… म्हणूनच भारत देश सुरक्षित आहे आणि राहील!

आदिमातेच्या आज्ञेने सर्वसमर्थ सद्गुरु आणि सर्वसमर्थ महायोद्धा ह्या भारत वर्षामध्ये अवतीर्ण झालेला आहे; म्हणून भारत देश सुरक्षित आहे आणि राहील!

मुंबई- “संपूर्ण विश्वामध्ये भारत हा एकमेव देश सुरक्षित आहे आणि भारत हा एकमेव देश सुरक्षित राहील; कारण आदिमातेच्या आज्ञेने सर्वसमर्थ सद्गुरु आणि सर्वसमर्थ महायोद्धा ह्या भारत वर्षामध्ये अवतीर्ण झालेला आहे; म्हणून भारत देश सुरक्षित राहील आणि भारत देशच सुरक्षित आहे!” असे गुणसंकीर्तनकार श्री. सदानंद वर्तक यांनी सांगितले. दादर पूर्व येथील शिवनेरी सेवा मंडळाच्या श्री भवानीमाता क्रीडांगणावर परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या काल सायंकाळी झालेल्या गुणसंकीर्तनात उपस्थित श्रद्धावानांशी संवाद साधताना त्यांनी अतिशय साध्यासोप्या भाषेत परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची ओळख करून दिली.

सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्र परळ शिरोडकर, परळ गांव आणि काळाचौकी ह्या तीन केंद्रांच्या माध्यमातून परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांचे गुणसंकीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ तसेच शिवनेरी सेवा मंडळ, शिवनेरी सह. गृहनिर्माण संस्था आणि सार्वजनिक श्री नवरात्र महोत्सव मंडळ या स्वयंसेवी संस्थांचे सर्व पदाधिकारी, सभासद व मोठ्या प्रमाणात श्रद्धावान उपस्थित होते.

परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांचे बालपण दादर- परळ ह्या भागात गेले. हाच दुवा पकडून गुणसंकीर्तनकार श्री. सदानंद वर्तक यांनी बापूंचे आध्यात्मिक कार्य, सामाजिक सेवेचा लेखाजोगा मांडला. त्याचप्रमाणे बापूंनी आपल्या भक्तांवर केलेली कृपा आणि बापूंनी सांगितलेला मार्ग कसा कलियुगातही मानवाला समर्थ बनवितो; ह्याबाबत अनेक अनुभव सांगितले. अनिरुद्ध बापूंनी दिलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास मानवाचे जीवन कसे सर्वांगीण सुंदर होते; हेही त्यांनी सांगितले. श्री. सदानंद वर्तक यांनी बापूंचे जे गुणसंकीर्तन केले ते उपस्थित सर्वांना आवडले. प्रत्येकाने गुणसंकीर्तन अगदी मनापासून श्रवण केले.

गुणसंकीर्तन झाल्यानंतर मोठ्या प्रेमाने आरती करून परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू पादुका दर्शन सर्वांनी घेतले आणि नंतर गजर करण्यात आला. संपूर्ण गुणसंकीर्तन सोहळा अतिशय नियोजन पद्धतीने संपन्न झाला.