अॅड. अनिल परब- अभ्यासू, चिकित्सक, कायद्याची जाण असणारा लढवय्या नेता!
परिवहन व संसदीय कार्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते
अॅड. अनिल परब यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा सन २०१५-१६ साठीचा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अॅड. अनिल परब यांना मिळाला. हा पुरस्कार विधानपरिषदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.
हा पुरस्कार विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक – निंबाळकर, मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, पर्यटन आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्री. आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे उपस्थित होते.
अॅड. अनिल परब हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेची कायद्याची बाजू मांडणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. शिवसेनेवर कोणी टीका केली की, त्यांना कायद्याच्या भाषेत अनिल परब प्रत्युत्तर देत असतात. विधानभवनात विरोधकांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीवर सामोरे जाऊन अनिल परब यांनी तोडीस तोड उत्तर दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा चिखल उडविण्याचा प्रयत्न केला आहे. पण विरोधक त्यात यशस्वी होणार नाहीत; असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे.
अनिल परब यांच्यावर शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याची खूप मोठी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून त्यात ते नेहमीच यशस्वी होतात. महाविकास आघाडी सत्ता स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग महत्वाचा मनाला जातो.
शिवसेनेची कायद्याची बाजू सांभाळणारे अनिल दत्तात्रय परब हे मागील २०-२२ वर्षांपासून शिवसेनेत कार्यक्षमतेने कार्यरत आहेत. ते बीकॉम, एलएलबी आहेत. ते वकिलीचा व्यवसाय करताना राजकीय कार्याबरोबर खूप मोठे सामाजिक कार्यही केले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी विद्यार्थी सेनेचे लक्षणीय कार्यही केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी सेनेचे आंदोलने झाली. २००१ मध्ये अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. शिवसेनेच्या कार्याची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळल्याने त्यांना २००४ साली विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. आजतागायत ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
२०१५ साली वांद्रे पश्चिममधील पोटनिवडणूकीमध्ये अनिल परब यांच्यावर निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. या पोटनिवडणूकीत शिवसेनेकडून तृप्ती सावंत उमेदवार होत्या तर काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवार होते. दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढाई सुरु होती; परंतु अनिल परब यांनी उत्तमरित्या जबाबदारी पार पाडत शिवसेनेला विजय मिळवून दिला. सदर विजयानंतर अनिल परब यांच्यावर शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याच्या अनेक जबाबदाऱ्या पडू लागल्या व त्या जबाबदाऱ्याही अनिल परब उत्तमरित्या पार पाडत आहेत.
पुढे २०१७ साली मुंबई महापालिकेची निवडणूक आली. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेत असलेल्या युतीत फुट पडली. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपतर्फे शिवसेनेवर करण्यात आला होता. त्या आरोपांना अनिल परब यांनी सडेतोड उत्तर दिले. शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अनिल परब यांनी कायद्याच्या भाषेत उत्तर दिले होते आणि विरोधकांची हवा काढून टाकली. महापालिका निवडणूक शिवसेनेने पुन्हा जिंकून भ्रष्टाचाराचा मुद्दा खोटा ठरवला.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. अनिल परब यांच्या कार्याची दखल घेत त्यांना परिवहन मंत्रीपदी नियुक्त करण्यात आले.
शिवसेनेवर आरे मेट्रो कारशेड, कांजूर कारशेड, मराठा आरक्षण आणि आता सचिन वाझे प्रकरणामुळे अनेकवेळा आरोप करण्यात आले आहेत. यावर कायद्याची बाजू घेऊन विरोधकांना अनिल परब यांनी नेहमी गारद केले आहे. सचिन वाझे प्रकरण उफाळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवसेनेवर आरोप केले होते. यावेळीही कायद्याची मदत घेत फडणवीसांच्या आरोपांना अनिल परब यांनी तोडीस तोड उत्तर दिले आहे. अनिल परब यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवरही भाष्य केले आहे. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी जमा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. याविरोधातही अनिल परब यांनी आपले मत मांडले आहे.
कायद्याचा आधार नियमानुसार शिवसेनेवर झालेले आरोप त्यांनी नेहमीच आक्रमक पद्धतीने फेटाळून लावले असे नाही; तर त्या आरोपांची चिरफाड करीत आरोप कसे चुकीचे आणि खोटे आहेत; ते त्यांनी नेहमीच सिद्ध केले. त्यांच्या अभ्यासू चिकित्सक शैलीने विरोधक आता त्यांच्यावरच चिखलफेक करू लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिकमधील निलंबित परिवहन अधिकाऱ्यानं घोटाळ्याचा आणि वसुलीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती; त्या तक्रारीच्या चौकशीत तपासयंत्रणेला काहीच सापडले नाही.
अभ्यासू, चिकित्सक, कायद्याची जाण असणारा लढवय्या नेता अॅड. अनिल परब यांच्या कार्याला सलाम! त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार मिळाल्याने मनःपूर्वक अभिनंदन!
-मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’