राज्यात ५३ हजार १७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून जास्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ८७ हजार ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:

ठाणे- ८० (मुंबई ६९, ठाणे ४, उल्हासनगर ५, पालघर १, वसई-विरार १), पुणे- १४ (पुणे ११, सोलापूर ३), नाशिक-१४ (नाशिक ३,जळगाव ११), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर -२ (उस्मानाबाद २), अकोला-२ (अकोला २).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३९५० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *