अत्याधुनिक ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी उद्घाटन!
जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देणाऱ्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी उद्घाटन!
कणकवली- कोकणचे प्रमुख राजकीय पुढारी, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून अवतरलेला जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देणाऱ्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी सकाळी ११ वा. उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला देश पातळीवरील काही राष्ट्रीय नेते, राज्यातील मंत्री, विविध राजकीय पक्षांचे महनीय नेते तसेच मान्यवर उद्योगपती तसेच प्रख्यात डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.
पडवे येथील या लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे निर्माते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी बुधवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या सिंधुदुर्ग महिला भवन येथे झालेल्या बैठकीत हॉस्पिटलच्या उद्घाटनाची घोषणा केली. यावेळी आ. नितेश राणे उपस्थित होते. सर्वप्रकारच्या रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा व वैद्यकीय उपचार देणा-या या जागतिक दर्जाच्या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळाही देशात यापूर्वी कधीही न झालेला अशा प्रकारे न भुतो, न भविष्यती असा आगळा वेगळा व भव्यदिव्य होईल, असा विश्वासही खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वश्रेष्ठ व अव्वल ठरावे अशा दृष्टीने त्याची उभारणी करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी तीन वर्षे लागली. परदेशातील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे हॉस्पिटलमध्ये बसविण्यात आलेली आहेत. अंधेरी व बांद्रा येथील दोन हॉस्पिटलचे मालक असलेले मुंबईतील प्रख्यात डॉ. नामजोशी यांनी मंगळवारी या हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी असा प्रकल्प आपण देशातच नव्हे तर परदेशातही पाहिलेला नाही, असे गौरवोद्गार काढल्याचे खा. नारायण राणे यांनी अभिमानाने सांगितले. आता प्रकल्प पूर्ण झाला असून २७ मेपासून हॉस्पिीटल सुरु होत आहे. जून महिन्यात मेडिकल कॉलेजही सुरु होईल.
सदर रुग्णालयाची वैशिष्ट्य:
१) भारत देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर अव्वल ठरेल अशा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि दर्जेदार परदेशी उपकरणांनी परिपूर्ण असलेल्या ६५० बेडच्या लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची उभारणी पूर्ण!
२) जागतिक दर्जाची हॉस्पिटल नगरी कसालपासून जवळच असलेल्या पडवेच्या माळरानावर उभी राहिली आहे.
३) हा प्रकल्प उभारण्यासाठी तीन वर्षे लागली. परदेशातील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे हॉस्पिटलमध्ये बसविण्यात आलेली आहेत. २७ मेपासून हॉस्पिीटल सुरु होत आहे. जून महिन्यात मेडिकल कॉलेजही सुरु होईल.