आदर्श पितृभक्त : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज यांची शिकवण आणि अलौकिक बौद्धिक सामर्थ्य यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका सर्वदूर पसरवली. याकामी त्यांच्यावर अनेक प्रसंग आले. ज्यातून ते सहीसलामत बाहेर पडून लोककल्याणकारी राज्याचा विस्तार केला. तर कधी – कधी त्यांना स्वतःला अमान्य असणारे निर्णय स्वराज्याच्या भल्यासाठी त्यांना घ्यावे लागले. असाच एक अत्यंत दुर्दैवी प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह. या तहात त्यांना बरेच किल्ले आणि खंडणी मुघलांना देण्याचे मान्य करावे लागले. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांना या तहाच्या अटी शिवराय पूर्ण करणार नाहीत असे वाटायचे. म्हणून त्यांनी या तहाच्या अटी पूर्ण होईपर्यत छत्रपती संभाजी महाराज यांना वडिलांच्या शब्दाखातर ओलीस म्हणून ठेवण्याची अट घातली. त्याप्रमाणे जेमतेम आठ वर्षे वय असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांना वज्रगडावर ओलीस म्हणून राहावे लागले. त्यानंतर काहीच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाच्या अटी पूर्ण केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज परत यायला निघाले. तोपर्यंत संभाजी महाराज यांची पितृभक्ती, स्वराज्यनिष्ठा, कुशाग्र बुद्धी आणि वागण्यातील सहजसुलभता यामुळे सरदार दिलेरखान आणि संभाजी राजे यांच्यात मैत्री निर्माण झाली. याच मैत्रीखातर मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांनी त्यांना देण्यासाठी एक भलामोठा हत्ती आणला. त्या हत्तीकडे संभाजी महाराज पाहत असताना दिलेरखान सहज म्हणला की, हा एवढा मोठा हत्ती दक्षिणेत कसा न्यायचा असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? त्यावर तल्लख आणि हजरजबाबी असणाऱ्या संभाजी महाराजांनी उत्तर दिले की, हा हत्ती आम्ही कसाही नेणारच; पण आमच्या आबासाहेबांनी तुमच्याशी तहात दिलेले किल्ले कसे परत घ्यायचे हा विचार आम्ही करतोय. हे त्यांचे उत्तर ऐकून मिर्झाराजे जयसिंग अवाक होऊन त्यांच्याकडे बघतच राहिला. याच हजरजबाबीपणा, धाडसीपणा यांच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजानी स्वराज्याची सीमाच वाढवतानाच आपल्या अभ्यासपूर्ण राज्यकारभाराच्या माध्यमातून प्रत्यक्षात पातशहा औरंगजेब बादशहाला जवळपास पाच लाख फौज आणि कोटयवधी रुपयांचा खजिना घेऊन महाराष्ट्रात यायला भाग पाडले. त्यातील अभिमानाची बाब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या धारेवर आणि चौकस राज्यकारभाराच्या जोरावर दिल्लीच्या बादशहाला आपली भांडीदेखील विकण्यासाठी काढायला लावली. एवढेच नव्हे तर आपल्या मृत्यूनंतर देखील औरंगजेब बादशहाला एकाही किल्ल्याचा साधा दगडही हलवता येऊ नये एवढी मजबूत स्वराज्याची बांधणी छत्रपती संभाजी महाराजांनी केली. असा हा रणधुरंदर राजा महाराष्ट्रात झाला याचा अभिमान वाटतो. आज १४ मे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती. या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ चा. जन्मापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या समोर फक्त संघर्ष आणि संघर्षच होता. जन्म झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या आई महाराणी सईबाई यांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर संभाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ आईसाहेबानी घेतली. ज्याप्रमाणे जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले आणि स्वराज्याची निर्मिती केली, अगदी त्याचप्रमाणे त्यांनी युवराज संभाजी महाराजांना घडवले. आईविना पोर ही भावना संभाजी राजांच्या मनात कधीही येऊ दिली नाही. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीतून राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कायम निदर्शनास येतो. आपल्या एखाद्या कृतीतून आबासाहेबन यांना काय वाटेल? जिजाऊ साहेबांना काय वाटेल हा भीतीयुक्त आदर त्यांनी आयुष्यभर बाळगला. म्हणूनच ते सर्वोच पुत्र ठरतात. ज्या कुटुंबाची दहशत शत्रूंनी कायम बाळगली आणि ज्याचा आदर रयतेने आयुष्यभर जपला, त्या कुटुंबाचा लौकिक छत्रपती संभाजी महाराज यांनी कायम वाढवला. अगदी लहानपणापासूनच वडिलांनी सोपविलेली प्रत्येक कामगिरी संभाजी राजांनी यशस्वी पणे पार पाडली. याचे उत्तम उदाहरण आपल्याला आग्रा भेटीत सापडते. वय फक्त साडे आठ वर्षाचे, बाहेर शत्रू दिवसरात्र शोधत आहे, अशावेळी स्वराज्याची गरज, आपल्या वडिलांचा नजरेतील समयसूचकता, त्यातील इशारा काही शब्दातच लक्षात घेऊन तात्काळ मथुरेत राहण्यास संभाजीराजे तयार झाले. माझे कसे होईल, मी लहान आहे, मला जमेल का, माझ्याने हे शक्य आहे का? असले कोणत्याही प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात आले नाहीत. अनेकदा त्यांना स्वराज्यातील करभाऱ्यांची काम करण्याची पद्धत पसंत नसतानाही त्यांनी आपल्या धीरोदात्त वडिलांच्या समोर स्वतः कमीपणा घेतला मात्र वडिलांच्या समोर आपले तेच खरे हा हेका धरला नाही. ज्यावेळी नेतोजी पालकर यांची हेरगिरी अयशस्वी ठरते की काय असे वाटत असताना, स्वतः वडिलांची आज्ञा प्रमाण मानून मुघलांच्या गोटात जात दिलेरखान व त्याच्या सहकार्यांचे आक्रमण थोपवत, स्वराज्याचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. या घटनेवरून इतिहासाने अनेकदा त्यांची वाट चुकलेला युवराज वा तत्सम शब्दांनी हेटाळणी केली. मात्र शिवपुत्र संभाजी महाराज हे कधीही डगमगले नाहीत. काहीजणांच्या फितुरीमुळे म्हणा वा अतिहत्वाकांक्षेमुळे म्हणा त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झाले, मानसिक आघात झाले; पण सिंहाचा हा छावा कधीही मागे आला नाही. आपल्या वडिलांना जंजिरा जिंकता आला नाही यांची खंत मनात बाळगत भर समुद्रात पूल बांधणरे छत्रपती संभाजी महाराज कर्तृत्वाने आकाशाला टेकणारे वाटतात.

