नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘पत्रकार दिन’ साजरा

बाळशास्त्री जांभेकरांनी समाजाला आकार देण्याचे कार्य केले-अभिनेते मनोज जोशी

नवी दिल्ली:- पत्रकार व वृत्तपत्र हे समाजाला आकार देण्याचे काम करीत असतात. मराठीतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित करून बाळशास्त्री जांभेकर यांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते मनोज जोशी यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अभिनेते मनोज जोशी, परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी, दैनिक केसरीचे विशेष प्रतिनिधी कमलेश गायकवाड यांच्यासह उपस्थित कर्मचारी यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

श्री.जोशी म्हणाले, ज्याप्रमाणे कलाकार कलेला आकार देतो, प्रवचनकार प्रवचनाला आकार देवून समाजाला आकार देतो तसे पत्रकार व वृत्तपत्र हे समाजाला आकार देण्याचे काम करीत असतात. मराठीतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित करून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजाला आकार देण्याचे कार्य केले आहे. श्री. जोशी यांनी श्री. जांभेकरांच्या योगदानावर प्रकाश टाकला व समस्त पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र काढून मराठी वृत्तपत्राचा भक्कम पाया रचला. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून जांभेकर यांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या या योगदानासाठी त्यांचा जन्मदिन ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *