हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी अर्धा कोटी हरित सेनेची फौज सज्ज

हरित सैनिकांच्या नोंदणीने पार केला अर्ध्या कोटीचा टप्पा!

मुंबई : हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात ५० लाख १२ हजार ७६६ हरित सेनेची फौज सज्ज झाली असून यामध्ये वैयक्तिक नोंदणीसह संस्थात्मक नोंदणीचाही समावेश आहे.

लोकसहभागातून महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन वाढावे, वृक्ष आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी १ कोटीची हरित सेना निर्माण करण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प आहे. त्यांच्या या संकल्पाला राज्यभरातून मोठे बळ मिळत असून अर्ध्या कोटीपर्यंतची वाटचाल लोकांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. नोंदणी झालेल्या हरित सैनिकांमध्ये १९ लाख ८८ हजार ९३८ वैयक्तिक हरित सैनिक आहेत तर ३० लाख २३ हजार ८२८ हरित सैनिक हे संस्थात्मक स्वरूपातून सदस्य झाले आहेत.

हरित सैनिक नोंदणीत मराठवाडा अग्रेसर

नेहमी पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याने हरित सैनिकाच्या नोंदणीत मात्र पुढाकार घेतला आहे. लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असून जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख १५ हजार २७० जणांनी ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

त्यापाठोपाठ उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात ४ लाख १ हजार १०५ जणांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. तिसऱ्या क्रमांकावर बीड जिल्हा आहे. येथे ३ लाख ५५ हजार ५७१ हरित सैनिक आहेत. हरित सैनिकाच्या नोंदणीत पहिले तीन ही जिल्हे मराठवाड्यातील आहेत. इथे वारंवार भेडसावणारी पाणीटंचाई दूर व्हावी, येथील वृक्षाच्छादन वाढावे आणि दुष्काळाला हद्दपार करता यावे यासाठी मराठवाड्याच्या जनतेने घेतलेला हा पुढाकार निश्चित कौतुकास्पद आहे.

हरित सैनिकांच्या नोंदणीमध्ये नाशिक २ लाख ७९ हजार १११ हरित सैनिकांसह चौथ्या स्थानावर आहे तर २ लाख ३६ हजार ३०४ नोंदणीसह चंद्रपूर राज्यात पाचव्या स्थानावर आहे.

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा त्याचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे म्हणून वन विभागाने ‘महाराष्ट्र हरित सेना’ स्थापन करण्याचे निश्चित केले आणि राज्यभरातून त्याला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. या चळवळीत सहभागी होण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in या तसेच http://www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक हा देशांच्या सीमांचे रक्षण करतो तर हरित सेनेच्या माध्यमातून हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारलेला सैनिक हा खऱ्या अर्थाने पर्यावरण संरक्षणाचा दूत म्हणून काम करत असल्याचे वनमंत्री सांगतात.

वन विभागाने हरित सेनेच्या स्वंयसेवकांची भूमिका स्पष्ट करताना त्यांचा सहभाग अपेक्षित असलेली क्षेत्र निश्चित करून दिली आहेत. जसे वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरिता सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात वन वणवा विझवण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग, वन्य प्राण्यांच्या गणनेत सहभाग, वन विभागामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन यासारख्या दिन विशेषांच्या कार्यक्रमात, वनमहोत्सव, वन्यजीव सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात हरित सेनेच्या सदस्यांना सहभागी होता येणार आहे. हरित सेनेच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर या सर्व विषयांची सविस्तर माहिती मिळते. शिवाय याठिकाणी वन विभागाची दिनदर्शिकाही देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेप्रमाणेही हरित सेनेचे सदस्य कार्यक्रम घेऊन पर्यावरण-वन रक्षणात आणि संवर्धनात आपले योगदान देऊ शकतात. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *