‘एलिफंटा महोत्सव’ १ जूनपासून-विविध कार्यक्रमांसह हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमाचे आयोजन

मुंबई:- सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला ‘एलिफंटा महोत्सव’ यंदा १ आणि २ जून (शनिवार आणि रविवार) रोजी एलिफंटा अर्थात घारापुरीच्या बेटांवर होत आहे. ‘स्वरंग’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदींची रेलचेल असणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे ही माहिती दिली. सर्व कला आणि पर्यटनप्रेमींनी महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शनिवारी (१ जून) सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रख्यात गायक कैलास खेर यांचा ‘शिवआराधना’ या विषयावरील सुराविष्कार या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.

रविवारी (२ जून) रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत घारापुरीच्या बेटावर शिल्प आणि लेण्यांचे दर्शन घडवणारा हेरिटेज वॉक होणार आहे. शिवतांडव, योगमुद्रा, शिवप्रतिमा, गंगावतरण, अर्धनारीनटेश्वर, त्रिमूर्ती आदी प्राचीन शिल्प, लेण्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करता येणार आहे. दिव्यांग संस्था आणि अनाथाश्रमातील सदस्यांना लेण्यांची सफर घडवली जाणार आहे.

रविवारी (२ जून) सायंकाळी ७ वाजता घारापुरीच्या बेटावर गीत, संगीत आणि चित्रकलेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. यावेळी सुलेखनकार अच्युत पालव, चित्रकार वासुदेव कामत, व्यंगचित्रकार निलेश जाधव, शील कुंभार आदी कलाकार हे शिवतांडवशी नाते सांगणारा चित्र आविष्कार लाईव्ह सादर करणार आहेत.

मुंबई शहरानजीक दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवास देश – विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. यंदाही या महोत्सवामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. रावल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *