कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागावे! -डॉ. विद्याधर तायशेटे

कोरोना महामारीच्या काळात समर्थपणे रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ. विद्याधर तायशेटे यांच्याशी संवाद

कोरोना महामारीने संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. आरोग्य सुविधेमध्ये अतिप्रगत असलेले देश सुद्धा हतबल झालेले आपण पहिले. प्रचंड लोकसंस्था असलेल्या भारतात नंतरच्या काळात साथीचा फैलाव रोखण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले. त्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच सर्वोच्च स्थानी राहिला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम नसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे गंभीर दुष्परिणाम आजही दिसून येत आहेत.

सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यास आरोग्य यंत्रणा तेवढीशी सक्षम नव्हती. रिक्त पदे, सोयीसुविधांचा अभाव असल्याने आरोग्य यंत्रणाला सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना मर्यादा येत होत्या. अशावेळी जिल्ह्यामध्ये खाजगी रुग्णालयांनी पुढाकार घेणे गरजेचे होते आणि हा पुढाकार जिल्ह्यातील काही नामवंत डॉक्टरांनी घेतला. मुक्काम कणकवलीतील एक नामवंत आणि लोकप्रिय असणारे डॉ. विद्याधर तायशेटे MBBS, MS (GENERAL SURGERY) यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यात सर्वप्रथम गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कोविडसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करून कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यास सुरुवात केली. हीच खरी सामाजिक बांधिलकी आणि रुग्ण सेवेचे व्रत! कोरोनाच्या काळात गावागावातील अनेक डॉक्टरांनी असो वा खाजगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा बंद केली. त्यामुळे जिल्हावासीयांना प्रचंड त्रास झाला. त्यावेळी डॉ.विद्याधर तायशेटे यांनी दाखवलेली समर्थता कौतुकास्पद आहे.

डॉ.विद्याधर तायशेटे नेहमीच सामाजिक बांधिलकी स्वीकारून वैद्यकीय सेवा देत असतात. जिल्हयात वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी वैद्यकीय शिबिरे आयोजित केल्यास ते वेळात वेळ काढून तिथे जातात आणि वैद्यकीय सेवा करतात. ह्याचा अनुभव आम्ही खूप वेळा घेतलेला आहे. डॉ.विद्याधर तायशेटे यांच्याशी पाक्षिक `स्टार वृत्त’चे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी संतोष नाईक यांनी संवाद साधला. त्यावेळी डॉ.विद्याधर तायशेटे यांनी आपली मते व्यक्त केली. ती प्रसिद्ध करीत आहोत.

-संपादक

 

मुलाखतीमध्ये डॉ. विद्याधर तायशेटे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्धे…

मृत्युदर वाढीची कारणे..

गेले तीन महिने आपल्या जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तपासणीस होणारा विलंब! तसेच तपासणी केल्यानंतर जर आपण पॉझिटिव्ह आल्यास गुन्हेगार ठरू किंवा समाज आपल्याला वाळीत टाकेल; अशी चुकीची समजूत सर्व समाजात पसरलेली आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्ण टेस्ट किंवा स्वाईब करून घेण्यास उशिरा करतात. त्यामुळे उपचारही उशिरा सुरू झाल्यामुळे परिस्थिती गंभीर किंवा हाताबाहेर जाते. त्याचाच परिणाम म्हणून मृत्यूदर वाढलेला दिसून येतो.

त्रिसूत्रीचा वापर आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार आवश्यक…

लवकर निदान, व्यवस्थित चिकित्सा आणि सकारात्मक विचाराने योग्य ती काळजी; ह्या त्रिसूत्रीचा वापर केल्यास आजार लवकर आटोक्यात येऊ शकतो. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची त्वरित तपासणी केल्यास होणारा संसर्ग टाळू शकतो. याची समाजामध्ये योग्य पद्धतीने जाणीव करून देणे गरजेचे आहे. प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणा हे सर्व काम उत्तम पद्धतीने करतच आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे ते कमीच; पण त्यासोबत सामाजिक संस्थांनी देखील यात पुढाकार घेणे फार गरजेचे आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मध्ये फरक काय?

गेले दहा महिने आम्ही सतत कोविड रुग्णांची चिकित्सा करत आहोत. त्यामध्ये असे आढळून आले, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्येबरोबर मृत्यूदर देखील जास्त आहे. कारण पहिल्या लाटेत मधुमेह, हृदयरोग किंवा तत्सम इतर आजार असणाऱ्या आणि वयोवृद्धा रुग्णांमध्ये संसर्गाचे आणि मृत्युदराचे प्रमाण जास्त दिसत होते. मात्र ह्या दुसऱ्या लाटेमध्ये सरसकट वरीलप्रमाणे सर्वांसोबत तरुण रुग्णांमध्ये ह्याचा संसर्ग आणि मृत्युदर वाढलेला दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विलंब तपासणी आणि पर्यायाने विलंब उपचार…

आम्ही देतो कोरोना रुग्णांना अशी सेवा…

आमच्या कोविड सेंटरमध्ये १८ ते २० रुग्णांवर चिकित्सा करण्याची सोय आहे. सर्व कोविड सेंटरमध्ये दिला जाणारा उपचार हा सारखाच असून आम्ही आमच्या रुग्णालयात प्रविष्ट झालेल्या प्रत्येक रुग्णाचे मनोधैर्य वाढविता येईल यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो. कारण एक अनुभव असा आहे की, रुग्णांची मानसिकता ह्या आजारात फार महत्त्वाचे काम करते. अतिशय कमी स्वरूपाचा आजार असलेला एखादा रुग्ण मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालेला असेल तर आजार त्वरित गंभीर रूप धारण करतो. मात्र गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेला एखादा मानसिक दृष्ट्या कणखर असलेला रुग्ण यातून त्वरीत बरा होऊ शकतो. हेदेखील आम्ही पाहिलेले आहे. बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता अशा अनेक प्रश्नांनी चिंतेत असणाऱ्या नातेवाईकांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच पॉझिटिव्ह असलेल्या सर्व ऑक्सिजन लागतो किंवा व्हेंटिलेटर लागतो असे मुळीच नाही. तर काही रुग्ण घरगुती विलगीकरणात सुद्धा बरे होतात. ह्याचे मार्गदर्शन सुद्धा आम्ही करतो.

बरे झालेल्या काही रुग्णांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन झालेले दिसून येत आहेत. ते आपल्या रुग्णांना होऊ नये यासाठी आपण पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन कार्यक्रम आपण आपल्या सेंटर मार्फत घेत असतो.

समाजाला आवाहन…
वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय पेशा हा सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. मात्र अशा चर्चा करत असताना केवळ एकच बाजू विचारात घेऊन फक्त वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना लक्ष तर केले जात नाही आहे ना? किंवा सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये वैद्यकीय व्यवसाय बाबत पोस्ट करताना किंवा प्रसार माध्यमातून एखादी बातमी प्रसारित करताना सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात त्याचा परिणाम खरोखरच प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम तर होणार नाही ना? याचा विचार समाजाच्या प्रत्येक जबाबदार घटकांनी करणे गरजेचे आहे. आरोग्य सेवा पुरविणाऱ्यांचे जर मानसिक खच्चीकरण झाले तर त्याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होऊ शकतो. सध्या परिस्थिती जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणा आणि यातील प्रत्येक घटक गेले दहा महिने अविरतपणे प्रचंड शारीरिक मानसिक तणावाखाली काम करत आहे आणि अशा वेळी सर्वांनी सदसदविवेकबुद्धीचा वापर करून सर्वांनी सामंजस्याने सामाजिक आरोग्य राखण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे; ह्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून चुकीची अथवा अर्धवट निदान आणि उपचार याची माहिती न घेता कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शब्दांकन- संतोष नाईक

कणकवलीच्या संजीवनी हॉस्पिटलमधील……
माझा अनुभव

मला कोरोना संसर्ग झाला. मी दहा दिवस संजीवनीमध्ये ॲडमिट होतो. माझा स्कोअर २१ होता. डॉ.विद्याधर तायशेटे आणि त्यांच्या पुऱ्या टीममने माझ्या ट्रीटमेंटच्या बाबतीत घेतलेली काळजी आमच्या कल्पनेपलीकडची होती. माझ्यावर कॅमेरा सेट करून पूर्ण २४ तास माझ्यावर लक्ष ठेवून ऊपचार केले. मी आऊट ऑफ डेंजर केस म्हणूनच संजीवनीमध्ये दाखल झालो. माझ्या ट्रीटमेंटच्याबाबतीत सरांनी सर्वं पर्याय शोधून ठेवले होते. आमच्या कुटूंबियांना सातत्याने फोन करुन दिले जाणारे अपडेट आणि महत्त्वाचे म्हणजे सरांनी दिलेला धीर माझ्या बाबतीत तरी शब्दातीत आहे!

मला दाखल करून घेण्याचे डॉ. विद्याधर सरांनी दाखवलेले धाडस हेच मुळी शब्दातीत आहे. अशा व्यक्तीवर आरोपप्रत्यारोप करणे, मला अनाकलनीय वाटते. विद्याधर सरांची सामाजिक बांधिलकीची आपण समजून घ्यायला हवी. संजीवनीमध्ये दाखल झालेल्या कोरोना रूग्णांना दिली जाणारी फॅमिलीअर वागणूक मला जास्त भावली. संजीवनीचा स्टाफ सुद्धा रूग्णांना आपलेपणाची वागणुक देताना अनुभवला.

मी केवळ आणि केवळ डॉ.विद्याधर सरांच्या योग्य ट्रीटमेंटमुळेच आणि मला दाखल करुन घेण्याचे धाडस दाखवल्यामुळेच मी या भयानक संकटातून वाचू शकलो!

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर
अध्यक्ष, गोपुरी आश्रम, वागदे, कणकवली

You cannot copy content of this page