गुहागर- सुंदर समुद्र किनाऱ्यासह विलोभनीय पर्यटन स्थळ!

कोकणचा समुद्र किनारा म्हणजे निसर्गाचे सर्वोच्च वरदान! ह्या समुद्र किनाऱ्यावरती अनेक गावे आज जगाच्या नकाशावर आपले स्थान भक्कम करीत आहेत. कारण प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य फार वेगवेगळे आढळते. ते पर्यटकांच्या नजरेत पटकन भरते आणि पर्यटक पुन्हा पुन्हा येत राहतात. असाच एक निसर्ग संपन्न गाव; त्याचे नाव गुहागर!

मुंबईहून चिपळूणमार्गे गुहागरला आपण जाऊ शकतो. गुहागरला स्वच्छ सुंदर नारळी पोफळीच्या बागा असलेला समुद्रकिनारा लाभला आहे. पर्यटक इथे एप्रिल, मे महिन्यात गर्दी करतात. उन्हाळात कोकणमेवा आंबे, काजू, फणस, मोठ्या प्रमाणात आपल्याला खायला मिळतात. गावाकडे सुट्टीत आलेले चाकरमानी व पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटतात.

गुहागरमध्ये मच्छीमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. लहान मोठ्या होड्या ह्या किनाऱ्यावर ताजे मासे विक्रीसाठी ठेवतात. हॉटेलसुद्धा इथे भरपूर आहेत; परंतु घराघरात राहण्याची व जेवणाची सोय पर्यटकांना भुरळ घालते. पर्यटकाच्या आवडीप्रमाणे मासे त्यांना मिळतात.

गुहागर हे गाव वरचा पाट खालचा पाट अश्या दोन विभगात विभागला गेला आहे. गुहागरला अनेक प्राचीन मंदिरे आहेत. दुर्गादेवी मंदिर, उफराटा गणपती मंदिर, व्याडेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आहे. गुहागरवरून तुम्ही दाभोळ वीज प्रकल्पला भेट देऊ शकता. गुहागरपासून हेदवीचा श्री दशभुजा गणेश मंदिर अंदाजे २० ते २५ किलोमीटर आहे. वेर्नेश्वर मंदिर गुहागरपासून अंदाजे २० ते २१ किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरचा समुद्रकिनारा पावसाळ्यात तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेच. गुहागर गाव व त्याच्या आजूबाजूचा परिसर तुमच्या आनंदासाठी तुमची वाट पहात आहे.

-नियतीविरा कंटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *