मुठवली गावच्या ‘कडू’ कारल्याची ‘गोड’ कहाणी
कडू कारले, हे त्याच्या कडूपणाबद्दल खरे तर बदनाम आहे. पण या कडू कारल्यांमुळे एखाद्या गावात परिवर्तन घडू शकतं, आणि त्यातून त्यांचे जीवनमान उंचावून रोजगारासाठी स्थलांतरासारखे सामाजिक प्रश्नही निकाली होऊ शकतात, यासारखी गोड बातमी नाही. कडू कारल्यामुळे ही गोड कहाणी घडलीय ती मुठवलीतर्फे तळे ता. माणगाव या गावात. इथल्या शेतकऱ्यांनी समूह शेतीतून ही किमया साधली. मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत शासनाचा कृषि विभाग, आत्मा अशा विविध विभागांच्या तांत्रिक सहाय्यातून आता हा यशाचा गोडवा येथील शेतकरी चाखत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींमधील ५६ गावांचा समावेश आहे. त्यात माणगाव तालुक्यातील मुठवलीतर्फे तळे या ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत मुठवलीतर्फे तळे, निवी, उमरोली दिवाळी ही गावे येतात. मुठवली व निवी या गावाजवळून वर्षभर नदी वाहते. या नदीच्या पाण्यावर वनराई बंधारे घालून गेल्या पाच ते सहा वर्षापासून पंधरा ते वीस एकर क्षेत्रावर कारले व भाजीपाला लागवड केली जात आहे. कृषि विभाग पंचायत समिती, स्वदेश फाऊंडेशन मार्फत शेतकऱ्यांना डिझेल इंजीन, पाईप, मंडपासाठी जाळी देण्यात आली व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. तसेच शेतकरी संकरीत कारले पिकाची लागवड करीत आहेत व कारले पिकास चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी ह्या पिकाकडे वळले आहेत.
यावर्षी (सन २०१७-१८ मध्ये) ६४ शेतकऱ्यांनी ८२ एकर क्षेत्रावर अमनश्री व अभिषेक या संकरीत कारले वाणाची लागवड केली होती व त्याचे उत्पादनही एकरी ५-६ टन असे चांगल्या प्रकारे मिळाले. तसेच खर्च वजा जाता एकरी १ लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळाला. नुकतेच झालेल्या क्षेत्र भेटीत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सुब्रमण्यम यांनी या शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतूक केले. या गावात उत्पादित होणारी कार्ली निर्यातक्षम प्रतीचे आहेत. त्यामुळे व्यापारी हा माल प्रत्यक्ष शेतावर येऊन खरेदी करीत आहेत. महाराष्ट्र स्पर्धाक्षम प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी पॅक हाऊस तसेच भाजी पाल्याचे उत्पादन शहरी मार्केट पर्यंत नेण्यासाठी सरकारी विक्रीसाठीची व्हॅन या प्रकल्पांतर्गत मंजूर असून आत्मा योजने अंतर्गत १३ लाख ५० हजार एवढे अनुदान मंजूर आहे. ही व्हॅन या शेतकऱ्यांना मिळाल्यास ते थेट लांबच्या बाजारात आपला माल नेऊन अधिक फायदा मिळवू शकतील.
मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत या शेतकऱ्यांना शासनाकडून आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन होत आहे जेणे करुन या भागात कारले पिकाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास तसेच रहाणीमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. पुढील टप्प्यात ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियाना अंतर्गत १०० एकर क्षेत्राचा समावेश करून या गावामध्ये गट शेती उपक्रम राबवण्याचा मानस या अभियानाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांची तयारी असून पुढील वर्षासाठी ३० नवीन लाभार्थी कारले लागवड करण्यास उत्सूक आहेत. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत पुणे येथे आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा वापर पाहण्यासाठी किसान प्रदर्शनासाठी शेतकऱ्यांची सहल आयोजित केली होती. याचा त्यांना शेती करीत असताना फायदा झाला. आता शेतकरी दुबार पीक पद्धतीकडे वळत असून त्यामुळे या भागातून रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.
-डॉ. मिलिंद मधुकर दुसाने (प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, रायगड- अलिबाग) ‘महान्यूज’