दोन हजार कोटींच्या अप्पर प्रवरा प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला

नवी दिल्ली:- राज्यातील अप्पर प्रवरा (निळवंडे-२) या जलसिंचन प्रकल्पाचा २ हजार २३२ कोटी ६२ लाखांचा प्रस्ताव केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाने स्वीकारला आहे.

केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाचे सचिव यु.पी.सिंह यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने बुधवारी देशातील ६ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील ८४ हजार ७४८ कोटी खर्चाच्या दोन मोठ्या प्रकल्पांसह पूर व्यवस्थापनाशी संबंधित ४ प्रकल्पांचे प्रस्ताव स्वीकारले आहेत. यात तेलंगनातील काळमेश्वर आणि महाराष्ट्रातील अप्पर प्रवरा या मोठ्या जलसिचंन प्रकल्पांचा समावेश आहे.

अप्पर प्रवरा अर्थात निळवंडे – २ प्रकल्पांतर्गत २ लाख १२ हजार ७५८ एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून प्रकल्पातून या भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्याकडून २ हजार २३२ कोटी ६२ लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रालयाच्या सल्लागार समितीने मंजुरी दिली आहे.

मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये तेलंगानातील काळमेश्वर व महाराष्ट्रातील अप्पर प्रवरा या महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांचा तर बिहार मधील महानंदा पूर व्यवस्थापन योजना, हिमाचल प्रदेशातील शीर खंड प्रकल्प, पाँडेचेरीतील यनम पूर संरक्षण कार्य आणि पश्चिम बंगाल मधील घाटल योजनेचा समावेश आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *