गंभीर आजार आणणारी साखर!
गोड चव येण्यासाठी सर्वात जास्त साखरेचाच वापर केला जातो. ती साखर मानवी शरीरास किती अपायकारक आहे; ह्याची जाणीव थोडीफार का होईना, पण प्रत्येकास आहे. तरीही आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून साखरेचं सेवन करतोच. त्यामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी सुद्धा आरोग्यावर झालेल्या व्याख्यानातून ह्याची सविस्तर माहिती दिली आहेच. तरीही
आपण ह्या लेखातून साखरेबद्दल माहिती घेऊ या!
उसापासून साखर बनविली जाते हे सर्वांना माहिती आहेच. ह्या उसाचा उल्लेख वेद काळामध्ये असून भारतीयांना ह्या ऊसाने आपलंसं केलं. उसापासून गुळ, काकवी बनविले जायचे. पण आता साखरेच उत्पन्न घेतलं जातं. पुर्वी साखर महाग आणि गुळ स्वस्त असायचा; आता मात्र परिस्थिती उलट आहे. साखर गुळापेक्षा स्वस्त आहे आणि प्रत्येक पदार्थामध्ये साखर घालण्याचं प्रमाण वाढलंय किंवा साखरेचं खाणं
वाढलंय. ही सवय मानवाला मुद्दामहून लावली गेली आणि आम्ही त्या साखरेचे गुलाम झालो. ज्या परमात्म्याने आम्हाला अतिशय सुंदर अद्भूत असं शरीर दिलेलं आहे, त्या शरीरावर विषासारखं काम करणाऱ्या साखरेपासून मुक्तता मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जे पदार्थ खातो त्यामधून साखरेच प्रमाण कमीत कमी कसे करता येईल; हे प्रत्येकाने प्रयासाने बघितले पाहिजे. अन्यथा शरीरावर साखरेचे
होणाऱ्या दुष्परिणामांशी लढता लढता त्यातच शरीर संपून जाईल.
१९६१ साली भारत देशात दरडोई गुळाचं सेवन १५ किलो होतं; तर साखरेचं सेवन ५ किलो होतं. मात्र तेच प्रमाण २०१० मध्ये बघितल्यास साखरेचा प्रभाव किती वाढला ते दर्शवितं. २०१०-११ मध्ये भारतातील एक मनुष्य २० किलो साखर खाऊ लागला. तर गुळाचं सेवन ५ किलोपर्यंत खाली गेलं. (जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय पोषण संस्था अहवाल)२०१५ ची आकडेवारीचा आपण अंदाज लावलेला बरा.
२००६-०७ साली भारतामध्ये १९० लाख टन साखरेचा खप झाला होता. तर आता तोच खप सुमारे २५० टनापर्यंत गेला आहे. एका व्यक्तीने दर दिवशी १० ग्रॅमहून अधिक साखर खाणे आरोग्यदृष्ट्या अहितकारक मानले जाते. पण ३० मिलिच्या शितपेयामध्ये ४२ ग्रॅम साखर आढळते. ही शासकीय प्रयोगशाळेची आकडेवारी आहे. देशामध्ये जे साखरेचं उत्पन्न होतं त्यातील केवळ ३५ टक्के साखर घरगुती वापरासाठी खरेदी केली जाते. तर ६५ टक्के साखर शीतपेय, बिस्किट, चॉकलेट, गोळ्या, मिठाई, केक, जाम अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरली जाते. म्हणजे आपण वेगवेगळ्या खाद्य पदार्थांमधून किती साखर खातो; ह्याचा अंदाज सहजपणे येईल. ह्या साखरेचं अर्थकारण खूप मोठं आहे. त्यामुळे त्याच्याशी संबधित अनेक मोठ्या कंपन्या साखरेचं महत्व वाढवतच ठेवणार आहेत. साधं उदाहरण पाहिल्यास हे लक्षात येईल; मिठाई ३०० ते ७०० रुपये किलो ह्या भावाने आपण विकत घेतो. त्यामध्ये सुमारे ४०० ग्रॅम साखर असते. ३२ रुपये किलो असणारी साखर किती पटीने विकली जाते; ते ह्यावरून समजतं. साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी शासन साखर कारखान्यांना भरमसाठ अनुदान देते. त्याचा ६५ टक्के फायदा थेट शितपेय, चॉकलेट अशा खाद्यपदार्थांमध्ये साखर वापरणाऱ्या कंपन्यांना होतो. म्हणून ऊस लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. ऊसाच्या शेतीला सर्वाधिक पाणी लागते, तरीही त्याकडे दुर्लक्ष होतो. ह्या सर्व गोष्टी पाहता लक्षात येतं की, साखरेचं उत्पन्न वाढीसाठी आणि प्रत्येक मनुष्याला साखरेची सवय लावण्यासाठी ठराविक लोकांचे कित्येक वर्षे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. आपण सहजपणे त्याला बळी पडलो आहोत. आता मात्र आपल्या शरीराला घातक असणाऱ्या साखरेचा त्याग केल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.
साखर उसापासून तयार होते. पण उसापासून साखरेची निर्मिती करताना जी रासायनिक प्रक्रिया केली जाते, त्यात उसाच्या रसाचे नैसर्गिक आणि उपयुक्त गुणधर्म संपुष्टात आणून फक्त शुभ्र पांढरी साखर तयार केली जाते. ती शुभ्र साखर मानवी शरीर क्रियेवर अनुचित परिणाम घडवून आणते. उसाचा रस हा आरोग्यास हितकारक असतो. उसाचा रस पचनास हलका असतो. त्या रसाला उष्णता देऊन आटविले जाते. त्यावेळी त्यात चुना घातला जातो आणि त्यातील मळ काढून टाकला जातो. नंतर तो रस आटविताना सल्फरडाय ऑक्साईड वायू, फॉर्मालीन रिफायिनग व ब्लिचिंग अशा रासायनिक प्रक्रियेतून साखर तयार होते. खरं म्हणजे शुद्ध रासायनिक पदार्थ तयार होतो. तिच ही साखर. ही साखर वर्षानुवर्षे टिकून राहते. ती खराब होत नाही. किड लागत नाही. म्हणजे साखर हा कसा रासायनिक पदार्थ आहे ह्याची जाणीव होते. उसाच्या रसामधील नैसर्गिक गुणधर्म जे शरीराला उपयुक्त असतात ते साखरेमध्ये अजिबात शिल्लक राहत नाहीत. साखरेमध्ये प्रोटीन्स, जीवनसत्व, खनिजद्रव्य, क्षार ह्यांचा पूर्णत: अभाव असतो. मग साखरेमध्ये आहे तरी काय?
उसात सुक्रोज बरोबर मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे तीन महत्वाचे घटक असतात. हे घटक उसाच्या रसातही असतात. पण जेव्हा शुद्ध रासायनिक साखर तयार होते तेव्हा हेच तीन घटक त्यातून नष्ट होतात. साखर पचविण्यासाठी हेच तीन घटक अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे शरीरात साखर गेल्यावर त्याच्या पचनासाठी हेच तीन घटक शरीरातील राखीव साठ्यातून शोषले जातात. उदा. कॅल्शिअम
हाडातून-दातांमधून घेतले जाते. त्यामुळे हाडं ठिसूळ होणे, दात खराब होणे असे विकार होतात. स्नायूच्या निर्मितीसाठी प्रथिनांची गरज असते. तर स्नायूंच्या हालचालीसाठी कॅल्शिअमची गरज असते. परंतु शरीरातील प्रथिनं आणि कॅल्शिअम खाल्लेली साखर पचनासाठी सतत वापरले गेल्यास अनेक विकारांना मनुष्याला तोंड द्यावे लागते.
मानवी शरीरासाठी साखर विषारी-
निसर्ग रक्षणाला वाहिलेल्या नेचर या नियतकालिककाच्या अंकामध्ये २०१२मध्ये कॅलिफोर्निया विद्यापिठातील रॉबर्ट लुस्टिंग यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने एक शोध निंबंध प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन मानवी शरीराला घातक ठरू शकते. त्यात साखरेचा समावेश आहे. मानवी शरीरासाठी साखर विषारी असून शासनाने मद्याप्रमाणे साखरेच्या सेवनावरही नियंत्रण आणले पाहिजे. साखरेमुळे स्थूलपणा, हृदयविकार, कर्करोग आणि मुत्रपिंडाशी संबधित रोग होऊ शकतात. साखरेमुळे
होणारे विविध रोग लक्षात घेता, त्यावर कर लावण्यात आला पाहिजे आणि मद्य व तंबाखूसारख्या उत्पादनाप्रमाणेच साखरेवरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
साखरेला अनेक टोपण नावे आहेत. त्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो आणि त्या व्यक्तीला समजत नाही की आपण साखरच खातोय. म्हणून साखरेची शेकडे टोपननावे नेटवर पाहावयास मिळतील. त्यातील काही प्रमुख नावे अशी…
१) शुगर २) शुगर सोलीड्स ३)डेक्स्ट्रोझ ४) सुक्रोज ५) कार्न स्वीट्नर ६) कॉर्न स्टार्च (लोकप्रिय नुडल्समध्ये असतो.) ७) हाय प्रक्तोज कॉर्न सिरप (एच्. एफ. सी. एफ.) (हे फ्रुट ज्यूस, सॉफ्टड्रिंकमध्ये असते.) गोल्डन सिरप (हे बेकरीत वापरतात) लिक्विड ग्लुकोज, माल्टोडेक्स्ट्रीन (हे ग्रनोला बारमध्ये असते) कार्न सिरप, मेपल सिरप.
अशी अनेक नावं असलेली साखर मानवाला अनेक आजार देते. लठ्ठपणा, अति रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधीवात असे अनेक आजार साखरेच्या सेवनामुळे निर्माण होतात.