कोरोना महामारीत डॉ.चंद्रकांत पुरळकर रुग्णांसाठी झाले देवदूत!

कोरोना महामारीच्या संकटात अनेक डॉक्टरांनी आपआपले दवाखाने बंद ठेवले. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या आजारांसाठी उपचार कुठे करायचे? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला होता. शासनाला अशा डॉक्टरांना वेळोवेळी आवाहन करून दवाखाने सुरु करण्याची विनंती करावी लागत होती; परंतु ह्या महासंकटात डॉ. चंद्रकांत पुरळकर रुग्णांसाठी-ग्रामीण भागातील गरीब कष्टकरी जनतेसाठी अक्षरशः देवदूत ठरले.

त्यांनी आपला दवाखाना एकही दिवस बंद ठेवला नाही आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन ते रुग्णांना सेवा देत होते. लॉकडाऊनच्या काळात दवाखान्यात रुग्णाला आणण्यासाठी रिक्षा व इतर खाजगी वाहनं मिळत नव्हती. म्हणून डॉ. चंद्रकांत पुरळकर हे स्वतः उपचार करण्यासाठी रुग्णांच्या घरी जाऊ लागले. त्यामुळे हजारो रुग्णांना आधार मिळाला, वेळेवर उपचार मिळाले, अनेकांचे प्राण वाचले आणि त्यांचे आर्थिक नुकसानही झाले नाही. सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात अशा पद्धतीने वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर खूपच कमी आहेत. डॉ. चंद्रकांत पुरळकर यांनी केलेली रुग्णांची सेवा खरोखरच कौतुकास्पद आहेच. त्यांनी देवदूताप्रमाणे केलेले काम चिरंतर स्मरणात राहील.

ग्रामीण भागात रुग्णांची सेवा करण्याचे धाडस खूपच कमी डॉक्टर करतात. शहरी ऐषआरामी जीवनाचा त्याग करून तसेच फक्त आणि फक्त सेवा करण्याच्या समर्पण वृत्तीने ते वैद्यकीय सेवा देतात. ग्रामीण भागातील कष्टकरी गरीब रुग्णांकडून अत्यल्प शुल्क घेऊन किंवा कधी कधी मोफत सेवा देऊन ह्या देवदूतांचे कार्य सुरु असते. असा हा देवदूत डॉ. चंद्रकांत पुरळकर यांच्या कार्याला सलाम करावाच लागेल. डॉ. चंद्रकांत पुरळकर यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग्य मला आला नाही; पण कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय सेवेच्या घटना मला अनेक रुग्णांनी सांगितल्या. म्हणूनच त्यांना सलाम करण्यासाठी हा लेखन प्रपंच!

ग्रामीण भागातील अनेक वृद्धांना आपल्याला नेमका काय त्रास होतो? ह्याची नेमकी माहितीही देता येत नाही. त्याचप्रमाणे लगेच निदान करण्यासाठी शहराकडे पाठविणेही रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता शक्य नसते. अशावेळी रुग्णाशी आस्थेने बोलणे, त्यांची प्रेमाने विचारपूस करणे, त्यांच्या शारीरिक आजाराशी संबंधित नसणाऱ्याही समस्या समजून घेणे महत्वाचे असते आणि योग्य औषधोपचार करावे लागतात. नेमकं हेच कार्य डॉ. चंद्रकांत पुरळकर करतात म्हणून ते ग्रामीण भागात कष्टकरी-गरीब जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. आपल्याकडे आलेल्या रुग्णाला ते धीर देतात, आधार देतात आणि त्यातूनच तो रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. डॉ. चंद्रकांत पुरळकर यांच्या रुग्ण सेवेची ही खासियत आहे.

डॉ. चंद्रकांत पुरळकर यांच्या कार्याची दाखल घेऊन नुकतेच `किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने `कोवीड योद्धा’ म्हणून सम्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

डॉ. चंद्रकांत पुरळकर यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांचा कार्याला पुन्हा सलाम! ग्रामीण भागात त्यांच्याकडून अधिकाधिक रुग्णसेवा व्हावी आणि ती रुग्ण सेवा करण्याचे सामर्थ्य परमात्म्याने त्यांना द्यावे; असं मनोमन वाटतं!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page