आदिवासी विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात तातडीने बैठक
नागपूर:- आदिवासी विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. यासंदर्भात विभागाचे मंत्री तसेच संबंधित आमदार, अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन या विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
आदिवासी वसतिगृहामध्ये अनधिकृत मुले राहत असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांना त्यांचे लाभ मिळण्यास अडचण होत आहे. ही अनधिकृत मुले येथील विद्यार्थ्यांवर दादागिरी करतात, त्यांना त्रास देतात. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शासनाकडे निवेदन देऊन जेवणाबाबत अडचणी मांडल्या. येथील जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. वारंवार कंत्राटदार बदलूनही व्यवस्थित जेवण मिळत नाही, अशा तक्रारी केल्या. तसेच आम्हाला पैसे द्या, अशी मागणी केली. मुलांच्या मागणीनुसार शहरातील काही वसतिगृहांमध्ये डीबीटी पद्धत प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या अनधिकृत मुलांना जेवण मिळणे अवघड झाले. त्यांच्या अडचणी वाढल्या.
सचिवांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलाविले त्यास विद्यार्थ्यांनी नकार देऊन नाशिकला पायी जाण्याचा आग्रह धरला व मोर्चा काढला. मोर्चातील आदिवासी मुलांना पोलिसांनी त्रास दिला नाही, अथवा जोर जबरदस्ती केली नाही. उलट त्यांना त्यांच्या गावी नेऊन सोडले, असेही श्री.फडणवीस म्हणाले.