केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांना कोकणवासियांची जाहीर विनंती-आवाहन!

लेखक- जे . डी . पराडकर 
9890086086/email- jdparadkar@gmail.com
लोवले, ता . संगमेश्वर, जि . रत्नागिरी 
पत्रकार जे . डी . पराडकर गेली ३० वर्षे दैनिक `सामना’चे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कोकण पर्यटन, पर्यावरण, संस्कृती, ऐतिहासिक आदिंवर असंख्य लेख प्रसिध्द झाले आहेत!
संपादक

 

नितीनजी, हा ‘ गड ‘ सर कराच!

महामार्गावरून कोकणात यायचं किंवा कोकणातून मुंबईत जायचे म्हटले तर, आज प्रत्येकजण अस्वस्थ होतोय! दररोज या मार्गावरून नाईलाज म्हणून जाणाऱ्या हजारो चालकांच्या संयमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! अखेरीस चालक म्हटला की, त्याचा नाईलाज होतो आणि रस्ता कसाही असला तरी त्याला आपले कर्तव्य बजावावेच लागते. गेली आठ वर्षे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणवासियांकडून चेष्टेचा, संतापाचा आणि शरमेचा विषय ठरला आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ होऊन आठ वर्षे झाली आणि तेव्हापासून रस्त्याच्या दुर्दशेचे जे शुक्लकाष्ट कोकणवासियांच्या आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मागे लागलेय, ते आजही कायम आहे. हे शुक्लकाष्ट एवढे मागे लागलेय की, आता या मार्गावरून नियमित जाणाऱ्यांचा मागचा भागच शिल्लक राहिलेला नाही.

ठेकेदार आणि अधिकारी एवढे बेजबाबदार झाले आहेत की त्यांना कसलीही लाज उरलेली नाही. कारण लाज असती तर, हा प्रकल्प अडचणींवर मात करुन पूर्ण व्हायला आठ वर्षे लागलीच नसती. या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी चिपळूणमधील युवा वकील ओवेस पेचकर हे वारंवार उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतायत आणि न्यायालय खड्डे भरण्याचे आदेश देऊनही ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर काडीमात्र फरक पडत नाही. याला मुर्दाडपणा नाहीतर काय म्हणावे?

महामार्गावरील या खड्ड्यांवर मुंबईतील एक अग्रगण्य दैनिक अग्रलेख करते; यावरूनच यंत्रणेतील मुर्दाडपणात जो सुस्तपणा आला आहे, तो अधोरेखित होतो. कोकणातील जनता संयमी आहे याचा अर्थ त्या संयमाचा अंत पहायचा की, या रस्त्यावरून प्रवास करून करून त्यांच्या देहाचाच अंत व्हावा म्हणून वाट पहायची? हा खरा प्रश्न आहे.

कोकणातील जनतेने कोकण रेल्वेच्या उभारणीचेही काम पाहिले. नियोजनबध्द प्रकल्प कसा उभा करायचा? हे खरं तर कोकण रेल्वेकडून शिकण्याची गरज आहे. अत्यंत अवघड असा कोकणरेल्वे प्रकल्प पाच वर्षे २४ तास काम करून पूर्णत्वास गेला, हे स्वप्न नव्हे तर सत्य आहे.

या उलट मुंबई गोवा महामार्गाच्या भूमीपूजनापासून आजवर या मार्गाला ठेकेदार आणि अधिकारी यांनी ‘नरक ‘ बनवून दाखविण्याची कामगिरी केली. नितीनजी गडकरी यांना शिवसेनाप्रमुखांनी ‘ रोडकरी ‘ अशी उपाधी दिली. देशात त्यांच्या नावे अनेक विक्रम झाले; मात्र मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम हा देशांतर्गत सोडाच एक जागतिक विक्रम म्हणून वेगळ्या अर्थाने कायम चर्चिला जाईल.