इतिहासाचा वा भारतीय संस्कृतीचा आढावा सजग डोळ्याने घेतला तर आपल्या लक्षात येईल की, कर्तृत्ववान पुत्रापैंकी आदर्शवत पुत्राचे उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आपल्या असंख्य मावळ्यांच्या सहकार्याने उभारलेल्या स्वराज्याचा एकही चिरा हलू न देता त्यात लक्षणीय भर घालण्याचे कार्य संभाजीराजेनी केले. सतत नऊ वर्षे मुघलांची अत्याचारी आणि विनाशकारी लाट थोपवतानाच स्वराज्य वाढविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी दोनशेहून अधिक विजयी लढाया केल्या. अनेक किल्ले उभारले, किल्ले जिंकले.

थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण आजच्या काळात आपल्या वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्या व्हाइट कॉलर नागरिकांसाठी संभाजी राजांच्या कर्तृत्व आणि आपल्या वडिलांच्या प्रति असणारा आदर हा नक्कीच दिशादर्शक ठरतो. माझ्यासाठी बापाने काय केले हा उनाड प्रश्न उपस्थित करणाऱ्या आजच्या युवकांना संभाजी महाराजांची पितृभक्ती आदर्शवत आहे. वडील जिवंत असताना घराचे भेद करणाऱ्या आजच्या सुपुत्रांनी घर कायमस्वरूपी एकसंघ ठेवत घरभेदयाना अद्दल घडविणाऱ्या संभाजी राजांचा कुटूंबवत्सलपणा जपला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी होते, योद्धे होते हे खरेच आहे, मात्र त्याही पलीकडे छत्रपती संभाजी महाराज हे आभाळाएवढे कर्तृत्व असलेल्या आणि सिंहासारखे काळीज असणाऱ्या पित्याचे आकाश कवेत घेणारे आणि वाऱ्यावर स्वार होऊन विजयाचे विक्रम रचणारे कर्तृत्ववान पुत्र होते. त्यांच्या पितृभक्तीचे उदाहरण आपल्याला त्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथातील पुढील ओळीतून जाणवते.

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥
( अर्थ- कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,
करितो धर्माचा ऱ्हास,
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल,
त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥)

म्हणूनच ज्यादिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची वीट स्वतःचे प्राणार्पण करूनही हलू न देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे पुत्र समाजात निर्माण झाल्यास नक्कीच त्या समाजाची राष्ट्राची दखल जगाला घ्यावीच लागते. अशा ह्या पितृभक्त आणि कुटूंबवत्सल राजांना त्यांच्या ३६५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

-श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाटद खंडाळा ता. जि. रत्नागिरी,
संपर्क – ९७६४८८६३३०/९०२१७८५८७४

You cannot copy content of this page