छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती, कोणत्या धर्माला विरोध करण्यासाठी नाही, तर उन्मत्त व मदमस्त झालेल्या आणि सामान्य रयतेवर जुलुम जबरदस्ती करणाऱ्या राजवटींविरुद्ध, सरदारांविरुद्ध होते. ह्याच मार्गाने छत्रपती संभाजी महाराज यांनी मोठ्या दिमाखात मार्गक्रमण केले.

वर्षानुवर्षांची गुलामगिरीची काळरात्र चिरत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. रयतेचे राज्य अवतरले. पण हे राज्य उभे करत असताना राजांनी केलेले संघटन कौतुकास्पद होते. सैन्यात केलेली भरती किंवा मंत्र्यांच्या बढत्या ह्या ज्याच्या त्याच्या कौशल्यावरच मिळत असे. स्वराज्याचा विस्तार करत असताना राजांनी कधीच कोणता भेदभाव केला नाही. राजांच्या सैन्यात कुणबी, मराठा, ब्राह्मण, १२ बलुतेदार, १८ पगड जाती, मुस्लिम बांधव असे सर्व जाती धर्मांचे मावळे होते. विशेष म्हणजे राजांचे कट्टर विरोधक असणारे मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही सत्ताधारी मुस्लिम धर्मीय असून देखील राजांच्या सैन्यात मुस्लिम बांधव होते.

★ स्वराज्याच्या सेवेत असलेल्या काही निवडक मुस्लिम सरदारांची यादी –

• सिद्दी वाहवाह – घोडदळातील सरदार

• सिद्दी हिलाल – घोडदलातील सहाय्यक सेनापती

• सिद्दी इब्राहिम- शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार

• नुरखान बेग – स्वराज्याचा पहिला सरनोबत

• मदारी मेहतर – महाराजांचा अत्यंत विश्वासू सेवक

• काझी हैदर – महाराजांचा वकील, सचिव

• सिद्दी अंबर वहाव – हवालदार

• हुसेनखान मियाना – लष्करातील अधिकारी

• दर्याखान – आरमाराचा पहिला सुभेदार

• इब्राहिम खान – आरमारातील अधिकारी

• दौलत खान – आरमार प्रमुख सुभेदार

• सुलतान खान – आरमाराचा सुभेदार

• दाऊद खान – आरमारातील सुभेदार

• इब्राहिम खान – तोफखान्याचा प्रमुख

• आणि आदिलशाहीतून आलेले ७०० पठाण

राजांच्या पदरी जसे मुस्लिम सरदार होते तसेच मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही दरबारीही मराठा, ब्राह्मण, रजपूत सरदार होते. खुद्द छत्रपती शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे भोसले निजामशाही दरबारचे सरदार होते. राजांचे वडील फर्जंद शहाजीराजे भोसले आणि मोठे बंधू संभाजीराजे आदिलशाही दरबारचे सरदार होते. रजपुतांचे शिरोमणी असणारे मिर्झाराजे जयसिंग मोगली दरबारचे सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांना कायमचे संपवण्यासाठी आलेल्या अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे ब्राह्मण होते.

सरतेशेवटी असेच सांगावेसे वाटते कि १६ शतकात राजांनी कधी जातीभेद, धर्मभेद केला नाही. मग आता आपण का एकमेकांच्या धर्मभावना दुखावून समाजात तेढ निर्माण करत आहोत ? “संघटीत राहून स्वतःबरोबर समाजाचाही विकास करावा ” हाच संदेश प्रत्येक तरुणाने शिवचरित्रातून घ्वावा हीच अपेक्षा!