेली, तरी ती पूर्णपणे नष्ट करता येत नाहीत. योग्य वेळी सुरक्षा, संवेदनशील प्रशासन आणि विकासाची जोड मिळाली, तर बंदुकीवर संविधानाचा विजय अटळ ठरतो. गोगुंडात फडकलेला तिरंगा हा केवळ एका गावाचा अभिमान नाही; तो संपूर्ण देशासाठीचा संदेश आहे… `भारतामध्ये अखेरीस विजय लोकशाहीचाच होतो!’

error: Content is protected !!