शिवनेरी सेवा मंडळ मार्फत आयोजित राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा
सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवनेरी सेवा मंडळामार्फत
राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार!
मुंबई:- शिवनेरी सेवा मंडळाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने १९ ते २७ फेब्रुवारी २०१९ दरम्यान राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी व खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यासह महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वात गेली पन्नास वर्षे राज्यस्तरीय व्यवसाय कबड्डी आणि खो-खो स्पर्धेचे आयोजन अतिशय नियोजन पद्धतीने करून शिवनेरी सेवा मंडळाने अनेक नामवंत व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविले आहेत.
शिवनेरी सेवा मंडळाच्या नवरात्रौ उत्सवामध्ये नियमित सालाबादप्रमाणे होणारे कबड्डी सामने हे कै. राजाराम शेट लाड यांच्या स्मरणार्थ नियोजित करण्यात येतात. मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. उदय लाड, प्रमुख सचिव श्री. विष्णू तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी सभासद सुवर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत.
सलग पन्नास वर्षे अशा पद्धतीने क्रीडा महोत्सव साजरा करणाऱ्या शिवनेरी सेवा मंडळामार्फत १९ ते २७ फेब्रुवारी २०१९ दरम्यान भवानीमाता क्रीडांगण दादर पूर्व येथे ह्या स्पर्धा होणार असून अनेक राज्य पातळीवरील नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे. देश-विदेशात अष्टपैलू कामगिरी करून ओळख निर्माण करणारे अनेक खेळाडू दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सहभागी होणार असून क्रीडारसिकांना नामवंत खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळणार आहे.
दिवंगत लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक कै. मोहन नाईक यांनी शिवनेरी सेवा मंडळाची स्थापना पन्नास वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननिय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते केली होती. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमासह क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षणाचेही गेली पन्नास वर्ष मंडळामार्फत आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा तर २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न होणार आहेत. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर, शिवसेना नेते खासदार राहुल शेवाळे, शिवनेरी सेवा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनिषा कायंदे, नगरसेविका उर्मिला पांचाळ तसेच मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी-सभासद, परिसरातील सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, नामवंत खेळाडू, क्रीडारसिक उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवनेरी सेवा मंडळाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका श्रीमती सुयोगी नाईक यांनी केले आहे.