वंदे मातरम् – १५० वर्षे

  • 1950 मध्ये घटना समितीने वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले.
    वंदे मातरम् ची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली होती, आणि नंतर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत (1882 मध्ये प्रकाशित झालेली) समाविष्ट करण्यात आले होते.
  • 1896 मध्ये कोलकत्ता इथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा हे गीत गायले होते.
  • 7 ऑगस्ट 1905 रोजी वंदे मातरम् चा सर्वप्रथम राजकीय घोषणा म्हणून त्याचा वापर करण्यात आला.

प्रस्तावना-

यावर्षी, 7 नोव्हेंबर, 2025 रोजी भारताचे राष्ट्रगान असलेल्या वंदे मातरम् च्या रचनेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. “आई, मी तुला वंदन करतो” असा याचा अर्थ आहे. हे गीत स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्र निर्माणाला वाहून घेतेलेल्या अगणित पिढ्यांना प्रेरणा देणारे एक चिरंतन स्तोत्र आहे. हे गीत भारताच्या राष्ट्रीय अस्मिता आणि सामूहिक आत्म्याचे एक चिरस्थायी प्रतिक आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत, 7 नोव्हेंबर 1875 रोजी ‘बंगदर्शन’ या साहित्यविषयक नियतकालिकेत पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यानंतर बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे प्रार्थना गीत, 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या, ‘आनंदमठ’ या आपल्या अजरामर कादंबरीत समाविष्ट केले होते. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला संगीतबद्ध केले. आणि आज हे गीत देशाच्या सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक चेतनेचा अविभाज्य भाग बनले आहे. आता या गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याचा महत्त्वाचा टप्पा साजरा करणे, म्हणजे वंदे मातरम् ने एकता, त्याग आणि समपर्णाचा दिलेला कालातीत संदेशाला पुन्हा एकदा दृढ करण्याची संधीच आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी-

वंदे मातरम् चे महत्त्व समजून घेण्यासाठी, आपल्याला या गीताच्या उत्पतीची मूळे तपासणेही तितकेच गरजेचे आहे. या गीताच्या रचनेपर्यंतचा मार्ग साहित्य, राष्ट्रवाद आणि भारताचा स्वातंत्र्यलढ्यामध्ये दुवा साधणारा मार्ग आहे. एका काव्यमय रचनेपासून ते राष्ट्रगान म्हणून या प्रार्थना गीताचा प्रवास म्हणजे, वसाहतवादी वर्चस्वाविरुद्ध भारताच्या सामूहिक जाणिवेचेच प्रतीक आहे.

हे गीत 1875 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यानंतर श्री अरविंद यांनी 16 एप्रिल 1907 रोजी ‘बंदे मातरम्’ नावाच्या एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या एका सदरातून, या गीताला ठोस आधार मिळवून दिला. त्यात त्यांनी म्हटले होते की, बंकिम यांनी आपले हे विख्यात गीत बत्तीस वर्षांपूर्वी रचले होते. त्यावेळी फार कमी लोकांनी हे गीत ऐकले होते, परंतु दीर्घकाळच्या भ्रमातून बाहेर पडत जागृतीच्या अवस्थेत पोहचलेल्या बंगालच्या लोकांनी, आपल्या आसपास चहोबाजुंनी सत्याचा शोध घेतला, आणि त्यातच एका दैवयोगाच्या क्षणी कुणतरी “बंदे मातरम्” हे गीत गायल्याचे निरीक्षणही त्यांनी या सदरात मांडले आहे.
‘आनंदमठ’ हे पुस्तकरूपात प्रकाशित होण्यापूर्वी, ते ‘बंगदर्शन’ या एका बंगाली मासिकात एका मालिकेच्या स्वरुपात प्रकाशित करण्यात आले होते. बंकिम हे स्वतःच या मासिकाचे संस्थापक संपादक होते.
या कादंबरीच्या मालिका स्वरुपातल्या मार्च – एप्रिल 1881 च्या अंकातील पहिल्याच भागात “वंदे मातरम्” हे गीत प्रकाशित झाले होते.
1907 मध्ये, मादाम भिकाजी कामा यांनी परदेशात (बर्लिन, स्टटगार्ट) पहिल्यांदा तिरंगी ध्वज फडकावला. त्या ध्वजावरही वंदे मातरम् हे शब्द लिहिलेले होते.

आनंदमठ आणि देशभक्तीचा धर्म-

आनंदमठ या कादंबरीचे मध्यवर्ती कथानक हे संतान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संन्याशांच्या एका समुहाभोवती गुंफलेले आहे. संतान म्हणजे मुले, ते आपले जीवन मातृभूमीसाठी समर्पित करतात. ते मातृभूमीला देवीच्या रूपात पाहातात आणि तिची पूजाही करतात, ते केवळ त्यांच्या जन्मभूमीसाठीच समर्पित असतात. “वंदे मातरम्” हे आनंदमठातील संतान गात असलेलेच गीत आहे. हे गीत “देशभक्तीचा धर्म” या ‘आनंदमठ’ च्या मध्यवर्ती संकल्पनेचे प्रतिकच आहे.

त्यांच्या मंदिरात त्यांनी मातृभूमीचे प्रतिक म्हणून आईच्या तीन प्रतिमा ठेवल्या होत्या. यातल्या आईच्या प्रतिमा म्हणजे, दिव्य वैभवाचे महान आणि तेजस्वी रूप आहे, अत्यंतिक वेदनांनी खंगलेल्या मातेचे रूप आहे, आणि आपल्या मूळ वैभवात असलेल्या मातेचे प्रतिक आहे. “त्यांच्या संकल्पनेतील आईच्या सत्तर कोटी (किंवा 14 कोटी) हातांमध्ये भिक्षेचे पात्र नव्हे तर तीक्ष्ण पोलादी हत्यार होते” अशा शब्दांत श्री अरविंद यांनी या आईच्या प्रतिमांचे वर्णन केले आहे.

बंकिमचंद्र चटर्जी-

वंदे मातरम् चे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी (1838–1894) हे 19 व्या शतकातील बंगालमधील सर्वात प्रतिष्ठीत व्यक्तीमत्वांपैकी एक होते. 19 व्या शतकातील बंगालच्या बौद्धिक आणि साहित्यिक इतिहासात त्यांची महत्वाची भूमिका बजावली आहे. एक नामवंत कादंबरीकार, कवी आणि निबंधकार म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाचा आधुनिक बंगाली गद्य साहित्याच्या विकासावर, तसेच उदयाला येत असलेल्या भारतीय राष्ट्रवादाच्या अभिव्यक्तीवर विलक्षण प्रभाव आहे.

आनंदमठ (1882), दुर्गेश नंदिनी (1865), कपालकुंडला (1866), आणि देवी चौधुराणी (1884) या त्यांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती. त्यांच्या या रचनांमधून वसाहतवादाच्या काळात स्व अस्मितेसाठी संघर्ष करत असलेल्या समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नितीमूल्याशी संबंधित समस्यांची मांडणी केलेली दिसते.

वंदे मातरम् ची रचना राष्ट्रवादी विचारांमधील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या रचनेतून मातृभूमीप्रति समर्पणभाव आणि अध्यात्मिक आदर्शवादाचा विलक्षण मिलाफ दिसून येतो. बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या लेखनातून, केवळ बंगाली साहित्यालाच समृद्ध केले नाही, तर भारतातील सुरुवातीच्या राष्ट्रवादी चळवळींसाठी आधारभूत ठरलेली मूलभूत वैचारिक तत्त्वांची मांडणीही केली आहे. वंदे मातरम् मधून त्यांनी देशाला मातेच्या रुपात मातृभूमीचे दर्शन घडवले आहे.

वंदे मातरम् – प्रतिकाराचे गीत-

ऑक्टोबर 1905 मध्ये मातृभूमीच्या कल्पनेला एक ध्येय आणि धार्मिक उत्कटता यांच्या आधारे प्रोत्साहित करण्यासाठी उत्तर कलकत्ता येथे बंदे मातरम् संप्रदायाची स्थापना करण्यात आली. दर रविवारी समाजाचे सदस्य प्रभातफेरीला जात, “वंदे मातरम्” गीत गात आणि मातृभूमीच्या समर्थनार्थ लोकांकडून स्वेच्छेने देणगी स्वीकारत. रवींद्रनाथ टागोरही कधीकधी संप्रदायाच्या या प्रभातफेरीत सामील होत असत.

20 मे 1906 रोजी बरिसाल (आता बांगलादेशात) येथे एक अभूतपूर्व वंदे मातरम् मिरवणूक निघाली, ज्यामध्ये दहा हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते, ज्यात हिंदू आणि मुस्लिम दोघेही होते. त्यांनी वंदे मातरम् झेंडे घेऊन शहराच्या मुख्य रस्त्यांवरून संचलन केले.

ऑगस्ट 1906 मध्ये बिपिन चंद्र पाल यांच्या संपादनाखाली बंदे मातरम् नावाचे इंग्रजी दैनिक सुरू करण्यात आले, त्यानंतर श्री अरबिंदो सहसंपादक म्हणून रुजू झाले. आपल्या तीक्ष्ण आणि प्रेरणादायी संपादकीय लेखांमुळे हे वृत्तपत्र भारताच्या प्रबोधनाचे एक शक्तिशाली साधन बनून संपूर्ण भारतीय प्रेक्षकांपर्यंत स्वावलंबन, ऐक्य आणि राजकीय जाणीवेचा संदेश पोहोचवू लागले. निर्भयपणे राष्ट्रवादाचा संदेश देत, तरुण भारतीयांना वसाहतवादी गुलामगिरीतून बाहेर पडण्यास प्रेरित करत, बंदे मातरम् दैनिक राष्ट्रवादी विचार व्यक्त करण्यासाठी तसेच जनमत एकत्रित करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करत होते.

वंदे मातरमचा वाढता प्रभाव – एक गीत आणि घोषणा अशा दोन्हीप्रकारे – पाहून घाबरून ब्रिटिश प्रशासनाने त्याचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. पूर्व बंगालमधील नव्याने निर्माण झालेल्या प्रांत सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम गाणे म्हणण्यास किंवा जप करण्यास मनाई करणारे परिपत्रक जारी केले. शैक्षणिक संस्थांना मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आणि राजकीय आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली.

नोव्हेंबर 1905 मध्ये बंगालमधील रंगपूर येथील एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 रुपये दंड ठोठावण्यात आला कारण त्यांना वंदे मातरमचा जप करण्याबद्दल दोषी ठरवले होते. रंगपूरमध्ये फाळणीविरोधी प्रमुख नेत्यांना विशेष हवालदार म्हणून काम करण्याचे आणि वंदे मातरम म्हणण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यात आले. नोव्हेंबर 1906 मध्ये धुळे (महाराष्ट्र) येथे झालेल्या आणि मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या बैठकीत वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला. 1908 मध्ये बेळगाव (कर्नाटक) येथे ज्या दिवशी लोकमान्य टिळकांना बर्मामधील मंडाले येथे हद्दपार केले जात होते, त्या दिवशी पोलिसांनी अनेक मुलांना मारहाण केली आणि वंदे मातरम म्हटल्याबद्दल अनेकांना अटक केली.

पुनरुज्जीवित राष्ट्रवादासाठी लढाईची हाक-

“वंदे मातरम्” हे गाणे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनले, ज्यामध्ये स्वराज्याची सामूहिक आकांक्षा तसेच जनता आणि तिच्या मातृभूमीमधील भावनिक संबंध यांचा समावेश आहे. सुरुवातीला स्वदेशी आणि फाळणीविरोधी चळवळींदरम्यान लोकप्रिय झालेले हे गाणे प्रादेशिक अडथळे पार करून राष्ट्रीय जागृतीचे गाणे म्हणून काम करत होते. बंगालच्या रस्त्यांपासून ते मुंबईच्या गाभ्यापर्यंत आणि पंजाबच्या मैदानापर्यंत “वंदे मातरम्” हे गाणे वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक म्हणून प्रतिध्वनित झाले. ब्रिटिशांनी त्याचे सादरीकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे देशभक्तीपर महत्त्व वाढले, ते जाती, पंथ आणि भाषेतील व्यक्तींना एकत्र करणाऱ्या नैतिक शक्तीमध्ये रूपांतरित झाले. नेते, विद्यार्थी आणि क्रांतिकारकांनी त्याच्या श्लोकांमधून प्रेरणा घेतली, राजकीय सभा, निदर्शने तसेच तुरुंगवासापूर्वी त्याचे पठण केले. या रचनेमुळे केवळ अवज्ञा करण्याच्या कृतींना प्रेरणा मिळाली नाही तर चळवळीला सांस्कृतिक अभिमान आणि आध्यात्मिक उत्साह देखील मिळाला, ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याच्या मार्गासाठी भावनिक पाया निर्माण झाला.

“वंदे मातरम्” हे गाणे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रवादाच्या वाढत्या जल्लोषात उदयास आले.

1896 च्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी “वंदे मातरम्” गायले होते.

1905 च्या वादळी काळात, बंगालमध्ये फाळणीविरोधी आणि स्वदेशी चळवळीदरम्यान या गाण्याचे तसेच “वंदे मातरम्” या घोषणेचे आकर्षण खूप शक्तिशाली बनले.

त्याच वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाराणसी अधिवेशनात, ‘वंदे मातरम्’ हे गाणे अखिल भारतासाठी स्वीकारण्यात आले.

एप्रिल 1906 मध्ये पूर्व बंगालच्या नव्याने निर्माण झालेल्या प्रांतातील बारिसल येथे झालेल्या बंगाल प्रांतीय परिषदेदरम्यान, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वंदे मातरम् च्या सार्वजनिक गायनावर बंदी घातली आणि अखेर परिषदेवरच बंदी घातली. आदेशाचे उल्लंघन करून प्रतिनिधींनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि त्यांना पोलिसांच्या कडक दडपशाहीचा सामना करावा लागला.

मे 1907 मध्ये लाहोरमध्ये तरुण निदर्शकांच्या एका गटाने वसाहतवादी आदेशांना आव्हान देत रावळपिंडी येथे झालेल्या स्वदेशी नेत्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी वंदे मातरमचा नारा देत मोर्चा काढला. या निदर्शकांना क्रूर पोलिस दडपशाहीचा सामना करावा लागला, तरीही तरुणांनी निर्भयपणे घोषणा दिल्या, यात देशभर पसरलेल्या प्रतिकाराच्या वाढत्या भावनेचे प्रतिबिंब पडले.

27 फेब्रुवारी 1908 रोजी तुतीकोरिन (तामिळनाडू) येथील कोरल मिल्समधील सुमारे एक हजार कामगारांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीशी एकता दर्शवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या दडपशाहीचा निषेध म्हणून संप पुकारला. त्यांनी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरून मोर्चा काढला आणि निषेध व देशभक्तीचे प्रतीक म्हणून वंदे मातरमचा जयघोष केला.

जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्यादरम्यान मुंबई पोलिस न्यायालयाबाहेर हजारो लोक जमले होते आणि त्यांनी एकतेचे शक्तिशाली प्रदर्शन म्हणून वंदे मातरम गायले होते. नंतर 21 जून 1914 रोजी टिळकांची सुटका झाल्यानंतर पुण्यात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, ते आसनावर विराजमान झाल्यानंतर गर्दीने बराच वेळ वंदे मातरमचा गजर केला.

भारतीय क्रांतीकारकांवर ‘वंदे मातरम्’चा प्रभाव-

1907 मध्ये, मादाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ट, बर्लिन येथे भारताचा तिरंगा ध्वज परदेशात पहिल्यांदा फडकवला. या ध्वजावर वंदे मातरम् हे शब्द लिहिलेले होते.
17 ऑगस्ट 1909 रोजी, जेव्हा मदन लाल धिंग्रा यांना इंग्लंडमध्ये फाशी देण्यात आली, तेव्हा फाशीच्या तख्तावर चढण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द “वंदे मातरम्” हेच होते.
1909 मध्ये, पॅरिसमधील भारतीय देशभक्तांनी जिनिव्हा येथून वंदे मातरम् नावाचे मासिक प्रकाशित करण्याचे काम हाती घेतले.
ऑक्टोबर 1912 मध्ये, गोपाळ कृष्ण गोखले दक्षिण आफ्रिकेत केप टाऊन इथे पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वागत ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषासह भव्य मिरवणुकीने करण्यात आले.

राष्ट्रीय दर्जा-

संविधान सभेत जन गण मन आणि वंदे मातरम् या दोन्ही गीतांना राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारण्याबद्दल पूर्ण एकमत होते आणि या विषयावर कोणताही वाद झाला नाही. 24 जानेवारी 1950 रोजी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेला संबोधित करताना सांगितले की, वंदे मातरमने स्वातंत्र्य चळवळीत बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे, त्याला राष्ट्रगीत म्हणून जन गण मन च्या बरोबरीचा दर्जा दिला जावा आणि सारखाच सन्मान मिळावा. ते म्हणाले, “एक विषय चर्चेसाठी प्रलंबित आहे, तो म्हणजे राष्ट्रगीताचा प्रश्न. एक वेळ असे वाटले होते की, हा विषय सभागृहासमोर आणावा आणि ठरावाद्वारे सभागृहाने निर्णय घ्यावा. पण असे जाणवले की, ठरावाच्या माध्यमातून औपचारिक निर्णय घेण्याऐवजी, मी राष्ट्रगीतासंबंधी एक निवेदन करणे अधिक चांगले राहील. त्यानुसार मी हे विधान करत आहे.”

“जन गण मन” या नावाने ओळखले जाणारे गीत – त्यातील शब्द आणि संगीत – हे काही प्रसंगांनुसार आवश्यक बदल करून भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) म्हणून सरकारकडून अधिकृतपणे मान्य केले जाईल; आणि वंदे मातरम् हे गीत, ज्याने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावली आहे, ते जन गण मन च्या बरोबरीने सन्मानित केले जाईल आणि त्याला समान दर्जा असेल. (टाळ्यांचा कडकडाट). मला आशा आहे की, यामुळे सदस्यांचे शंका-आक्षेप दूर होतील आणि ते या निर्णयाशी सहमत होतील.”

त्यांचे हे निवेदन स्वीकारण्यात आले, आणि रवींद्रनाथ टागोर यांचे ‘जन-गण-मन’ स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) म्हणून आणि बंकिमचंद्र यांचे ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून, ‘जन-गण-मन’ च्या समान दर्जासह स्वीकारले गेले.

वंदे मातरम् च्या 150 वर्षांचा स्मरणोत्सव-

देश “वंदे मातरम्” या गीताच्या 150 वर्षांचा उत्सव साजरा करत असताना, देशभरात विविध स्मृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. हे उपक्रम, या गीताच्या, एकता, प्रतिकार आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या चिरंतन वारशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहेत. विविध संस्था, सांस्कृतिक मंडळे आणि शैक्षणिक केंद्रे या गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व पुन्हा जाणून घेण्यासाठी, चर्चासत्र, प्रदर्शने, सांगितीक सादरीकरण, सार्वजनिक वाचन, असे कार्यक्रम आयोजित करत आहेत. भारत सरकार हा उत्सव चार टप्प्यांत साजरा करेल.

सौजन्य-https://www.pib.gov.in/

वंदे मातरम् — संपूर्ण गीत

लेखक: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
ग्रंथ: आनंदमठ (१८८२)

संस्कृत मूळ पाठ

वन्दे मातरम्।
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्,
शस्यश्यामलां मातरम्॥
वन्दे मातरम्॥

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनिम्,
फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनिम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्,
सुखदां वरदां मातरम्॥
वन्दे मातरम्॥

सप्तकोटि कण्ठ कलकल निनाद कराले,
द्विसप्तकोटि भुजैर्धृतखरकरवाले,
अबला केन मा एत बले,
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं,
रिपुदलवारिणीं मातरम्॥
वन्दे मातरम्॥

मराठी अर्थ-

वंदे मातरम् — मी तुला वंदन करतो, हे माझ्या भारतमाते!

ती तू —
जलाने, फळांनी परिपूर्ण,
मलयगिरीच्या शीतल वाऱ्यांनी स्नान केलेली,
धान्यांनी हिरवीगार झालेली माझी माता!
मी तुला वंदन करतो!

तू —
चांदण्यांच्या प्रकाशात न्हालेल्या रात्रीसारखी रम्य,
फुललेल्या फुलांनी आणि हिरव्यागार पानांनी सजलेली,
हसरी, गोड बोलणारी,
सुख देणारी, वरदान देणारी माझी जननी!
मी तुला वंदन करतो!

तुझे —
सात कोटी कंठांचा निनाद करणारे स्वर,
चौदा कोटी बलवान हातांनी शत्रूंचा नाश करणारे सामर्थ्य!
‘अबला’ म्हणवणारी पण अपार शक्तीची धनी तू,
शत्रूंचा नाश करून, आपल्या लेकरांचे रक्षण करणारी!
हे भारतमाते, तुला मी नतमस्तक होतो!

error: Content is protected !!