नितीनजी, आपल्याबद्दल आदर आहेच! मात्र तो कायम रहाण्यासाठी कोकणवासियांची आपल्याला एकच विनंती आहे की, ‘नितीनजी न्यायालयाच्या आदेशानुसार तीन आठवड्यात खड्डे भरण्यापूर्वी आपण मुंबईहून लांजापर्यंत बाय रोड, कारने प्रवास करून हा रोडरूपी ‘गड ‘ एकदा सर करा आणि कोकणवासियांची मने जिंकाच’!

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी सध्याच्या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास केला तरच त्यांच्या लक्षात येईल की ठेकेदार आणि अधिकारी हे परस्पर संगनमताने कोकणवासियांचा, वाहनचालकांचा गेली आठ वर्षे कसा छळ करत आलेत. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी हे काम करणाऱ्या कंपनीने आठ वर्षात आठ टक्के काम केले. काय कामाचा हा वेग? याच कंपनीकडे पुढे लांजापर्यंत काम होते. त्या भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जी कंपनी काम करण्यास सक्षम नाही तिला काम दिलेच कसे? बरं नियमानुसार मिळाले तर, कामात विलंब झाला म्हणून कोणती कठोर कारवाई केली? या कंपनीच्या अकार्यक्षमपणामुळे कोकणवासियांचे आणि वाहनचालकांचे हाल झाले, वाहनांचे गेली आठ वर्षे नुकसान झाले याला जबाबदार कोण? ज्या कंपनीकडे ९० किमीचे काम देण्यात आले त्या कंपनीच्या आडमुठेपणावर नियमावलीत, करारात काहीच तरतूद नव्हती? कारवाईची अशी तरतूद असेल तर अधिकाऱ्यांनी तातडीने नवीन ठेकेदार का नेमला नाही? या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे या भागातील प्रकल्पाचा खर्च वाढला तो पुढे जनतेला टोलच्या रुपाने भरावा लागणार आहे. मग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी यांची जबाबदारी काय? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज कोकणवासियांना अपेक्षित आहेत.

नितीनजी, आपण सन २०१४ साली संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी नदीवरील पुलाचे भूमीपूजन केलेत. त्यावेळी आपण केलेल्या भाषणात पुलाच्या पूर्ततेसह राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाबाबत जे विधान केलेत त्याला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी अक्षरशः हरताळ फासला. महामार्ग पूर्णत्वास जाण्याचे सोडाच; आपण भूमीपूजन केलेला सप्तलिंगी नदीवरील पूल आठ वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. नितीनजी यांच्या कारकीर्दीत एका पुलाच्या अपूर्णतेची ही बहुधा पहिलीच शोकांतिका असेल. या पुलाचे काम ज्या कंपनीकडे देण्यात आले होते त्यांच्याकडे अन्य १२ पूल होते. विशेष म्हणजे गेल्या ८ वर्षात यातील एकाही पुलाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. प्रत्येक वेळी कंपनी बदलायची, त्यांनी पोट ठेकेदार नेमायचे, पैसे मिळत नाहीत म्हणून त्यांनी काम अर्धवट टाकायचे आणि निघून जायचे. संगमेश्वर तालुक्यातील १२ पुलांच्या बाबतीत हेच सुरु आहे.

ब्रिटिशकालीन ८० वर्षांपूर्वीचे पूल आतासारखी यंत्रणा प्रगत नसताना तीन वर्षात उभारले गेले. मात्र खुद्द केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांनी भूमीपूजन केलेला सप्तलिंगी नदीवरील पूल ८ वर्षे झाली तरी पूर्णत्वास जाऊ शकत नाही; याला शोकांतिका नाहीतर काय म्हणायचे? नितीनजी आपले रस्ते विकासाचे काम हे विक्रमी आहे. मात्र त्याला मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील अनियमिततेने गालबोट लावले जातेय. हे जे कोणी करतेय, त्यांना आपण शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे! असे कोकणवासियांचे मत आहे.

संगमेश्वरमधील शास्त्री आणि सोनवी या पूलांवर पडलेले खड्डे जर नितीनजींनी पाहिले तर , खरंच त्यांच्यातील कर्तबगारपणामुळे अनेक अधिकाऱ्यांना कठोर शासन होईल. जनतेला जनावरे समजून मुर्दाड बनलेल्या यंत्रणेला ना जनतेचा आवाज ऐकू जातो ना न्यायालयाचा. परिणामी याबाबत कठोर शासन करू शकतात ते स्वतः नितीनजीच! ब्रिटिश काळात सुमारे ८० वर्षांपूर्वी उभारलेल्या ज्या शास्त्री – सोनवी पुलांवरून सध्या चालत जायला भीती वाटते त्या पुलावरून ५० टनापेक्षा अधिक वजन वाहणारी वाहने नाईलाज म्हणून जातायत. हे दोन्ही पूल ‘सावित्री’ पूल होण्याच्या स्थितीत आहेत; हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज नाही. मात्र पूल पडून जर अपघातच अपेक्षित असेल तर अशा यंत्रणेला कोण आणि कसे जागे करणार?

बेजबाबदार ठेकेदार आणि अधिकारी यांना जागे करण्याचा करारीपणा नितींजींच्यातच आहे. आता गरज आहे ती त्यांच्यातील हा करारीपणा दिसून येण्याची. यासाठीच न्यायालयाच्या आदेशानुसार तीन आठवड्यात खड्डे भरून होण्यापूर्वी नितीनजींनी मुंबई गोवा रोडवरून केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील लांजापर्यंत प्रवास करावा. मात्र नितीनजींनी आपल्या दौऱ्याची कल्पना अधिकारी वा ठेकेदारांना देऊ नये. खरोखरच वेशांतर करून नितीनजींनी महामार्गावरून गोपनीय दौरा केला तरच त्यांना कळेल; कोकणात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी कोकणवासियांचा गेली आठ वर्षे सातत्याने कसा छळ चालवला आहे ते.

कोकणातील जनता सोशिक आहे, हे मान्य! हा येथील लोकांचा चांगुलपणा म्हटला पाहिजे. मात्र याचा असा छळ करून लाभ उठवायचा? येथील जनतेला सारेच गृहित धरतात . मात्र आता ती वेळ गेली आहे हे साऱ्यांनीच लक्षात ठेवावे. महामार्गाचे, पुलांचे काम विलंबाने होत आहे, याबाबत आंदोलन करायचे ठरवले, महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांबाबत आंदोलन करायचे ठरवले तर, पोलीस प्रशासन ठिकठिकाणी कारवाईचे फलक लावून जनतेला आंदोलनाआधीच घाबरवून टाकते. यामुळे ठेकेदारांचे फावते आणि जनतेसह वाहनचालक तोंड दाबून बुक्क्यांचा मार मुकाटपणे सहन करतात.

कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधींनी रखडलेल्या महामार्गाबाबत आणि खड्ड्यांबाबत एकजूट दाखवली असती तर, कदाचित कोकणवासियांवर ही वेळ आलीही नसती. मात्र लोकप्रतिनिधी कोकणातील असले तरीही प्रत्येकाचे ध्वज आणि हेतू निरनिराळे असल्याने गेली आठ वर्षे खड्ड्यात असलेल्या महामार्गाला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून कोकणवासियांना अपेक्षित असणारा पाठपुरावा झाला नाही; हे वास्तव आहे.

लोकप्रतिनिधींची ठेकेदारांवर तेवढी जरब असती तर, एकही खड्डा दिसला नसता! हे देखील तितकेच सत्य आहे. गेल्या आठ वर्षात खड्ड्यांमुळे वाया जाणारे इंधन, पर्यटकांनी कोकणकडे फिरवलेली पाठ, वाहनांचे विविध प्रकारचे होणारे नुकसान, प्रवाशांचे – चालकांचे शारीरिक नुकसान, वेळ, मनस्ताप या साऱ्याला जनता सामोरी जात आली आहे. या सर्वांची `हाय’ जबाबदार मंडळींना बाधल्याशिवाय राहील का? त्यात ‘ती’ `हाय’ अस्सल कोकणी मंडळींची, म्हणजे तर अगदी इरसालच असणार यात शंका नकोच!

चिपळूण येथील एक युवा विधीज्ञ, ओवेस पेचकर जे उच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांनी गेल्या आठ वर्षात पाच ते सहा वेळा जनहित याचिका दाखल करून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाकडे आणि सातत्याने पडणाऱ्या खड्ड्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. म्हणजे जे काम लोकप्रतिनिधींनी स्वतःहून करणे अपेक्षित आहे, तेथे नाईलाजाने न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत आहे. ओवेस पेचकर या तरुण वकिलाने वारंवार अत्यंत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षरशः वाभाडे काढले. सरकारी वकिलांना उत्तर द्यायला वेळ मागून घ्यावा लागला, शपथपत्र द्यावे लागले. असे एकदा नव्हे अनेकदा घडले. याचा अर्थ स्पष्ट आहे की सुरुवातीला न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतरही संबंधित यंत्रणेला काहीही फरक पडला नाही म्हणून दुसरी ते पाचवी–सहावी जनहित याचिका दाखल करावी लागली. याचा अर्थ असा होतो की, संबंधित यंत्रणेला आता न्यायालयाची देखील भीती राहिलेली नाही. अखेरीस याच आठवड्यात ॲड . ओवेस पेचकर यांनी परत एक जनहित याचिका दाखल केली आणि यावेळी मात्र न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आणि मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याशिवाय अन्य कोणताही प्रकल्प सुरु करायला आम्ही परवानगी देणार नाही; असे ठणकवावे लागले.

यापेक्षा इभ्रत धुळीला मिळण्याचा आणखी कोणता प्रकार असतो? नितीनजी; हे सारे कोण करतेय याचा शोध आपण घ्याच. ठेकेदार आणि अधिकारी कोकणवासियांवर अक्षरशः जुलूम करत आहेत. न्यायालयाने वेगळे काहीच सांगितले नाही. कामातील तांत्रिक बाबी, निविदा प्रक्रिया, ठेकेदार पळून जाणे, प्रकल्पाचा खर्च वाढणे याच्याशी सर्वसामान्य जनतेचा काही एक संबध नाही. गलेलठ्ठ पगाराचे अधिकारी याचसाठी तर नेमलेले आहेत. अ‍ॅड. ओवेस पेचकर यांच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने सरकारची खरडपट्टी काढल्यानंतर मुंबईतील एका अग्रगण्य दैनिकाने या खड्ड्यांच्या मुद्यांवर अग्रलेख लिहिला. राष्ट्रीय महामार्ग विभागावर केवढी ही शोकांतिकेची वेळ आणली संबंधित यंत्रणेने! अ‍ॅड. ओवेस पेचकर यांचे या पाठपुराव्याबाबत अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच!

महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दर्जाबाबत लिहायचे झाले तर, एक स्वतंत्र लेख होईल. भराव टाकताना आवश्यक त्या पध्दतीने पाणी मारून रोलिंग न करणे, भरावात दगड – गोट्यांचा अंतर्भाव असणे, नदीतील गोल गोट्यांचा भरावासाठी वापर करणे; यासारख्या बेजबाबदारपणामुळे कॉंक्रिटच्या रस्त्याला पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. महामार्गाचे काम पूर्णत्वास जाण्याआधीच जर अशी स्थिती असेल तर, प्रत्यक्ष वाहतूक सुरु झाल्यानंतर आणि चार पावसाळे गेल्यानंतर कॉंक्रिटच्या रस्त्याची अक्षरशः वाताहात झालेली पहायला मिळणार आहे. नितीनजींनी कॉंक्रिटच्या रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी केल्यास त्यांच्या वस्तुस्थिती लक्षात येईल. डोंगराची माती रस्त्यावर येऊ नये म्हणून ज्या संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत, त्यांचा पायाच मजबूत नाही. या भिंतीची उभारणी चक्क मातीवर केली जातेय. पुढील पावसाळ्यात या संरक्षक भिंतीचेच संरक्षण करण्याची वेळ येणार आहे. कॉक्रिटच्या ज्या भिंती अथवा कामे केली जात आहेत त्यांच्यावर मजबूतीसाठी पाणीच मारले जात नाही; हे वास्तव आहे. या कामांच्या दर्जावर लक्ष ठेवणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. अशी यंत्रणा जर असेल तर ती केवळ कागदावर कार्यरत असावी. वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर नवीन वृक्ष लागवडीचे कोणतेही धोरण अद्याप राबविलेले नाही. रस्त्याच्या मध्यभागी लावली जाणारी शोभेची अथवा फुलझाडे म्हणजे वृक्षारोपण अथवा पर्यावरण रक्षण नव्हे; हे सांगण्यासाठी कोणा तज्ञाची गरज नाही.

चौपदरीकरणाचे सर्वेक्षण झाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरु झाले; त्यावेळी असे लक्षात आले की, अनेक वळणांमधील पूर्वीचे धोके चौपदरीकरणानंतरही कायमच राहिले आहेत. पूर्वीपेक्षा वाहनांचा वेग वाढल्यानंतर अनेक ठिकाणी वेगामुळे अपघात घडण्याचा धोका कायम रहाणार आहे. मग विकसित तंत्रज्ञानाचा वापर कोकणातील या मार्गाच्या उभारणी दरम्यान का केला नाही? असा प्रश्न नंतर उपस्थित करून काहीही साध्य होणार नाही.

संगमेश्वरच्या जवळ धामणी दरम्यान चक्क नदीच्या बाजूने म्हणजे जवळपास नदीच्या काही भागात भराव करून रुंदीकरणाचे काम केले जात आहे. नद्या गाळाने भरलेल्या असताना आता ठेकेदार ठिकठिकाणी खोदलेल्या डोंगराचा भराव काही ठिकाणी नदीपात्रात तर काही ठिकाणी नदीपात्राशेजारी टाकत असल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळतेय. हा भराव हळूहळू नदीपात्रात वाहून जाऊ लागलाय. याचा मोठा फटका नदीपात्रालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना गतवर्षीपासून बसू लागलाय. भरावाच्या मातीमुळे शेतीच नष्ट होऊन शेतकरी उध्वस्त होऊ लागल्याचे स्पष्ट चित्र पहायला मिळतेय.

विकास हवा हे मान्य, मात्र कोकण भकास करून केलेला विकास कोकणच्या काय फायद्याचा? विकास हवा असेत तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो; असे बोधामृत नवीन प्रकल्पांच्या उभारणी वेळी ज्यांचा यात लाभ होणार आहे, असे अनेकजण सर्वसामान्यांना पाजत असतात. मात्र त्याग कसला करायचा? पर्यावरणाचा? गाळामुळे उध्वस्त होणाऱ्या शेतीचा? शक्तीशाली सुरुंग लावून कोसळणाऱ्या दरडींमुळे जाणाऱ्या जीवांचा? दर्जाहीन कामांमुळे दरवर्षी रस्त्याला पडणाऱ्या खड्ड्यांमुळे जाणाऱ्या जीवांचा? मोडणाऱ्या मणके आणि हाडांचा? वाहनांच्या दुर्देशाचा? कसला कसला त्याग सर्वसामान्यांनी करायचा? ठेकेदार, अधिकारी आणि संबंधित यंत्रणा यांच्या मुर्दाड आणि बेजबाबदारपणाने कळस गाठल्याने आता पाणी डोक्यावरुन गेलेय. कोकणवासियांची सहनशक्ती तर केव्हाच संपली. याचा उद्रेग होणार नाही; हे संबधितांना माहित असल्याने सारे निर्लज्जपणे रेटून नेले जातेय.

नितीनजी पुणे बंगलोर मार्गावरही जागोजागी खड्डे आहेत. टोलची मात्र वसुली सुरु आहे. काही ठिकाणी खड्डे मोठे असल्याने पोलीसांनी चक्क बॅरिकेट्स लावल्यात. काय ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दुरावस्था? या मार्गावरील उड्डाण पुलांची कामे वर्षानुवर्षे जैसे थे स्थितीत आहेत. एकदा पुणे – बंगलोर मार्गावरूनही आपण प्रवास करावा; अशी विनंती आहे. आपण पुणे ते सातारा दरम्यानचा टोल महामार्गाच्या दुर्दशेमुळे रद्द केलात; यासाठी आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे! मात्र हे देखील सहा महिने आधी होणे अपेक्षित होते. या मार्गापेक्षा भयावह अवस्था कोकणची होऊ नये असे जर खरोखरच आपल्याला वाटत असेल तर आता याच आठवड्यात आपण पेण ते लांजा एवढा प्रवास करून दाखवा. आईशप्पथ मला खात्री आहे पंचवीस – तीस अधिकाऱ्यांना आपण निलंबित कराल आणि १५ – २० ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाकाल.

नितीनजी कोकणच्या भल्यासाठी आपण खरंच कराल एवढं? आपण प्रत्यक्ष पहाणी केल्याशिवाय आपल्याला वास्तव कळणार नाही. नितीनजी आपण महाराष्ट्रातील असल्याने आपल्याला कोकणबद्दल नक्कीच विशेष प्रेम असणार याची आम्हा कोकणवासियांना खात्री आहे. मात्र आपण २०१४ साली भूमिपूजन केलेला सप्तलिंगी नदीवरील पूलही आपल्या यंत्रणेने पूर्ण केलेला नाही. आपल्या कार्यक्षमतेवरच कोकणवासियांच्या मनात शंका निर्माण करणारी आपल्या विभागातील यंत्रणा कमालीची सुस्तावली आहे; यासाठी अन्य पुरावा कशासाठी हवा?

अनेक कामांची दर्जाहीनतेमुळे चौकशी लावणे आवश्यक आहे. रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी कोठे आणि कसे खर्च केलेत? याचा आढावा आपण घेतल्यास दरवर्षी खड्डे कसे आणि का पडले? याचीही उकल होईल.

अतिवृष्टी कोकणला नवीन नाही. प्रत्येक वेळी अतिवृष्टीचे कारण सांगून दर्जाहीन कामाचे पितळ उघडे पडू नये म्हणून अतिवृष्टीवर खापर फोडले जाते. मात्र जर अतिवृष्टीत रस्ते टिकणार नसतील? तर त्याच्या मजबूतीबाबत प्रश्नचिन्ह उभे रहाते. गेली आठ वर्षे प्रत्येक पावसाळ्यात खड्डे पडतायत. गेल्या आठ वर्षातील खड्डे आणि पॅच मारण्याचा खर्च पाहिला तर डोळे पांढरे होतील. मग कोट्यावधींचा खर्च केवळ खड्ड्यातील प्रवासासाठी होता का? असा प्रश्न पडतो.

अकार्यक्षम ठेकेदार तातडीने बदलायला हवेत. अन्यथा अजून चार वर्षे तरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्णत्वास येणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कॉंक्रिटच्या रस्त्याला समपातळी नाही, ठिकठिकाणी तडे गेलेत, नदीतील गोल गोट्यांचा भराव केला जातोय, हा भराव एकजीव होऊच शकत नाही! यासाठीच नितीनजी कोकणवासियांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, याच आठवड्यात आपण कोकणच्या या मार्गावरुन प्रवास करावा. आपण प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिलीत तरच या राष्ट्रीय महामार्गाचे भविष्यातील काम तरी दर्जेदार होईल; अशी कोकणवासियांना आशा वाटतेय. आपली पारखी नजर या मार्गावरून प्रत्यक्ष पडू दे. कोकणवासी आपले ऋण कधीही विसरणार नाहीत! म्हणून परत परत म्हणावेसे वाटते,`नितीनजी, एकदा मुंबई गोवा महामार्गाच्या या अवखळ आणि अवघड रस्त्याचा ‘गड’सर कराच!