‘पीएमएसबीवाय’अंतर्गत २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५ हजार ११५ विमाधारक

नवी दिल्ली:- देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ हजार ८५० खेड्यांमध्ये २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील उद्दिष्टित १९२ खेड्यांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने देशातील गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जाणारी ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ १ जून २०१५ पासून सुरु करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उद्घाटन केले. योजनेनुसार वार्षिक १२ रूपये इतका प्रीमिअम असून अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबियांस २ लाख रूपये किंवा अपघातात दुखापत झाल्यास उपचारासाठी १ लाख रूपये देण्यात येतात. बँक खाते असणारी १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेस पात्र ठरते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्या वतीने या योजनेची अंमलबजाणी सुरु असून मागास खेड्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत देशभरातील उद्दिष्टित २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेड्यांमधे या योजनेच्या माध्यमातून २६ लाख ११ हजार ७८७ लोकांचा विमा उतरविण्यात आला आहे.

विदर्भात सर्वात जास्त ३२ हजार ६६८ विमाधारक

ही योजना राबविण्यासाठी राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांतील १९२ खेड्यांची निवड करण्यात आली व पीएमएसबीवाय योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्ह्यांतील १४० खेड्यांतील ३२ हजार ६६८ लोकांचा विमा उतरविण्यात आला. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यातील ३९ खेड्यांतील ६ हजार ९९२, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील ९ खेड्यांतील २०९७ लोकांना आणि खान्देशातील दोन जिल्ह्यातील ३ हजार ३५८ जणांना विमा सुरक्षा देण्यात आली आहे.

पीएमएसबीवाय योजनेंतर्गत विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त विमा उतरविण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील ८ खेड्यांतील १२ हजार २६७ जणांचा विमा उतरविण्यात आला आहे. यासोबत अकोला जिल्ह्यातील ३४ खेड्यांमधील २ हजार ७३६, अमरावती जिल्ह्यातील २५ खेड्यांमधील ८०१ हजार ८९०, भंडारा जिल्ह्यातील ७ खेड्यांतील १ हजार ३१६, बुलडाणा जिल्ह्यातील २२ खेड्यांतील ४ हजार ९८४, चंद्रपूर जिल्ह्यातील ७ खेड्यांतील ४ हजार १५६, नागपूर जिल्ह्यातील ४ खेड्यांतील १हजार ११, गोंदिया जिल्ह्यातील ३ खेड्यांतील ३१९, वाशिम जिल्ह्यातील १५ खेड्यांतील १ हजार ४४१, यवतमाळ जिल्ह्यातील १३ खेड्यांतील १ हजार ११३ आणि वर्धा जिल्ह्यातील २ खेड्यांतील ४३५ जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे.

मराठवाड्यात ६ हजार ९९२ विमाधारक

या योजनेंतर्गत मराठवाडा विभागात लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त १ हजार ६३६ जणांचा विमा उतरविण्यात आला या जिल्ह्यातील ७ खेड्यांमध्ये ही अंमलबजावणी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील एका खेड्यातील ३४१, बीड जिल्ह्यातील ३ खेड्यांतील ५०८, हिंगोली जिल्ह्यातील ५ खेड्यांतील ८०१, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ खेड्यांतील १ हजार १२५, नांदेड जिल्ह्यातील २० खेड्यांतील १ हजार ६११ आणि जालना जिल्ह्यातील एका खेड्यातील ९७० जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात २ हजार ९७ विमाधारक

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत सर्वात जास्त १ हजार १३५ जणांचा विमा उतरविण्यात आला आहे, या जिल्ह्यात एकूण ७ खेड्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात ५६५ व कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेड्यात ३९७ जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे .

अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त २ हजार ७२९ जणांचा विमा उतरविण्यात आला. या जिल्ह्यातील ३ खेड्यांमध्ये ही अंमलबजावणी झाली. जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यामध्ये या योजनेंतर्गत ६२९ जणांचा विमा उतरविण्यात आला आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *