मैत्र….
वाढदिवसादिवशी मित्रांकडून मिळाली चिरंतर स्मरणात राहणारी अनोखी भेट!
इ. एस. आय. एस. मध्ये मी ३५ वर्षे नोकरी केली. अनेक चांगले सहकारी लाभले. ते माझे जीवाभावाचे मैत्र बनले. त्यांच्या मैत्रीच्या सुखावणाऱ्या ‘नॉस्टॅल्जिक’ करणाऱ्या खूप आठवणी आहेत. एक आठवण २१ सप्टेंबर २०११ ची आहे. दहा वर्षे झाली त्या गोष्टीला. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. “अंधेरीतील Karl Residency हॉटेलमध्ये संध्याकाळी ७ वा. कुटुंबासह ये!” असे मित्रांचे आमंत्रण होते.
त्याच महिन्यात माझी रिटायर्डमेंट असल्याने मला ट्रिट असणार असे वाटले. ठरल्याप्रमाणे मी कुटुंबासह तिथे पोहचलो. आठव्या मजल्यावरील हॉलमध्ये प्रवेश केल्याबरोबर अनेक विद्यमान आणि निवृत्त सहकारी-मित्रमैत्रीणींना समोर पाहून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. इतके सारे असतील याची मला जराही कल्पना नव्हती.
मित्रांचे धक्कासत्र सुरूच होते. येणाऱ्या प्रत्येकाचे गुलाब आणि कोल्ड्रिंक्स देऊन स्वागत होत होते. सगळे जमले आणि नंतर मला ओवाळण्यात आले. छानसा केक कापण्याचा कार्यक्रम झाला. एक मोठा बुके तर दिलाच; शिवाय प्रत्येकाने पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. हे सर्व कमाल होते. सर्वांच्या भेटीचा आनंदाबरोबर गप्पागोष्टींची मैफिल रंगली. अनेक आठवणींना उजाळा मिळाला. या दरम्यान स्टार्टर सुरू होतेच. नंतर मस्त जेवणाचा बेत. जेवणानंतरचा धमाल कार्यक्रम म्हणजे डीजेच्या तालावरील नाच. यात सर्वांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे डॉ. के. एन. जोशी, डॉ. स्वामी, डॉ. दीपक जाडकर हेही सहभागी झाले होते. `काही राहून गेले आहे’ असे वाटू नये; असा सगळा इंतजाम होता. माझा तो यादगार वाढदिवस होता. तो दिवस मी कधीही विसरूच शकत नाही!
विश्वनाथ सावंत, दीपक बाईत, संतोष देसाई, सदा चुका, मोहन सावंत, रेखा आपटे, शुभदा राऊत आणि प्राजक्ता पाटकर या माझ्या मित्र मैत्रीणींनी माझा असा वाढदिवस आयोजित केल्यामुळे श्रीमती वालावलकर, श्रीमती तोंडे, डॉ. के एन जोशी, डॉ. राजेश स्वामी, डॉ. दीपक जाडकरसह डिपार्टमेंटमधील अनेक सुहृदांच्या भेटीचा आनंद मिळाला. त्याचबरोबर डिपार्टमेंट सोडून इतर ऑफिसमध्ये गेलेले माझे मित्र प्रमोद मिठबांवकर, प्रविण राजपूत, सुभाष घाटे, महेंद्र वैती हेही उपस्थित राहिल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला. माझ्यासाठी ही स्पेशल आठवण आहे.
मित्र वेडे असतात, हे अनुभवले होते. त्यादिवशी परत एकदा अनुभवले. आजवर जीवाभावाची खूप माणसं भेटली. त्यांनी बरेच काही दिले; पण या मित्रांचे `देणं’ काही औरच होतं. हे ‘देणं’ माझी लाईफटाईम आठवण आहे. या सहकारी मित्र मैत्रीणींप्रती माझ्या भावना शब्दात मावण्या पलीकडे आहेत. या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
मैत्र भेटीच्या अत्यानंदामुळे त्यावेळी आभार मानले की नाही; हे आज आठवत नाही! आज, या सर्व मित्रांचे, सुहृदांचे मनापासून आभार!
-मायकल परेरा, विलेपार्ले