नाशिक विभागात मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम
नाशिक विभागात मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम
नाशिक:- कोविड-19 च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 75हजार 997 मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
मनरेगा अंतर्गत शेल्फवर 98 हजार 851 कामे ठेवण्यात आली असून 1 लाखापेक्षा अधिक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. विभागातील एकूण 5077 पैकी 2603 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात 10310, धुळे 11080, जळगाव 5441, नाशिक 20344 आणि नंदुरबार जिल्ह्यात 28800 मजूर कामावर आहेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत.
स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्याचे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्त राजारामा माने उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात जलसंधारण व गाळ काढण्याची अधिकाधीक कामे हाती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
मजूरांना एका दिवसासाठी 238 रुपये मजूरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत 100 टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल,मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटीका, फळबाग लागवड, वनीकरण अशी विविध कामे या योजनेअंतर्गत घेतली जात असल्याने गावालादेखील याचा फायदा होत आहे. विशेषत: अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढून गावाला याचा उपयोग होणार आहे.
सुरू झालेल्या कामांमध्ये वैयक्तिक स्वरुपाची 11974 कामे सुरू असून 49 हजारावर मजूर कामावर आहेत. तर सार्वजनिक स्वरुपाची 1177 कामे सुरू असून तेथे सुमारे 27 हजार मजूर कामावर आहेत. कोविड संकटाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले असताना ग्रामीण भागासाठी ही योजना उपयुक्त ठरत असून योजनेचा अधिकाधीक नागरीकांना लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.चिखले यांनी केले आहे.