आमचो ह्यो सुंदर कोकण – जपणार की विकणार?
संपादकीय ऐकण्यासाठी ऑडिओ प्ले करा!
स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण….! श्रीकृष्ण सावंत यांचे हे गीत ऐकून पुन्हा एकदा नव्याने आमच्या स्वर्गापेक्षा सुंदर असणाऱ्या कोकणची किर्ती-महती सर्वत्र पसरली; परंतु आमच्या ह्या कोकणावर वक्रदृष्टी पडली मायनिंग व प्रदूषण करणाऱ्या रासायनिक कंपन्यांची! त्यांना आमच्या स्वर्गापेक्षा सुंदर असणाऱ्या कोकणातील जमिनीवर कब्जा करायचा आहे. त्यासाठी त्यांचे दलाल गावागावात फिरतात. त्या दलालांच्या मागे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असतो आणि ते दलाल राजकीय पक्षात सक्रिय असतात. ते काय करतात? जी जमीन हवी त्या जमीन मालकांना गाठायचे; त्यांना भरमसाठ रकमेच्या मोहात अडकवायचे; जे पैशाच्या मोहात अडकणार नाहीत त्यांच्यावर दबाव आणायचा- दहशत निर्माण करायची; जेणेकरून जमीन मालक जमिनीची मिळेल ती रक्कम घेऊन गप्प बसेल! कुटुंबामध्ये- भावकीमध्ये ज्यांना पैशाची गरज असेल किंवा जे स्वार्थी असतील त्यांना जाळ्यात ओढून हेच दलाल कुटुंबात – भावकीत वाद निर्माण करून देतात! बहुतांशी ठिकाणी हेच दलाल गावचे नेते म्हणून मिरवतात, गावात म्होरके म्हणून वावरतात. प्रत्येक गावात लागलेली ही कीड आता कोकणातील जमीनी गिळंकृत करणारा भयंकर मोठा राक्षस झाली! जर पुढील पाच-दहा वर्षे हीच परिस्थिती राहिली, तर “स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो कोकण” ऐवजी “नरकापेक्षा वाईट आसा आमचो कोकण” असं म्हणायची वेळ आपल्यावर येईल!
हे सगळं थांबणार कसं? ही लढाई कोणी लढायची? छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या घरात जन्माला येऊ नये; तो शेजारच्या घरात यावा! ही आमची मानसिकता! `आम्ही कशाक भानगडीत पडायचा? गाव काय तो बघून घेत! ही आमची वृत्ती! `उगाच विरोध करून दलालांशी – राजकीय पुढाऱ्यांशी दुश्मनी कशाक घ्यायची? घाबरून असे फालतू प्रश्न स्वतःला विचारून आम्ही आज गप्प बसू पण आमच्याच पुढील पिढ्यांना आपण काय उत्तर देणार आहोत? ह्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि कोकणातील जमिनी परप्रांतीयांच्या, मायनिंगवाल्यांच्या, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या आणि दलालांच्या घशात जाणार नाहीत ह्याची काळजी घेतली पाहिजे! कोकणातील पर्यावरणासाठी जे लढाई करतात त्यांच्यामागे उभे राहिलेच पाहिजे! गाव म्हणून आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे!
अनेक वर्षे रानमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेला प्रसाद गावडे हा उच्चशिक्षित तरुण कोकणातील पर्यावरणाचे व शाश्वत विकासाचे प्रबोधन करीत आहे! मोठ्या धाडसाने त्याने आपले जीवन समर्पित करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी राखणदाराचं कार्य सुरु केले आहे. त्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे, कार्यक्षमता आहे आणि विशेष म्हणजे सच्चाई आहे. त्यातून तो धगधगतं वास्तव मांडतोय. ते वास्तव आम्ही स्वीकारून आमचा कोकण वाचवायला आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल.
दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावात आता गाव वाचविण्याचा, गाव जीवंत ठेवण्याचा संकल्प करण्यात आलाय! गेल्या आठवड्यात गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी देवीच्या मंदिरात एकत्र आली आणि त्यांनी गावातील सर्व देवांना साक्षी देऊन गावातील एक इंचही जमीन कोणालाही न विकण्याचा निर्णय घेतला! शपथा घेतल्या गेल्या; गाऱ्हाणे घातले गेले. गावातील चतु:सीमेचे राखणदार, गावातील देवी- देवता गावकऱ्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निश्चितच उभे राहणार आहेत! कारण गावचं गावपण टिकलं तरच पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या गावच्या परंपरा जीवंत राहणार आहेत! गाव जेव्हा संघटित होऊन निर्णय घेतो तेव्हा तो अमलात येतोच! त्यामुळे कोकणातील जमिनी गिळंकृत करणाऱ्या राक्षसांना आता तरी लगाम घातला जाईल! कोलझर गावाचा हा आदर्श कोकणातील प्रत्येक गावाने घ्यायला पाहिजे!
गावातील गरीब कुटुंब मुख्य दोन कारणांसाठी आपली जमीन विकत असतात! आजारपणासाठी आणि शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना नाविलाजास्तव जमिनी विकाव्या लागतात! म्हणूनच कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात वैद्यकीय सेवा जी गरिबांसाठी अशक्य होऊन बसली आहे त्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कसं वाढलं? हे जेव्हा राजकीय फायद्यासाठी सांगितलं जातं तेव्हा जिल्ह्यात वैद्यकीय सेवेचे कसे तीनतेरा वाजलेत? ह्याचीही चर्चा आवश्यक आहे; असे राजकीय नेत्यांना वाटणार नाही. वैद्यकीय सेवेत का सुधारणा होत नाही? हा प्रश्न नेहमीच आहे! आपल्या मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी पालकांना जमिनी विकाव्या लागतात! आज गावागावातील प्राथमिक शाळा बंद पडताहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु झाल्या; पण त्याचे शुल्क पालकांना परवडणारं नसतं! विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी राज्यकर्ते नेहमीच उदासीन असतात. लोकांनी जमिनी विकाव्यात म्हणूनच दर्जेदार आरोग्य आणि शिक्षण सेवा मिळू नये म्हणून राज्यकर्ते प्रयत्नशील असतात की काय? असा प्रश्न पडतो! ह्यासाठीही कोकणातील विद्वानांनी, जागृत नागरिकांनी चळवळ उभी करायला पाहिजे! तरच आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर राहील! कोकण वाचवायचा असेल, तर गाव वाचवायला लागेल. जमीन वाचवायची असेल, तर कोकणी माणूस जागा झाला पाहिजे! तरच “स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण” ही ओळ केवळ गीतात नाही, तर वास्तवातही टिकून राहील!
-नरेंद्र हडकर











