`डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मानवतेला वरदान असणाऱ्या समस्त डॉक्टरांना शुभेच्छा!
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, |
आज १ जुलै डॉक्टर डे! या डॉक्टर डे च्या निमित्ताने सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
आज कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या कोविड – १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगातील लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचे आणि अविश्वासाचे वातावरण आहे. या बिकट प्रसंगी याच लोकांच्या मदतीला डॉक्टर पेशातील सर्वचजण आपापल्या परीने मदत करत आहेत. ज्या क्षेत्राकडे पूर्वीपासून अनेक लोक `डॉक्टर नको रे बाबा’ असे म्हणत असत; अशा सर्वांनाच आज वैद्यकीय सेवेचा मोठा आधार मिळत आहे. कोविड सारख्या अतिभयंकर साथीत डॉक्टरांनी हे असीम धैर्य दाखवले आहे, त्याला तोड नाही. त्यामध्ये या आजारात डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही भारतातील वैद्यकीय सेवेतील लोक या आजाराकडे पाठ न फिरवता अजूनही प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. अशा असंख्य डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील लोकांना आजच्या ह्या डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
या दिवसाचा इतिहास पाहिला असता असे लक्षात येते की, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिन व स्मृतिदिन म्हणजे संपूर्ण भारतात `डॉक्टर डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 व त्यांचा मृत्यू 1 जुलै 1962 ला झाला. आपल्या आयुष्यात डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी सतत लोक कल्याणाला महत्व देत. त्यांनी कधीही आपल्या स्वार्थाला महत्व न देता सेवा केली. त्यासोबतच ज्या ज्या वेळेस भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय नेते आंदोलने करायचे, उपोषणाला बसायचे अशावेळी त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीची काळजी डॉ. बिधानचंद्र रॉय हेच घ्यायचे. त्याचाच परिणाम म्हणजे त्यांच्यात सहवासात आलेल्या अनेक राजकारण्यांच्यामुळे ते राजकारणात आले; परिणामी भविष्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाली.
ते जेव्हा डॉक्टर होते त्यावेळी ते अगदी नि:स्वार्थी भावनेने कार्य करायचे. त्यांच्याकडे गेलेला पेशंट कधीही नर्व्हस होऊन परत आला नाही. त्यांच्यावर उपचार करण्याआधी ते त्याला आपल्या मितभाषी संभाषणाने शांत करत, मार्गदर्शन करत असत. त्यामुळे उपचार करण्याआधीच रुग्ण मानसिकरित्या सुदृढ झालेला असायचा. म्हणूनच त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला आणि परिणामी त्यांच्या जयंतीनिमित्त व पुण्यतिथीनिमित्ताने संपूर्ण भारतात `डॉक्टर डे’ साजरा केला जातो. तसे पाहता आजच्या घडीला डॉक्टर म्हणजे समाजातील देवच. (जे देव मानतात त्यांच्यासाठी आणि जे मानत नाहीत त्यांच्यासाठी सर्वस्व असतात.) त्याचे कारण असे की आपण त्याच वेळेला डॉक्टरकडे जातो जेव्हा आपलं सर्वस्व संपलेले असते. त्यावेळी डॉक्टरच आपले तारणहार असतात म्हणून आज समाजात डॉक्टरांना खूप मोठा मान आहे. लहानमोठे आजारपण असो वा गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असो वा अपघात झालेला असो, त्या- त्या वेळी डॉक्टर आपल्याला आधारस्तंभ असतो. मग हा पेशंट कोणत्या जातीचा, धर्माचा हे कोणताही डॉक्टर पाहत नाही. तसेच जेव्हा आपल्याला उपचाराची गरज असते त्यावेळी आपणही जात – धर्म पाहत नाही. त्यामुळे जगातील सर्वात मोठं धर्मनिरपेक्षतेचे ठिकाण म्हणजे डॉक्टर!
आजही समाजात खूप मोठया प्रमाणात डॉक्टर असे आहेत की, ते समाजासाठी, राष्ट्रसाठी समर्पण करण्यासाठी तयार असतात. त्यामुळेच समाजात स्वास्थ टिकून आहे, म्हणूनच समाजात डॉक्टरावर विश्वास उरलेला आहे आणि अशाच सर्व सन्मानिय डॉक्टर यांच्यासाठी आजचा दिवस आहे.
हे एका बाजूला खरे असले तरीही समाजात असे काही विघ्नसंतोषी लोकं आहेत, जे स्वतःच्या चूका डॉक्टर मंडळींवर फोडून डॉक्टर लोकांना बदनाम करण्याचे कार्य करत असतात. जगातील ज्या व्यक्तीने डॉक्टरांचा पोशाख अंगावर चढवला; तो कितीही वाईट प्रवृत्तीचा असला तरीही तो मुद्दामहून पेशंटला मृत्यूच्या दाढेत ढकलणार नाही. काही चुका त्यांच्याकडून अनावधानाने होत असतील, हे जरी मान्य केले तरीही डॉक्टर आपले या क्षेत्रातील सर्व ज्ञान पणाला लावून पेशंटला वाचविण्याचा प्रयत्न करतो. मग अशावेळी आपण त्यांच्या कामात अडथळा आणणे कितपत योग्य ठरेल? हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून सारासार विचार करून आपण डॉक्टरांशी वागल्यास डॉक्टर मंडळींना होणार त्रास कमी होऊन त्यांना रुग्णसेवेवर लक्ष देता येईल.
`डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने हेही अवश्य वाचा! कोरोना महामारीत डॉ.चंद्रकांत पुरळकर रुग्णांसाठी झाले देवदूत! |
बाबा आमटे, तात्याराव लहाने, अभय बंग, प्रकाश आमटे, बिधनचंद्र रॉय, हिमतराव बाविस्कर हे व यांच्यासारख्या असंख्य डॉक्टरांनी आज समाजात समाजस्वास्थ्य जपण्याचे कार्य केले आहे. किंबहुना आजही ते चालूच आहे. अशा प्रामाणिक डॉक्टरांनी लोकांच्या आरोग्याची परंपरा जपत लक्षणीय कार्य केले आहे. तीच परंपरा पुढे चालताना दिसत असली तरी यातही कमीअधिक प्रमाणात व्यावसायिकता घुसली आहे. सद्यस्थितीत सेवेपेक्षा पैसा मोठा ठरायला लागला की काय? अशी मनात शंका येते आहे. कारण आता डॉक्टर हा पेशा सर्व्हिसपेक्षा जॉब व्हायला लागला आहे. म्हणून काही दवाखान्यात तर आधी रक्कम भरून घेतली जाते आणि त्यानंतर उपचार सुरू होतात. हे असेच सुरू राहीले तर भविष्यात खूप मोठी स्पेस निर्माण होईल. सध्याच्या कोविडच्या काळात लोकांनी या आजाराची भीती न बाळगता डॉक्टरकडे जायला हवे होते. मात्र याठिकाणी लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात या आजाराची भीती वाढत आहे; याला नेमके जबाबदार कोण याचा विचार होणे आवश्यक आहे. लाखात बिलाचे आकडे पाहूनच अनेकजण जीवाला मुकत आहेत. यामागे व्यवस्थापनाची हाव आहे की अजून काही? हे जरी गुलदस्त्यात असले तरी यामुळे डॉक्टरी पेशा बदनाम होत आहे, हे निश्चित! अशा प्रवृत्तीमुळे अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या डॉक्टर मंडळींचा हिरमोड होतो. कारण त्यांनाही याच गटात मोजत असतो आणि त्यांच्या कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करतो. अशा गल्लाभरू प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने यावर ठोस उपाययोजना शासनाच्यावतीने करणे अपेक्षित आहे.
`डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने हेही अवश्य वाचा! कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागावे! -डॉ. विद्याधर तायशेटे |
या क्षेत्राबद्दल अनेक गैरसमज असले तरीही ह्या पेशाचे महत्व कमी झाले नाही वा होणार नाही. कारण आजही असे अनेक डॉक्टर आहेत की, जे स्वतःच्या स्वार्थाचा कोणताही विचार न करता रुग्णाला सेवा पुरविण्यावर भर देतात. मग अशावेळी त्यांचे काम पाहिले की, या क्षेत्रातील हावरट व्यावसायिकतेकडे आपोआप कानाडोळा होतो. म्हणूनच आजचा `डॉक्टर डे’ स्पेशल ठरतो. कारण कधी – कधी असा प्रसंग येतो की, रात्री अपरात्री आपल्यासारख्या पेशंटना डॉक्टर सेवा देतात. मग अशावेळी त्यांना झोप नसते. ती माणसे नसतात? पण त्यांना हे माहीत असते की, आपण जे रुग्णसेवेचे व्रत घेतले आहे; ते अंधतेने घेतले नसून त्यामागे खूप मोठा त्याग करण्याची प्रवृत्ती आपण ठेवली आहे. कधी – कधी तर असा प्रसंग असतो की, डॉक्टर आपल्या परिवारासोबत आपला एखादा सुखाचा वा आनंदाचा वा दुःखाचा प्रसंग साजरा करत असतात आणि अशावेळी एखादा सिरीयस पेशंट येतो. मग तो आंनद वा दुःखाचा प्रसंग सोडून डॉक्टर त्या पेशंटसाठी धाव घेतात. यातूनच त्यांचा सेवाभावीपणा दिसून येतो. कोविड काळात असो वा कॅन्सर वा एखाद्या भीषण अपघातात रुग्णांची अवस्था बिकट झालेली असते की, त्या रुग्णांच्या जवळ रुग्णांचे नातेवाईकदेखील जात नाहीत. अशा रुग्णांना देखील डॉक्टर बरे करून घरी पाठवतात, मग या सेवेला आपोआपच सॅल्युट होतो. म्हणून अशा या कार्यामुळे डॉक्टर मनाच्या कोपऱ्यात जागा निर्माण करतात. त्यांच्या याच लोकोत्तर कार्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दल आपोआपच आदर वाढतो. अशा माणुसकी जपणाऱ्या व मानवतेला वरदान असणाऱ्या समस्त डॉक्टरांना आजच्या डॉक्टर दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!