`विकास’ आणि `विश्वास’ हरवलाय….? `हीच ती वेळ’ शोधण्याची…!
`विकास’ सापडतच नाही. कुठे म्हणून शोधायचा? प्रत्येकजण आम्हाला अनेक वेळा आश्वासन देतात की `विकास’ करू; पण आजपर्यंत विकास काही झाला नाही; म्हणजे ते `विकास’ करण्यास लायक नाहीत किंवा त्यांना विकासच नको आहे. कागदावर `विकास’ दिसतो अगदी सदृढ बालकासारखा नव्हे तर सुमो पेहलवानासारखा. पण प्रत्यक्षात तो `विकास’ सापडतच नाही; सापडलाच तर दुष्काळग्रस्त इथोपियामधील कुपोषित बालकासारखा. मग त्याला `विकास’ तरी कसं म्हणावं बरं? म्हणजेच `विकास’ हरवला आहे हे नक्कीच!
ठीक आहे, आमच्या अंगवळणी पडलंय ते; परंतु `विकास’ गेला तो गेला आणि आता तर त्याच्यासोबत `विश्वास’ही गेला हो!
काल बोललेलं आज नाही आणि आज बोललेलं उद्या असेल असं नाही. कोण कोणाचा विरोधक हेच समजत नाही. एका ताटात जेवणारे कधी एकमेकांचा गळा दाबतील; ते सांगता येत नाही आणि कालपर्यंतचे कट्टर शत्रू एका ताटात जेऊन `आम्ही भाऊ भाऊ, सगळं मिळून खाऊ’ अशा थाटात कुठल्याही क्षणी एकत्र येतील. हे एकत्र येणं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःची चोरी लपविण्यासाठी असतं. जनता ज्या विकासाला शोधते त्या विकासाच्या नावाखाली विश्वासाचा रोज नवीन खेळ मांडला जातो आणि त्यात `विकास’ आणि `विश्वास’ गुदमरून मरतात हो.
पानिपतच्या लढाईत म्हणे विश्वास मेला; लहानपणापासून ऐकत आलोय. अगदी सुमारे दहा वर्षांपूर्वी थोडाफार का असेना `विश्वास’ दिसायचा; पण आता विकासाबरोबर `विश्वास’ हरवलाय. त्याचे दुःख वाटतंय.
`विकास’ आणि `विश्वास’ शोधायची जबाबदारी कोणाची? जे विकास आणू म्हणतात ते आणत नाहीत म्हणजे त्यांच्यावर पुन्हा पुन्हा `विश्वास’ कसा ठेवायचा?
हा `विकास’ आणि `विश्वास’ शोधण्याची संधी भारतीय लोकशाहीमध्ये मतदारांना असते असं म्हणतात; पण या लोकशाहीमध्ये `विकास’ आणि `विश्वास’ सापडणार कसा? कारण `विकास’ आणि `विश्वास’ या दोघांना आणून देणारा प्रामाणिक निष्ठावंत कार्यक्षम उमेदवार निवडणुकीत उभाच राहू शकत नाही. कारण अशा उमेदवाराकडे स्वकष्टाची कमाई असते व ती निवडणुकीच्या निवडणुकीच्या आखाड्यात अपुरी ठरते. मग करायचे काय? हा मोठा यक्ष प्रश्न.
हा यक्ष प्रश्न सोडविण्यासाठी `हीच ती वेळ आहे’. सामान्य मतदारांना `विकास’ आणि `विश्वास’ ठेवण्यालायक उमेदवार हवा. ऋण २ आणि ऋण ४ ह्या दोन संख्येमध्ये ऋण २ ही संख्या मोठी. याच न्यायाने निवड करावी लागेल. उमेदवार निवडीचा प्रवास ऋणाकडून धनाकडे असायला हवा; असा सकारात्मक विचार केल्यास भविष्यात `विकास’ आणि `विश्वास’ सापडतील; अशी आशा करायला काय हरकत आहे?
`विकास’ म्हणजे चांगल्या उचित गोष्टी, मानवाची सर्वांगीण प्रगती होण्याची प्रक्रिया. तर विश्वास म्हणजे आधार, आपुलकी, निस्वार्थ प्रेमाची भावना. पण विश्वासघात करणारी मंडळी विकासाला गायब करून `भकास’ नावाच्या राक्षसाला जन्माला घालतात. मतदारराजा शहाणा हो! तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. स्वतःचे उपद्रवमूल्य वाढविण्यासाठी विश्वासघात करणाऱ्यांना आणि त्यातून भकासाला जन्मास घालणाऱ्याना धडा शिकव!
मतदारांना विकत घेण्याची, मतदारांना मूर्ख बनविण्याची कला जोपासणाऱ्या भंपक नेत्यांना घरी बसवायला पाहिजे. म्हणूनच लायक उमेदवार नसल्यास नोटाचा अधिकार मतदारराजा तुझ्याकडे आहे. एका झटक्यात सर्व उमेदवार `ना’लायक ठरविण्याचा अधिकार तुझ्याकडे लोकशाहीने शाबूत ठेवला आहे म्हणूनच `हीच ती वेळ’ `विकास’ आणि `विश्वास’ शोधण्याची. ती वेळ वाया घालू नकोस!
`शेवटी प्रजा तशी राजा’ या हे लक्षात ठेऊन `विकास’ व `विश्वास’ या दोघांना नामशेष करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे अन्यथा `विकास’ आणि `विश्वास’ आम्हाला कधीच सापडणार नाहीत!