आषाढी वारीत शासन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबविणार

मुंबई:- आषाढी एकादशी निमित्त यंदाच्या वारीत अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांना हातमोजे, ॲप्रन, टोपी आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ६ जुलै व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ५ जुलैपासून पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे होणार आहे. देहू, आळंदी येथून पंढरपूर पर्यंत सलग १९ दिवस चालणाऱ्या आषाढी वारीत महाराष्ट्रासह विविध प्रांतातून सुमारे १० ते १२ लाख भाविक सहभागी होत असतात. या कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंट, फिरते विक्रेते हे अन्न पदार्थाची विक्री करीत असतात तसेच सेवाभावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्न पदार्थ मोफत देत असतात. यंदापासून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्नछत्राच्या तपासण्या करुन वारकरी व भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच अन्न व्यावसायिकांचे सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं.लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परिवर्तन अन्न्‍ सुरक्षा व स्वच्छता अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्नपदार्थ तयार करण्याबाबत आणि तसेच अन्नसुरक्षा बाबत तज्ज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. या अन्न व्यावसायिकांना हातमोजे, ॲप्रन, टोपी इ. समावेश असलेल्या हायजीन इ, वस्तुचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ५ जुलै रोजी होणार आहे.(‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *