राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ३१ लाख ६६ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

७२ लाख २७ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई:- राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. १ मे ते २९ मे पर्यंत राज्यातील १ कोटी ५० लाख १२ हजार १७५ शिधापत्रिकाधारकांना ७२ लाख २७ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ३१ लाख ६६ हजार ७७३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख ४१ हजार २ क्विंटल गहू, १५ लाख ६८ हजार १५९ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ७४८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख २९ हजार ५७७ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ४ मे पासून एकूण १ कोटी २५ लाख ७४ हजार १८० रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील ५ कोटी ६६ लाख ५३ हजार ९७८ लोकसंख्येला २८ लाख ३२ हजार ७०० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आतापर्यंत ७ लाख ८५ हजार १४० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ७१ हजार २१७ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.

राज्यात १ मे ते २९ मे पर्यंत ८३५ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे ३१ लाख ६६ हजार ७७३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *