मुख्यमंत्री फडणवीसांनी केले इलेक्ट्रिक कारचे लोकार्पण
मुंबई:- पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंग बॅटरीवरील कार गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री डॉ.हर्षवर्धन, युनायटेड नेशनमधील पर्यावरणचे कार्यकारी संचालक एरिक सोलहेम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, व्यवस्थापकीय संचालक डॉ.गोयंका, महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेशबाबू, झूम कारचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेक मॉरन, परिवहन आयुक्त शेखर चन्ने आणि अभिनेत्री दिया मिर्झा आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह व सामान्य प्रशासनचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे इलेक्ट्रिक गाड्यांची चावी सुपुर्द करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासह प्रमुख पाहुण्यांनी इलेक्ट्रिक कारमधून गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरफटका मारला.
ईईएसएल (एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड), टाटा मोटर्स व महिंद्रा ॲन्ड महिंद्रा यांच्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. (‘महान्यूज’ )