जगदंबेच्या नियमास बाधा न आणता श्रद्धावानाला दुःखातून बाहेर काढून अगाध मार्ग दाखविणारा `तो’ एकच!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक नववा
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
न येऊ देता जगदंबेच्या नियमास बाध।
दु:खातून काढूनी बाहेर, मार्ग दावीन अगाध॥
आदिमातेने परमात्म्याकडून हे ब्रह्मांड निर्माण करविले ते काही नियमांच्या आधारे! हा पसारा काही विस्कळीत स्वरूपाचा, अपघाताने घडलेला असा नाही; तर अतिशय सुनियोजित आणि नियमबद्ध आराखड्याने निर्माण केला गेला आहे.
हा परमात्माच आपल्या सृजनात्मक शक्तीद्वारे विश्वातील जड द्रव्यांचेसुद्धा आतून नियंत्रण करतो व सर्व क्रियांना नियमबद्ध स्वरूप देतो. ( सत्य प्रवेश चरण ४८ )
प्रकृती, पंचमहाभूते इत्यादी तत्त्वांची निर्मिती आणि पुढे त्यातून विश्वोत्पत्ती! ‘हे विश्व कसे बनले’ याचा मागोवा घेते ते सायन्स म्हणजे आत्ताच्या भाषेत ज्याला विज्ञान म्हणतात ते. ‘हे विश्व का बनले’ याचा शोध घेते ते अध्यात्म.
हा सर्व खेळ करण्याआंतु । माझ्या जगदीशाचा काय हेतु । ये अर्थींची निश्चयमातु । एकही जंतु जाणेना ॥ श्रीसाईसच्चरित ८/५७
विज्ञानाच्या शोधाची आणि विकासाची दिशा हा आतून बाहेर असा प्रवास आहे; तर अध्यात्म ही बाहेरून आता होणारी यात्रा आहे.
मी ज्या प्रमाणात भौतिक गोष्टींच्या मागे लागेन, त्या प्रमाणात हे विश्व प्रसरणशील. तर ज्या प्रमाणात मी त्या आत्मारामाचे चिंतन करीन त्या प्रमाणात विश्व आकुंचनशील आहे, म्हणजेच अधिक सूक्ष्म. ( सत्य प्रवेश चरण २८ )
ज्या नियमांनी विश्व बनले, त्यातले जेवढे नियम माणसाला कळले त्याला विज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण, अणूंमधील अंतर, धातूंचे गुणधर्म, प्रकाशाचा वेग इत्यादी. यातला कुठलाही नियम मानवनिर्मित नाही. फक्त माणसाने आपली बुद्धी वापरून त्याचा शोध घेतला एवढेच.
विज्ञान व अध्यात्म दोन्हीकडे; जन्माला आलेल्या प्रत्येकाला कर्म अटळपणे करावेच लागते. जसे ज्याचे कर्म तसे त्याचे फळ.
कर्म प्रधान विश्व रचि राखा। जो जस करहि सो तस फल चाखा॥ सकल पदारथ हैं जग मांही। कर्महीन नर पावत नाहीं ॥ ( रामचरितमानस )
व्यवहारात, मला कायदा माहीत नव्हता म्हणून कायदा मोडल्याची शिक्षा माफ होत नाही. तसेच अध्यात्मात आहे. केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. रामायण, श्रीमद्भगवद्गीता हे धर्मग्रंथ कर्ममार्गाचाच उपदेश करतात. हे आदिमातेचे आणि तिच्या पुत्राचे नियम आम्हाला कसे कळणार ? याचेही उत्तर त्रिविक्रम अनिरुद्धांनी दिले आहे.
सत्य, प्रेम व आनंद हेच परमेश्वराचे मूळ नियम आहेत. ( सत्य प्रवेश चरण ५५ )
अशा नियमांचे संपादन या ग्रंथाद्वारे होते, तो ग्रंथ अर्थातच धर्मग्रंथ ठरतो. परंतु खरे म्हणजे प्रत्येक मानवाकडे असणारे परमेश्वरी मन हाच मूळ धर्मग्रंथ आहे. आणि बाकीचे सर्व ग्रंथ फक्त तो मूळ ग्रंथ कसा प्राप्त करून घ्यावा व वाचावा एवढेच शिकवितात. ( सत्य प्रवेश – धर्म )
या मूळ परमेश्वरी नियम समजावून, भक्ती शिकविणाऱ्या धर्मग्रंथांमध्ये हळूहळू माणसे त्यांचे नियम घुसडून धर्माचे रूपांतर कर्मकांडात करून टाकतात. भक्तीत भय शिरते आणि अशावेळी धर्माला ग्लानी आलेली पाहून तो परम करुणामयी परमात्मा पुन्हा पुन्हा येत राहतो. मानवी रूपात येणाऱ्या परमात्म्याला स्वतःचा काहीच स्वार्थ कुठल्याही कृतीमागे नसल्यामुळे त्याला या नियमांचे बंधन नसते. तरीही या नियमांपासून मानवी रूपात येणारा परमात्मा स्वतःलाही बाजूला ठेवत नाही. हे नियम पाळून दाखवतो आणि त्याच्या अकारण कारुण्यामुळे या नियमांचे पालन करण्याच्या मिषाने पुन्हा पुन्हा येत राहतो.
मग या नियमांना बाधा येऊ न देता परमात्मा भक्तांना दुःखातून कसे बाहेर काढतो? एक लक्षात घ्यायचे आहे की; हा त्याचा प्रांत आहे. कसे? कधी? कुठे? किती? हे सर्व तोच ठरवतो आणि त्याप्रमाणे करूही शकतो. आमचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही वर तो एकाच वेळी पाऊल ठेवू शकतो. त्याला अशक्य काही नाही हे कळले तरी बस!!
प्रायः माणूस सुखी होतो ती कारणे ही सामान्य अशा मूलभूत प्रेरणांच्या पूर्तीसंबंधी असतात. माणूस दुःखी मात्र विविध प्रकारे होतो. त्यामुळे दुःखातून बाहेर येण्याचे मार्ग सुद्धा असंख्य हवेत. व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष, कालसापेक्ष असे अनेक मार्ग… या त्रिविक्रम अनिरुद्धांना मात्र प्रत्येक घटकाची, व्यक्तीची, कर्मशृंखलेची, कालाची जाण असल्यामुळे त्यांचे मार्ग अगाध म्हणजे आमच्या आकलनापलीकडचे, अथांग, गूढ असे असतात. याच्या कृतीच्या अगाधतेविषयी बोलताना वेदही थकतात तिथे आपण काय जाणण्याची इच्छा करावी?
ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥
श्री ज्ञानेश्वरी अध्याय १/७३
आम्ही त्याला आमची सूत्रे द्यायची की नाही हे कर्मस्वातंत्र्यही त्यानेच आम्हाला दिले आहे. ही सूत्रे त्याच्या हाती देणा-याचा योगक्षेम तोच चालवतो. अजून काय हवे!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
– डाॅ आनंदसिंह बर्वे