जाणते राजे व्हा!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अखेर शिवसेनेने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचे प्रमुखपद आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

महाराष्ट्राचे प्रचंड सामर्थ्यवान नेते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी रोखठोक राजकारण केले, निस्वार्थी वृत्तीने समाजकारण केले. कधीही कसल्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. मिळालेली सर्व पदे अक्षरशः शिवसैनिकांना दिली. जात-पात न मानणारा नेता, गरीब-श्रीमंत भेदभाव न करणारा नेता, हातचं राखून न ठेवता वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगले म्हणणारा हा नेता खरोखरच वंदनीय. राजकारणापलीकडे जाऊन मित्रत्व जपणारा हा नेता महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अनेक नवे आयाम स्थापित करता झाला. अशा नेत्याची शिवसेना आजही महाराष्ट्रामध्ये ठामपणे उभी आहे; कारण बाळासाहेब ठाकरे यांनी जो पाया रचला तो अभेद्य असा आहे. शिवसेनेमधून अनेक जण निघून गेले तरीही शिवसेना संपली नाही; उलट वाढत राहिली. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी आपले कौशल्यपणाला लावून संयमी राजकारण केले. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला बाजूला ठेवत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. तरीही उद्धव ठाकरे यांनी चार पावले मागे येत नंतर सत्तेमध्ये सामील झाले. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये मंत्र्यांचे राजीनामे खिशात ठेवले, ते बाहेर आलेच नाहीत; यावर अनेकदा टीकाटिप्पणी केली जाते. परंतु संयमी नेतृत्वाने कसं वागायचं? हेच आज निष्पन्न झालं. २०१९ मध्ये भाजपा बरोबर प्रथम लोकसभेच्या निवडणुकीत आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीत युती झाली. विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला कमी जागा दिल्या. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर मात्र शिवसेना सत्तेतील अर्धा वाटा याबद्दल ठाम राहिली. मुख्यमंत्रीपद मिळालेच पाहिजे असा आग्रह धरला. त्यानंतर झालेल्या सत्ताकारणात बीजेपी आऊट झाली आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असताना त्यांच्याकडून जनतेला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकरी आज पूर्णपणे अडचणीत आहे. त्याला भक्कम आधार पाहिजे आहे. राज्यामध्ये बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षण ह्या तीनही प्रश्नांची गंभीर अवस्था असून त्यावर ठोस निर्णय अपेक्षित आहे. अनेक विषयांवर काम करताना महाराष्ट्र सर्वार्थाने `महा’ कसा होईल? हे उद्धव साहेबांनी बघितले पाहिजे.

ह्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा मिळाला. ह्या जाणत्या राजाने आपल्या रयतेला जपले. सुस्वराज्य स्थापन केले; कारण रयतेला सुखाने समाधानाने जीवन जगता आले पाहिजे. त्यांच्या स्वराज्यात केंद्रस्थानी फक्त आणि फक्त रयतच होती. ह्या रयतेला आजच्या लोकशाहीत पुन्हा एकदा जाणता राजा हवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन हे कार्य श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना करावे लागणार आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्र पुन्हा एकदा सर्वांगीण विकासात अग्रेसर होईल, हीच अपेक्षा! श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 

  • – नरेंद्र राजाराम हडकर

You cannot copy content of this page